Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीअवकाळी पावसाचा सलग दुस-या दिवशीही रौद्रावतार!

अवकाळी पावसाचा सलग दुस-या दिवशीही रौद्रावतार!

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस सुरुच आहे. या पावसामुळे पुरती दाणादाण उडाली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांचे छप्पर उडाले आहे. या पावसाने हरभरा, गहू, मिरची, कांदा, आंबा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. हा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. शेतातील कांदा, गहू पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे

हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तर तळकोकणात दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. काढणीला आलेला शेतातील उभा गहू जमिनीवर अक्षरशः झोपला. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. सोबतच गव्हाची प्रत सुद्धा खालावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे भाव सुद्धा मिळणार नाही. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. जवळपास दीड तास झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले.

राज्यात अवकाळी पावसाचा पून्हा धुमाकूळ, गारपिटीने मोठे नुकसान

तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जाभूळ पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने जाभूळ गळून मातीमोल झाली आहेत. तर अवकाळी पाऊस पडल्याने जाभुळात जंतू तयार होणार त्यामुळे ते फेकून द्यावं लागणार आहे. आंब्यातही पावसामुळे जंतू तयार होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतातूर झाले आहेत.

बुलढाण्यासह परिसरात गारपीट झाल्याने फळ पिकांचे आणि कांदा पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत.

सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे द्राक्षाला दर नाही आणि दुसरीकडे बेदाणा करणाऱ्यास टाकलेल्या शेतकऱ्यांवर या अस्मानी संकटामुळे आणखीन संकट वाढले आहे. दुसरीकडे महावितरण कडून वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांने लाईट बिल कसे भरावे असा प्रश्न उपस्थित करत आता सरकारने तातडीने पंचनामे करुन ठोस मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात २५ जनावरांचा मृत्यू

मराठवाड्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह वीज पडल्याने लहान-मोठ्या २५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ३ व्यक्ती जखमी झाले. मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान विभागात कुठेच झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -