- डॉक्टरांचा सल्ला: डॉ. रचिता धुरत
कधीकधी नखाच्या बाजूची मऊ त्वचा कापावी लागते. या शस्त्रक्रियेत रुग्णाला लोकल अनाश्ठेसिया दिला जातो, ज्यामुळे रुग्णाला वेदना होत नाही.
नख हे आपल्या शरीराचा एक दुर्लक्षित अवयव आहे आणि त्यामुळे फार कमी लोक याची काळजी घेताना दिसतात; परंतु जेव्हा नखांना इजा होऊन तिथे वेदना होतात त्यावेळी आपण नखांकडे लक्ष केंद्रित करतो. आज आपण अशाच दुर्लक्षित केलेल्या अवयवाबद्दल बोलणार आहोत. इंग्रोन टोनेल (इन-आत, ग्रोन-वाढलेल, टोनैल-पायाच बोट) ही नखांना सतावणारी एक सामान्य समस्या आहे. वरील चित्रात दाखाविल्याप्रमाणे नखांच्या बाजूच्या त्वचेचे (फोल्ड्स) ४ प्रकार असतात – प्रोक्सिमल, डिस्टल व् लेटरल (दोन). इंग्रोन टोनेल यामध्ये नखाच्या बाजूची (लेटरल नेल फोल्ड) त्वचा प्रभावित होते. पायाच्या बोटांवर दबाव पडल्यामुळे हे फक्त पायाच्या अंगठ्याच्या नखांमध्ये पाहायला मिळते. यामध्ये नखाच्या बाजूच्या त्वचेमध्ये सुज येऊन तिथे जंतूची वाढ होण्याची शक्यता असते.
याची मुख्य कारणे
१. पायाच्या बोटांवर (अंगठ्यावर) दाब पडणारे घट्ट चप्पल वापरणे.
२. पायाच्या अंगठ्याला मार लागून बोटाला इजा होणे.
३. काही जणांमध्ये इंग्रोन टोनेल हे आनुवांशिक पण असू शकते ज्यामध्ये पायाच्या नखांची वक्रता हे एक प्रमुख कारण मानले जाते.
४. अयोग्यपणे कापलेले पायाच्या बोटांची नखे. (वारंवार नखांचे पेडीक्योर करणे.)
५. नखांमधे जन्तुचे संक्रमण.
६. लठ्ठपणा व रक्तामध्ये वाढलेले साखरेचे प्रमाण.
इंग्रोन टोनेलची मुख्य ३ टप्पे आहेत.
१. नखाबाजूची त्वचा सुजणे, लाल होणे व दुखून येणे.
२. नख व नखावरची त्वचा यांच्यामध्ये जंतुसंसर्ग होऊन तिथे पस तयार होणे व पायाला दुर्गंध सुटणे.
३. नखांभोवती त्वचा सुजल्यामुळे चालताना खूप वेदना होणे.
इंग्रोन टोनेलचे निदान
नखांच्या विविध विकारांपैकी इंग्रोन टोनेलचे निदान त्वचा रोगतज्ज्ञांना करणे सहज सोपे आहे; परंतु कधीकधी नख त्वचेमध्ये किती प्रमाणात वाढले आहे हे बघण्यासाठी बोटांचा एक्स-रेची आवश्यकता भासू शकते.
हे कसे टाळावे
१. दिवसातून ३-४ वेळा पायाची बोटे कोमट पाण्यात बुडवणे व त्यानंतर पाय दिवसभर कोरडे ठेवणे.
२. आरामदायक व सैल बूट वापरणे.
३. नखे कापण्यासाठी कटरचाच वापर करणे व नख कापताना विशिष्ट काळजी घेणे जेणेकरून नखांचा फक्त पुढील भाग कापला जाईल व नखांच्या बाजूच्या भागाला स्पर्श होणार नाही.
४. नख व पायाच्या बोटांमध्ये घाम साचू न देणे.
५. ब्यूटी पार्लरमध्ये नखांचे वारंवार पेडीक्योर करणे टाळावे.
उपचार
इंग्रोन टोनेलचे उपचार त्याच्या तीव्रतेनुसार केले जातात.
१. पहिल्या टप्प्यात वर सांगितल्याप्रमाणे पायाची बोटे दिवसातून ३-४ वेळा कोमट पाण्यात बुडवल्यामुळे आराम पडतो. ऑनलाइन काही विशिष्ट प्रकारचे ब्रेसेस उपलब्ध असतात त्यांचा पण वापर करता येऊ शकतो. जर बोटांमध्ये पस साचला असेल तर त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्यानुसार आवश्यक ते अँटीबायोटिक व दुखण्याच्या गोळ्या घेता येतात.
२. दुसरा व तिसरा टप्पा – यामध्ये त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.
शस्त्रक्रिया
१. डेंटल फ्लोससारख्या वस्तूंचा वापर : यामध्ये डेंटल फ्लोसचा धागा बाजूचे नख आणि त्या खालची त्वचा यामध्ये फसवला जातो. त्यामुळे सुजलेली त्वचा नखांपासून दूर राहते व वेदना टाळल्या जातात.
२. जर बोटांमध्ये सूज येऊन पस तयार झाला असेल तर तुमच्या नखांना कदाचित जंतुसंसर्ग झाल्याची शक्यता असू शकते. अशावेळी तुमचे डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक्स व दुखण्याच्या गोळ्या देऊन सर्जरीची गरज सुचवू शकतात. (अशा सर्जरीमध्ये पूर्ण नख काढायची गरज पडत नाही.)
३. नखांमध्ये वक्रता आली असेल तर तो भाग भूल देऊन काढून टाकला जातो व नख जिथून उगवते तो भाग पण कापवा लागतो. कधीकधी नखाच्या बाजूची मऊ झालेली त्वचा देखील कापावी लागते. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला लोकल अनाश्ठेसिया दिला जातो, ज्यामुळे रुग्णाला शास्त्रक्रियेवेळी व नंतर वेदना होत नाही. ही संपूर्ण सर्जरी २०-३० मिनिटांत पूर्ण होऊन लगेच रुग्ण दुसऱ्या दिवसापासून कामाला रुजू होऊ शकतो.
सारांश
इंग्रोन टोनेल त्रासदायक आजार वाटत असेल; परंतु योग्य त्वचा रोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा जर वेळीच उपचार केला, तर पुढील होणारे नखांचे नुकसान टाळता येऊ शकते व आपण आपली दिनचर्या सुरळीत ठेवू शकतो.