- ओंजळ: पल्लवी अष्टेकर
‘क्षमा’ हा दोन अक्षरी शब्द आपल्याला खूप काही सांगून जातो. ज्याच्याबद्दल आपल्याला काळजी असते, त्याच व्यक्तीने आपला अपमान केला, तर आपली तत्काळ प्रतिक्रिया ही रागाची व पश्चातापाची असू शकते; परंतु आपल्याजवळ असलेल्या क्षमाशील वृत्तीने आपण त्या व्यक्तीस क्षमा करून पुढे जाणे रास्त आहे.
संत ज्ञानेश्वरांची थोरवी त्यांच्या क्षमाशील वृत्तीमध्ये आहे. समाजाकडून उपेक्षा, अवहेलना सोसणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची व त्यांच्या तीन भावडांची महती त्यांच्या क्षमा करण्याच्या वृत्तीमुळे अजूनही आहे. ज्या समाजाने या मुलांना वाळीत टाकले, प्रसंगी ही लेकरे उपाशी-तापाशी झोपली, त्या समाजाबद्दल त्यांनी कोणतीही कटुता मनात आणली नाही. क्षमाशील वृत्तीच्या ज्ञानेश्वरांनी पसायदानातून जो जे वांछिल तो ते लाहो…… प्राणीजात, असे म्हणून विश्वशांतीचा संदेश दिला. व्यक्तींनी जीवनात एकमेकांना माफ केल्याशिवाय पुढे जाऊ नये. क्षमा करण्याचे भरपूर फायदे आहेत. नातेसंबंधात सुदृढता येणे, मानसिक आरोग्य चांगले राहाणे, अस्वस्थता कमी होणे, चिंता-आक्रोश यावर ताबा येणे इत्यादी; परंतु आपल्या मुलांना घडविताना बरेचदा पालक टीकेची भूमिका घेतात. ऑफिसात बॉस आपल्या हाताखालच्या लोकांवर वर्चस्व गाजविण्याच्या प्रयत्नात स्वतःचेही नुकसान करून घेतात.
एकमेकांना क्षमा न करण्याने परस्परांविषयी कटुता, राग, तिरस्कार या भावनांचे प्राबल्य वाढू शकते. सतत वेदनेचे ओझे वागवण्यातून क्षमाशीलता आपल्याला मुक्त करते. क्षमा केल्याने मन शांत राहण्यास मदत होते. मन हलके-फुलके, ओझ्याने मुक्त राहते. लोकांचा विरोध मावळतो. जैन धर्मात पर्युषण पर्वानंतर मिच्छामी दुक्कडम म्हणत क्षमायाचना करण्याची पद्धत आहे. नेल्सन मंडेला यांचा गरिबी, साम्राज्यवाद व वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठीचा लढा सर्वांना माहीत आहे. ते म्हणतात, क्षमा करण्याने आत्मा मुक्त होतो. त्यामुळे क्षमा हे एक प्रभावी अस्त्र आहे.’ माफ केल्याने दया, माया, सहनशक्ती या गुणांची वाढ होते.
मीता व गीता या दोघी जीवाभावाच्या बालमैत्रिणी. तुझे नि माझे जमेना व तुझ्यावाचून करमेना, या पठडीतल्या. खेळताना लहान-सहान कारणांनी त्या भांडल्या की, रुसून बसायच्या. आपापल्या घरी जायच्या. घरी गेल्यावर त्या दोघींच्याही आई आपापल्या मुलींचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायच्या; परंतु त्यांनी मुलींचे एकमेकींना खेळू देणे थांबविले नाही. यातून मुली एकमेकींना क्षमा करत पुढे जाण्याचे शिकत होत्या.
सांघिक खेळात प्रसंगी पडते घेणे, हार मानायला शिकणे, क्षमा करायला शिकणे, मानसिक संतुलन राखणे या गोष्टी शिकायला मिळतात. लहानपणी असे खेळ खेळलेल्या मुलां-मुलीत तडजोड, क्षमा करण्याची वृत्ती सहजतेने येते. भूतकाळातील कटू आठवणी उगाळत राहण्याने नाही माणसाला वर्तमानात जगता येते व तो अनेकदा भविष्याच्या चिंतांनी त्रस्त होतो. त्यापेक्षा जास्तीत जास्त वर्तमानकाळात जगल्याने मनुष्य स्वभावाच्या अवस्थेत जगतो व या काळात त्याची सद्सद्विवेकबुद्धी अखंड कार्यरत राहाते.
