पंतप्रधान मोदी यांचे तेलंगणातील जनतेला आवाहन
हैदराबाद : तेलंगणाचा विकास आम्ही थांबू देणार नाही. तेलंगणा राज्य सरकार आम्हाला साथ देत नसल्याने कामाला विलंब होत आहे. हे लोक भ्रष्टाचार जोपासत राहिले, जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना अडचणी येत आहेत. राज्य सरकारच्या अडथळ्यांमुळे तेलंगणा त्रस्त आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत तेलंगणातील नागरिकांना तुष्टीकरण, भ्रष्टाचाराशी लढावे लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी तेलंगणा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शनिवारी ८ एप्रिल रोजी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला जोडणाऱ्या पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही १३वी वंदे भारत ट्रेन आहे. यावेळी मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दरम्यान केंद्राच्या प्रकल्पांमध्ये राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान होत असल्याची अप्रत्यक्ष टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर केली.
ते म्हणाले, ही रेल्वे एक प्रकारे श्रद्धा, आधुनिकता आणि पर्यटन यांना जोडणारी आहे. पण, केंद्राच्या प्रयत्नांमुळे होत असलेल्या प्रकल्पांना राज्य सरकारचे सहकार्य मिळत नाही, याचे मला दु:ख आहे. त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत आहे. राज्य सरकारने विकासकामांना आडकाठी न आणता प्रकल्पांना गती देण्यावर भर द्यावा, अशी विनंती नरेंद्र मोदींनी केसीआर सरकारला केली आहे.
देशात डिजिटल पद्धतीने पैशांची देवाणघेवाण वाढली आहे. हे यापूर्वी का झाले नाही? कारण यांना व्यवस्थेवरील आपले नियंत्रण सोडायचे नव्हते. कोणत्या लाभार्थ्याला कोणता लाभ किती मिळणार, यावरही त्यांना नियंत्रण ठेवायचे होते,” असेही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
आमच्या सरकारने भ्रष्टाचार विरोधात कारवाई केली आहे. आपल्या भ्रष्टाचाराची फाईल तर उघडली जाणार नाही ना याची या लोकांना भीती वाटते. त्यांना कोर्टाचा धक्काही बसला. भ्रष्टाचाऱ्यांना कायद्याची भीती वाटते. भ्रष्टाचाराची पुस्तके कोणी उघडू नयेत, अशी सुरक्षा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी अशा अनेक पक्षकारांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही न्यायालयाने त्यांना धक्का दिला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘सरकार सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मॉडेलवर काम करत आहे. आज केंद्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण योजना विकसित केली आहे. आज शेतकरी, व्यापारी आणि छोटे व्यावसायिक यांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवले जातात. असे सांगत सर्वाचे आभारही पीएम मोदींनी मानले.
रेल्वे बजेटमध्ये सुमारे १७ पटीने वाढ
कोरोनाच्या काळात सर्वोत्तम अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे कंबरडे मोडले होते, मात्र भारत पुढे जात आहे. तेलंगणात गेल्या ९ वर्षांत रेल्वे बजेटमध्ये सुमारे १७ पटीने वाढ करण्यात आली आहे. नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम असो किंवा दुहेरीकरणाचे काम असो किंवा इलेक्ट्रिक लाईन बनवण्याचे काम असो. केंद्र सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरण झाले असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.