- रविंद्र तांबे
उन्हाळा ऋतू चालू असूनसुद्धा अधून मधून अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. यामुळे फiळबागायतदार चिंतेत पडले असून दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात पाणीटंचाईला सर्वसाधारण नागरिकांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. याचा जास्त चटका ग्रामीण भागातील जनतेला होतो. आता तर मुंबईमध्येसुद्धा महिनाभर १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे. तेव्हा राज्यातील जनतेने पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी हे निसर्गाचे अनमोल रत्न असल्यामुळे त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा पाणी जपून वापरल्यामुळे आपला पुढील काळ सुरक्षित राहणार आहे. तेव्हा पाण्याची बचत करणे आजच्या काळाची गरज झाली आहे.
देशाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना पाण्याचा पण जास्त प्रमाणात वापर होऊ लागला. मात्र त्यावेळी पाण्याचे महत्त्व लोकांना समजत नव्हते. आता पाण्याचे महत्त्व नागरिकांना कळू लागल्यामुळे पाण्याची बचत करण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये लिहिण्याची वेळ आली. शासन तर शासकीय परिपत्रक काढून बचतीचा संदेश देतात. त्याचप्रमाणे पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जनजागृती करण्यात येते. काही ठिकाणी पाणी परिषद घेऊन पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले, मात्र त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळे आता शासनाला पाणीकपात करण्याची वेळ आली.
महत्त्वाची बाब म्हणजे, पाण्याच्या गैरवापरामुळे व त्याच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे आता पाणीटंचाईची वेळ आली. कारण पाण्याचा वापर करीत असताना पाणी दूषित होत असते याची काळजी घेतली जात नाही. उदाहरणार्थ गाडी धुताना पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे पाणी दूषित होते त्याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. दूषित पाण्यामुळे नागरिकांनासुद्धा आपल्या जीवाला मुकावे लागते, हे वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळते. आता तर उन्हाळा असल्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाला जपावे लागते. काही गावामध्ये एक दिवस आड करून एक तास पाणी येते. त्यासाठी प्रत्येक घराला रुपये एकशे पन्नास महिन्याला ग्रामपंचायतीला द्यावे लागतात. सध्या बऱ्याच गावातील लोक पाणी पाणी करीत आहेत. याचा परिणाम आपल्याला पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सभा चालू असताना आपल्याला पाणी मिळत नसल्याच्या रागाने सभेतून बाहेर येऊन सभागृहाला बाहेरून कडी घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे. म्हणजे घोटभर पाण्यासाठी लोक काय करू शकतात याची कल्पना येते. तेव्हा आपल्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये येण्याची वेळ येणार नाही, याची लोकप्रतिनिधीनी काळजी घेणे आवश्यक आहे. हंडा घेऊन ग्रामपंचायतीमध्ये येण्याची वेळ गावातील ग्रामस्थांवर का आली? या प्रश्नाचे उत्तर ग्रामपंचायतील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी शोधले पाहिजे.
पाण्याच्या पातळीचा विचार करता दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होताना दिसत आहे. याला अनेक कारणे असतील. मात्र त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. पाणी हेच आपले सर्वांचे जीवन आहे. तेव्हा प्रत्येकांनी पाण्याची बचत केली पाहिजे. तसेच पाणी दूषित होणार नाही, याची पण दक्षता घ्यायला हवी. त्यासाठी पाणी हे निसर्गनिर्मित असल्याने पाण्याचा योग्य वापर करायला हवा.
महत्त्वाची बाब म्हणजे, पाण्याचा अति वापर होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. पाण्याचा वापर करताना योग्य कामासाठी योग्य प्रकारे वापर करायला हवा. बऱ्याच वेळा पाणी वाया जाते. असे वाया जाणारे पाणी झाडांना घालावे. झाडे जगली तर पाऊस लागेल, पाऊस लागल्यावर झाडाची मुळे पाणी अडवून ठेवू शकतात. बऱ्याच वेळा अशा परिस्थितीकडे दुर्लक्ष होताना दिसतो. यामध्ये घरातील पाण्याचा वापर करण्यासाठी जसे भांडी धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, गाडी धुण्यासाठी, झाडांना पाणी घालणे अशा अनेक कामासाठी बऱ्याचवेळा पाण्याचा अपव्यय होतो. तो कटाक्षाने पाळला पाहिजे. काही राजकीय पुढाऱ्यांनी दाडी करताना पेल्यातून पाणी घेऊन पाणी बचतीचा नवा संदेश मागील दहा वर्षांपूर्वी दिला होता. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष केले.
दिवसेंदिवस सिमेंटची वाढती मैदाने, विकासाच्या नावाखाली डोंगर सपाट करणे, झाडांची कत्तल करणे, नवीन झाडांची लागवड न करणे व दगडांचे उत्खनन करणे अशा अनेक कारणांमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता थेट नदी नाल्यांवाटे समुद्राला मिळते. त्यामुळे पाण्याची पातळीपण कमी कमी होताना दिसते. आपल्या राज्यात सुशोभीकरणाचे काम चालू आहे. हे स्वच्छतेच्या बाबतीत समाधानकारक असले तरी पाण्याच्या स्वच्छतेकडेसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. कारण पाणी हेच मानवाचे जीवन आहे. विकासाच्या वाटेवर झाडांचा अडथळा येत असल्यामुळे झाडे तोडली जात आहेत. मात्र त्या प्रमाणात नव्याने झाडे लावणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी पावसाचे प्रमाणही कमी झालेले दिसत आहे. सध्या पाऊस कधीही लागतो, अशी परिस्थिती पाहायला मिळते. पाणी हे प्रत्येकाच्या जीवनाचा आधार आहे. तेव्हा पाण्याचा विनाकारण होणारा अपव्यय टाळला पाहिजे. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे, तेव्हा भविष्यकाळाचा विचार करता बचत पाण्याची गरज काळाची असे म्हणण्याची वेळ आली आहे.