फादर मार्सेल उविंझा हे चौदा वर्षांचे असताना त्यांना अतिशय वेदनादायी प्रसंगातून जावे लागले. नैरोबी देशातील एका सिव्हिल वॉर (टूटसिस व हुटूस) मध्ये दंगलीत त्यांना त्यांचे आई-वडील, दोन भाऊ व एक बहीण यांना गमवावे लागले. दंगलीत त्यांच्या या कुटुंबीयांची कत्तल करण्यात आली. वर्षानुवर्षे लोटल्यानंतर हा अनाथ मुलगा कॅथलिक फादर झाला आहे. या प्रचंड त्रासावर त्यांनी आपल्या श्रद्धेने मात केली. अखंड क्षमाशीलतेचा स्रोत त्यांच्यातून वाहत असतो. लोकांना क्षमेचे अद्भुत महत्त्व समजावताना ते सांगतात, जोपर्यंत तुम्ही तुमच्याबाबत घडलेली कटू गोष्ट विसरू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही भूतकाळातले कैदी असता”! ते, ज्या व्यक्तीने त्यांच्या कुटुंबीयांना ठार केले, त्या माणसास भेटायला गेले. त्याची तुरुंगातून तर मुक्तता झाली होती. पण, माझ्या हृदयातील वेदना अजूनही मला जाणवत होती. त्याने मला पाहिल्यावर विचारले, ‘मार्सेल, तुझ्या हृदयात माझ्यासाठी क्षमेला जागा आहे काय?’
मार्सेल म्हणतात, ‘त्या क्षणी आम्हा दोघांनाही परमेश्वराचा साक्षात्कार झाला व आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि मला जणू वाटले की, माझेही पाय साखळदंडातून मुक्त झाले आहेत. त्याच्यासारखाच मीही इतके वर्षं मनरूपी तुरुंगात होतो. मी आता मुक्त झालो. समस्त मानव जातीला येशू ख्रिस्त यांनी क्षमावंत होण्याचा संदेश दिला आहे.
रामायणातील एक भावोत्कट प्रसंग. श्रीराम, सीता व लक्ष्मण हे वनवासात असताना बंधू भरत का आला आहे, या भावनेने लक्ष्मण लगेच रागावतो व धनुष्यबाण घेऊन पुढे सरसावतो. तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगतात. त्यानंतर भरत कैकयी मातेविषयी राग प्रकट करून आपले राज्य अयोध्येस येऊन सांभाळावे अशी विनंती श्रीरामांना करू लागतो, तेव्हा श्रीराम त्याला अयोध्येस परत जाण्यास सांगतात व पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, माय कैकयींना दोषी, नव्हे दोषी तात असे म्हणून क्षमाशील वृत्तीने, प्रसन्न, शांत चित्ताने भरताला अयोध्येस परत पाठवून देतात.
अनेक अभ्यासपूर्ण संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की, ज्यांच्यात स्वतःला क्षमा करण्याचीही ताकद आहे, त्यांचे मानसिक व भावनिक संतुलन योग्य राहाते. विचारसरणी सकारात्मक होते. नाती सुदृढ बनतात. परिणामस्वरूप ही व्यक्ती लक्षपूर्वक काम करणे, सक्षमतेने कार्य करणे अशा गोष्टीत गुंतत जाते. क्षमा करणे ही गोष्ट स्वभावतः कठीण वाटते, कारण उत्क्रांतीच्या नियमानुसार मानसिक प्रोत्साहन हे आपले इतरांकडून शोषण होऊ नये या गोष्टीकडे जाते, त्यामुळे एखाद्या प्रसंगात आपल्याला त्रास झाल्यास आपण त्या व्यक्तीवर उलटा वार करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या व्यक्तीलाच टाळायचे पाहतो. क्षमा करण्यात विलक्षण ताकद असते. क्षमा करणे ही दुर्बलता नसून सबलता आहे. याची अनुभूती घेणाऱ्यांना त्यातले मर्म समजते. भगवान श्रीकृष्णांनी भगवद् गीतेत क्षमाशील होण्याचा संदेश दिला आहे.
संत तुकाराम म्हणतात, दया, क्षमा, शांती | तेथे देवाची वसती||