- प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
मला अजिबात सांगायचे नाही की, मराठी माणूस असला, तर त्या प्रत्येकाने साहित्यिक संस्थेचे वर्गणीदार व्हायला हवे! पटणार नसेल, तर आपण नाकारू शकतोच!
मुंबईच्या एका भागात राहायला गेलो. मुंबईत तसेही कॉस्मोपॉलिटिंग वातावरण आहे. आमच्या संपूर्ण सोसायटीत तर २७० रहिवासी फ्लॅट आहेत, त्यापैकी सहा मराठी भाषिक घरे असावीत. आपण कुठेही गेलो तरी मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे व्रत हातात घेतोच. याप्रमाणे ओळख नसूनही प्रवेशद्वारावरच्या मराठी नावांच्या पाट्या बघून आम्ही दोघा-तिघांनी मिळून एकेका घराची बेल वाजवली. ‘अशी अशी साहित्यिक संस्था आहे. असे असे कार्यक्रम होणार आहेत आणि आपण त्यात भाग घेऊन किंवा रसिक म्हणून सहभाग नोंदवावा. आमच्या संस्थेचे वर्गणीदार व्हावे.’ अशा शब्दात प्रत्येकाला नम्र विनंती केली. त्यातल्या प्रत्येकाने अत्यंत आनंदाने अल्पशी असणारी वर्गणी भरली. संस्थेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रिका वाचून कितीतरी कार्यक्रमांना रसिक म्हणून उपस्थिती दर्शवली. इतकेच नव्हे, तर कितीतरी कार्यक्रमांना स्पॉन्सर म्हणून स्वतःहून पुढे येऊन आर्थिक मदतही केली.
याच सोसायटीत एक शिक्षिकाही राहतात. खरे तर मी त्यांना खूप पूर्वीपासून व्यवस्थित ओळखत होते. त्यांचे वय साधारण सत्तरीच्या आसपासचे असावे. उत्तम आर्थिक परिस्थिती आणि माझी ओळख असूनही त्यांनी संस्थेचे वर्गणीदार होण्याचे नाकारले. हे नाकारण्याचे कारण त्यांनी जे दिले ते त्यांच्या शब्दात – ‘अर्धी हाडं मसणात गेली. आता कुठे कार्यक्रम वगैरे…’ आम्ही हसून त्यांचा निरोप घेतला. गेले पंचवीस वर्षे मी त्यांना सोसायटीत पाहते. प्रत्येक वेळेस त्या घटनेची हमखास आठवण येतेच. त्यांचे वय आता साधारण ९५च्या आसपास आहे.
इथे मला अजिबात हे सांगायचे नाही की, मराठी माणूस असला, तर त्या प्रत्येकाने मराठी साहित्यिक संस्थेचे वर्गणीदार व्हायला हवे! आपल्या दारात कोणी, कोणत्याही कारणासाठी वर्गणी मागायला आले, तर आपल्याला पटणार नसेल, तर आपण नाकारू शकतोच! मला हेही सांगायचे नाही की, माझ्या दारात आलेल्या प्रत्येकाला मी काही दिलेलेच आहे. पण हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की, छोट्या-मोठ्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक संस्था या केवळ वर्गणीदारांवर किंवा देणगीदारांवर चालतात. या रकमा इतक्या कमी असतात म्हणजे तर खूपदा आपण चार माणसं कुठल्यातरी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर जितकी रक्कम टीप म्हणून ठेवतो, त्या रकमेच्या बरोबरीच्या असतात. असो!
एखादा लेख लिहून माणसांची मानसिकता बदलण्याचा माझा मुळीच विचार नाही; परंतु एखादी गोष्ट वाचल्यावर मी नेहमी त्या गोष्टींवर विचार करते त्याप्रमाणे त्यांच्या मनात या गोष्टीचा विचार चालू व्हावा, असे मात्र मला मनापासून वाटते.
ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत…
ज्यांचे सूर जुळून आले,
त्यांनी दोन गाणी द्यावीत…
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडेसे खाली यावे…
मातीत ज्यांचे जन्म मळले,
त्यांना उचलून वरती घ्यावे!
ही दत्ता हलसगीकर या कवीची कविता मला खूप आवडते. खूपदा मी माझ्या निवेदनातून (त्यांच्या नावासहित) उद्धृतही करते. आज हा लेख लिहिताना परत तीव्रतेने मला या ओळी आठवल्या. आपण काहीच घेऊन येत नाही आणि खूप इच्छा असूनही काहीच घेऊन जाऊ शकत नाही. हे आपण अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकतो, पण ते आपण आपल्या मनाला केव्हा समजावून सांगणार? कधी कधी मला असे वाटते की, आपण दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःलाही कधीतरी शांतपणे बसून काही सल्ले देण्याची आवश्यकता आहे.
मी मला देत असणारे सल्ले कदाचित या लेखातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असेन! काहीही असो जे चांगले आहे ते चांगलेच आहे.
जे जे आपणासी ठावे|
ते ते इतरांसी शिकवावे|
शहाणे करून सोडावे सकल जन||
हे खुद्द समर्थ रामदास स्वामी यांनी सांगून ठेवलेले आहे. मी काय वेगळे सांगणार म्हणा?