नाशिक: नाशिक पोलीस दलात २१ नवीन वाहने दाखल झाली आहेत. तब्बल एक कोटी ५३ लाख १७ हजार रुपये खर्च करून ही वाहने खरेदी करण्यात आली असल्याने यामुळे पोलिसांच्या रिस्पॉन्स टाइमचा वेग वाढणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
नाशिक शहर पोलिस दलाच्या ताफ्यात नवीन २१ मोटारींची भर पडली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस आयुक्तालयाला मिळालेल्या निधीतून नव्या कोऱ्या मोटारींची खरेदी करण्यात आली आहे. या मोटारी पोलीस सेवेत दाखल झाल्यामुळे आता पोलीस दलाची ताकद अधिक वाढली आहे.
नाशिक आयुक्तालयातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे मागील काही वर्षांपासून वाहने खरेदीसाठी निधीची मागणी केली जात होती. वाहनांची संख्या कमी असल्यामुळे पोलिस गस्तीवर देखील त्याचा परिणाम होत होता. परिणामी शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात अडथळे येत होते.
अखेर जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळाल्याने नवी २१ वाहने पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा या वाहनांच्या ताफ्याला दाखवण्यात आला.