Thursday, July 18, 2024
Homeमनोरंजनएकमेव...‘मधुरा ते मधुरव’

एकमेव…‘मधुरा ते मधुरव’

  • कर्टन प्लीज: नंदकुमार पाटील

अभिनेत्री, लेखिका म्हणून मधुरा वेलणकर-साटम यांची प्रेक्षकांत लोकप्रियता आहे. पण आता ‘मधुरव’ अर्थात बोरू ते ब्लॉक या रंगमंचाच्या आविष्काराच्या निमित्ताने दिग्दर्शिका, निर्मात्या, रंगभूषाकार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यात त्या मुख्य भूमिकेतही पाहायला मिळतात. नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात अशा सर्व क्षेत्रात योगदान देऊन त्यांनी हिंदी, मराठी कलाक्षेत्रात मर्मज्ञ अभिनेत्रीचे स्थान मिळवलेले आहे. अवघ्या वीस प्रयोगांतच राज्यपाल भवन, एस.एन.डी.टी महाविद्यालय, गेटवे ऑफ इंडिया आणि आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथल्या मराठी महामंडळाचे संपर्क साधणे, प्रतिष्ठेच्या पुरस्काराने झालेला गौरव आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकाकडून होणारे कौतुक लक्षात घेता. ‘एकमेव : मधुरा ते मधुरव’ असे विधान करणे योग्य वाटायला लागले आहे. जो येतो, पाहतो तो, तो प्रभावित होऊनच बाहेर पडतो कारण यात मराठी भाषेचा, परंपरेचा, साहित्याचा, विचारांचा श्रीमंत अपूर्व दस्ताऐवज दडला आहे. दोन-अडीच तासांत तो उलघडतो. संगीत, नृत्य, चिंतन, मनन करणारे काही अनोखे पाहिल्याची जाणीव होते. आपण स्वतःही प्रगल्भ झाल्याचा आनंद देणारी ही कलाकृती आहे. त्या निमित्ताने मधुरा वेलणकर-साटम यांच्याशी
साधलेला सुसंवाद.

‘मधुरव’ नेमके आहे काय?

‘मधुरव’ हे माझ्या पुस्तकाचे नाव आहे. कोरोनाच्या काळात हेच निमित्त घेऊन मी जगभरातल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लेखकांशी यूट्यूबच्या माध्यमातून संवाद साधला होता. लेखकांच्या निवडक साहित्याचे वाचन मी या वाहिनीवर करीत होते. ‘आतिषबाजी’ हे निवडक लेखकांचे पुस्तकही मी प्रकाशित केले आहे. या दरम्यान मराठी भाषा समृद्ध आहे, त्याला दोन हजार वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. हे मी वाचून, ऐकून होते. एकीकडे एम.ए.चा अभ्यास करत असताना दुसरीकडे भाषेचे ज्ञान, संवर्धन, संशोधन मी जाणून घेत होती. स्वतः थक्क होईल, असा श्रीमंत मराठी खजिना असल्याचे मला जाणवले. डॉ. समीरा गुर्जर यांचा याविषयी स्वतःचा अभ्यास आहे. शिवाय अनेक वेळा आम्ही एकत्र कामही केलेले आहे. त्यांच्यावर हे साहित्य जागविण्याची जबाबदारी सोपवली. वाचक, प्रेक्षक आणि स्नेहमंडळी यांच्या आग्रहाखातर मी ‘मधुरव’ हे शीर्षक या कलाकृतीला दिले आहे. संगीत, नृत्य, गायन यांचा अंतर्भाव या कार्यक्रमात आहे. मधुरव केवळ वाचन असा प्रचार होऊ नये म्हणून ‘बोरू ते ब्लॉग’ असे समर्पक उपनावसुद्धा जाहिरातीत प्रसिद्ध होत असते.

निर्मितीबद्दल काय सांगाल?

पती आणि निर्माते अभिजीत साटम यांनी यापूर्वी अनेक नाटकांची निर्मिती केलेली आहे. या प्रवासात ‘मधुरव’ ही वेगळी कलाकृती आहे. मनोरंजनाबरोबर प्रज्ञा, प्रतिभा, प्रगल्भता हा आमच्या मराठी भाषेचा विषय आहे. तो केवळ एका ठरावीक गोष्टीमुळे घडू नये. अशा विचारांनी या कार्यक्रमाची बांधणी केलेली आहे. कुठेही, कुठल्याही जागी नेपथ्य सहज हाताळता येईल, अशी रचना नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी केलेली आहे. एकंदरीत सादरीकरण पाहिल्यानंतर कल्पकता आणि श्रम यांचे मिश्रण पाहायला मिळते. संपूर्ण नाटकात मराठी प्रमाण भाषेत संवाद साधला जात असला तरी त्याची बदलती रूपे आम्हाला टप्प्या टप्प्याने सादर करावे लागतात. ही भाषा प्रेक्षकांना कळत असली तरी ती सहज बोलणे अवघड आहे. त्यासाठी वेळ देणारे आणि आणि अभिनयाची जाण असलेले कलाकार आम्हाला हवे होते. ती गुणवत्ता मला आकांक्षा गाडे, जूही भागवत, आशीष गाडे या कलाकार दिसली. हे नाटक फक्त संवादाला प्राधान्य देणारे नाही तर नृत्य, गायन हे सुद्धा गुण त्या कलाकारांमध्ये असायला हवे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, श्रीनाथ म्हात्रे यांचे संगीत, सोनिया परचुरे यांचे नृत्य दिग्दर्शन, श्वेता बापट यांची वेशभूषा या साऱ्या गोष्टी छान जुळून आणल्या आहेत. प्रेक्षक कौतुक करतात, पुरस्काराच्या यादीत या सर्व गोष्टीची नोंद होते हेच मुळात अभिमान वाटणारे आहे.

आतापर्यंतच्या प्रयोगाचा अनुभव काय?

प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. ही मानसिक तयारी मी आणि माझ्या टीमने केलेली आहे. माझ्या संपर्कात येणारा माझा मित्र परिवार हिंदी, इंग्रजीमिश्रित भाषेत बोलणे आता टाळायला लागलेले आहेत. अस्सल मराठीतून लिहिण्याचा, बोलण्याचा प्रयत्न दिसतो. युवावर्ग मराठी भाषा जाणून घेण्याच्या दृष्टीने आवर्जून गर्दी, चर्चा करत असतात. ज्ञानसाधनेचा विषय म्हणून शाळा, महाविद्यालयात याचे प्रयोग व्हायला हवे असेही बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे. सुरुवातीचे काही प्रयोग पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी जे बदल आम्हाला सुचवले ते आम्ही केलेले आहेत. प्रश्न-उत्तराच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांना कार्यक्रमात सामावून घेतो.

या नव्या प्रयत्नाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मी माझे लेखन या नाटकात सादर करते; परंतु सर्वोत्तम ठरलेल्या नवलेखकाचेही साहित्य आम्ही आवर्जून वाचत असतो. अभ्यासक, संशोधक मराठी भाषेविषयी काही माहिती देतात तेव्हा आम्ही त्यातली सत्यता पडताळून त्या माहितीचा अंतर्भाव नव्या प्रयोगात करत असतो. त्यामुळे एकदा पाहिलेले किंवा ऐकलेले तेच पुन्हा कार्यक्रमात सादर होईल, असे नाही. अनंत काळातली ही मराठी भाषा असल्यामुळे ज्ञानाचा झरा हा असाच वाहता राहणार आहे आणि त्याचे प्रतिबिंब आमच्या कार्यक्रमात सातत्याने उमटत राहणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -