- मुक्तहस्त: अश्विनी पारकर
एकेकाळी ट्विटरलाच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून प्रश्न करणाऱ्या मस्क यांच्या अधिपत्याखाली ट्विटरवर व्यक्तिस्वातंत्र्याचा कसा गळा दाबला जातोय हे वॉशिंग्टन पोस्ट, न्युयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रांनी वेळोवेळी उघड केले आहे.
ट्विटरचा हुकूमशाह एलॉन मस्कने ४ एप्रिलला ट्विटरच्या लोगोवरून चिमणी उडवली आणि श्वानाला बसवले. त्यानंतर ७ एप्रिलला काढूनही टाकले. एलॉन मस्क याने या आधी ज्यावेळी ट्विटरचे सीइओ पराग अग्रवाल यांना डच्चू दिला त्यानंतर स्वत:चा पाळीव कुत्रा डॉग फ्लोकीचा फोटोचा सीईओच्या खुर्चीवर बसलेला टाकत ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये पराग अग्रवाल यांच्यापेक्षा चांगला सीईओ मिळाल्याचे मस्क याने म्हटले होते.
एलॉन मस्क आणि हुकूमशाही याचं फार जुन नातं आहे. ट्विटर हातात घेतल्यापासून वेळोवेळी हे समोर आले आहे. मग ते अग्रवाल यांना डच्चू देणं असो, कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर केलेली कपात असो किंवा ट्विटरवर ब्लू टिकसाठी पैसे आकारणं असो. एकेकाळी ट्विटरलाच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून प्रश्न करणाऱ्या मस्क यांच्या अधिपत्याखाली ट्विटरवर व्यक्तिस्वातंत्र्याचा कसा गळा दाबला जातोय हे वॉशिंग्टन पोस्ट, न्यु यॉर्क टाइम्स या वृत्तपत्रांनी वेळोवेळी उघड केले आहे.
मस्क यांनी ट्विटरच्या लोगोमध्ये ठेवलेला कुत्रा हा जपानी प्रजातीचा आहे. या प्रजातीचं नाव शिबा इनू. तसेच मस्क यांचा पराग अग्रवाल यांना काढून टाकल्यानंतर ट्विट पाळीव कुत्रा फ्लोकीही शिबा इनू प्रजातीचाच होता. शिबा इनू या प्रजातीच्या श्वानाचा लोगो ट्विटरवर ठेवण्याआधी मस्क यांनी शिबा इनूचे अनेक मीम्स शेअर केले आहेत. त्यावेळी डॉजकॉईनही क्रिप्टोकरन्सी नुकतीच बाजारात आली होती. या क्रिप्टोकरन्सीवरही शिबा इनू प्रजातीच्या श्वानाचे चित्र आहे. ही करन्सी बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी तयार केली. डॉजकॉईन ही क्रिप्टोकरन्सी मुळातच इतर क्रिप्टोकरन्सींवर विनोदी पद्धतीने टीका करण्यासाठीच २०१३ मध्ये तयार करण्यात आली आहे. त्यावेळी इतर क्रिप्टोकरन्सींवर टीका करत जॅक्सन पामर यांनी क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना म्हणजे ही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्याच विचारसरणीच्या आर्थिक भल्यासाठी तयार केलेले तंत्रज्ञान आहे, असं अनेकदा म्हटलंय.
त्यानंतर एलॉन मस्क यांनी २०१४ पासून ही डॉजकॉईनबद्दलचे जोक्स ट्वीट करण्यास सुरुवात केली. यामुळे डॉजकॉईनकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आणि डॉजकॉईनच्या किमती वाढल्या. पण या किमतींमध्ये मस्क यांच्या ट्वीट्समुळे फुगवटा आल्याचा आणि त्यानंतर किमती कोसळल्याचा आरोप करत बिली मार्कस आणि जॅक्सन पामर अमेरिकेच्या न्यायालयात गेले होते.
त्यानंतर मागील महिन्यात म्हणजेच ३१ मार्चला मस्क यांनी अमेरिकन न्यायालयात अपील दाखल करत डॉजकॉईन क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणूकदारांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या २५८ अब्ज डॉलरच्या खटल्यातून मुक्तता करावी, अशी मागणी केली होती. बरोबर ४ एप्रिलला ट्विटरने त्यांचा लोगो शिबा इनू या प्रजातीच्या श्वानाचा ठेवला आणि त्यानंत डॉजकॉईनच्या किमती वाढल्या. पण त्यानंतर केवळ तीन दिवसांत म्हणजे ७ एप्रिलला ट्विटरने त्यांचा लोगो पुन्हा चिमणी केला आणि डॉजकॉईनच्या किमती पुन्हा कोसळल्या.
शिबा इनू प्रजातीचा कोसुबू हा श्वान त्याच्या प्रेमळ शिक्षिका मालकीणीमुळे खरंतर डॉजकॉईनवर आला आहे. हा श्वान हा एकेकाळी शिकारीसाठी वापरला जायचा. तो निष्ठावान असून, त्याला पाळणाऱ्या मालकांवर तो खूप प्रेम करतो आणि त्याचे नातेही त्यांच्यासोबत घट्ट असते. कळलं का? मस्कला शिबा इनू इतका का आवडला? आणि त्याने नेमकी काय खेळी केली?