- ऐकलंत का!: दीपक परब
सिने-निर्माता रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या साहसी खेळात अनेक सेलिब्रिटी खतरनाक स्टंट करताना दिसणार आहेत, तर दुसरीकडे रोहित शेट्टी स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल. ‘खतरों के खिलाडी १३’ या साहसी कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीचा हा लोकप्रिय कार्यक्रम येत्या १७ जुलैपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मे महिन्यात या सीझनच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
‘खतरों के खिलाडी १३’साठी निर्मात्यांनी अनेक सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. या पर्वात शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, शालीन भानोत, सौंदर्या शर्मा, मुनव्वर फारुकी, अर्चना गौतम आणि सुंबुल तौकीर खान या स्पर्धकांचा समावेश आहे, तर दुसरीकडे सुंबुलने या पर्वात सहभागी होण्यासाठी नकार दिल्याचे वृत्त आहे.
शिव ठाकरेची क्रेझ
‘खतरों के खिलाडी १३’च्या चाहत्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू होण्याआधीपासूनच शिव ठाकरेची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘आपला माणूस’ अर्थात शिव ठाकरे याने अनेकदा ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पर्वातील स्पर्धकांची निवड करायला रोहित ‘बिग बॉस’च्या घरात गेला होता. त्यावेळी रोहितने घेतलेला टास्क शिव हरला. पण त्याची एकंदरीत खेळी पाहता रोहितने ‘खतरों के खिलाडी १३’साठी शिवला विचारणा केली. ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार असल्याने त्यांची खेळी पाहायला चाहते उत्सुक आहेत. लवकरच या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.