Share
  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
मौसम-ए-गुल को
हसाना भी हमारा काम होता
गुलमोहर गर तुम्हारा नाम होता…

गाणं इयरफोनवर ऐकत ऐकत मी जवळच्या बागेत चालत असताना नेमकी माझ्या बालपणीच्या मित्राची म्हणजे गुलमोहराची गाठ पडली. त्याची लाल शेंदरी फुलं हवेत हलताना जणू मला विचारत होती, ‘हॅलो! कशी आहेस तू?’
मीही स्मितहास्य करून उत्तर दिलं,
‘मी मस्त! तुला भेटून अजून छान
वाटायला लागलंय.’
रखरखत्या उन्हात गुलमोहराच्या दर्शनाने एकदम आल्हाददायक वाटू लागलं. आमच्या घराजवळच्या बागेत हा गुलमोहर गेली अनेक वर्ष एखाद्या महाराजाप्रमाणे आपलं अढळ स्थान घेऊन विराजमान आहे. त्याच्या आजूबाजूला त्याचे सर्व बंधू बहावा, सोनमोहर ऐटीत
उभे आहेत….आणि त्याच्या लगतच एका ओळीत नाना प्रकारची लहान रोपं, झाडं जणू त्याच्या सेवेसाठी तत्पर आहेत असं वाटू लागतं.

या गुलमोहराचं लहानपणापासूनच मला भारी आकर्षण होतं. आम्हा मैत्रिणींची भेटण्याची हक्काची जागा म्हणजे हा गुलमोहर. या झाडाखाली आमचे वेगवेगळे खेळ, खेळाचे विक्रम, नवनवे प्रयोगाचे बेत ठरवले जात. शाळा दुपारी असल्यामुळे सकाळची न्याहारी झाली की, गुलमोहराच्या झाडाखाली आम्ही भेटायचो. झाडाखाली जमिनीवर पडलेल्या गुलमोहराच्या फुलांचा लाल गालीचा इतका सुरेख असायचा की, आताचं रेड कार्पेटही त्यासमोर फिकं पडेल. आमच्यामध्ये ही फुलं जास्तीत जास्त कोण वेचेल? याची स्पर्धा लागायची. ती वेचता वेचता आम्ही शाळेतील कविता, गाणी गात असू.
लाल फुलांच्या लिपीतला हा
अर्थ मला कळलाsss
अंगणी गुलमोहर फुलला…
हे त्यावेळी रेडिओवर अनेकदा ऐकू येणारं गाणंही आम्ही गुणगुणत असू. फुलं गोळा करून झाली की, मग आमच्या गप्पा रंगू लागत.

एकदा तर आम्ही या फुलांपासून रंगीत परफ्युम बनवण्याची योजना आखली होती. गुलमोहराची फुलं वेचून गोळा करून ती आम्ही घरी नेली. आई ओरडेल या भीतीने ती लपवून एका टोपात पाणी घेऊन हळूच ती फुलं पाण्यात टाकली. मग क्रमाने तीन दिवस रोज फुलं गोळा करून त्यात जमा करणं हा आमचा उद्योग सुरू झाला. आधी वाटलं की, कदाचित दुसऱ्या दिवशी पाण्याचा रंग लाल होईल. पण दोन-तीन दिवस झाले तरी पाण्याचा रंग काही बदलेना. मग वाटलं पाण्याला सुगंध येईल मग त्याचा परफ्यूम बनवू. पण कसलं काय हो, तीन दिवस उलटले तरी त्यात काहीच बदल झाला नाही. आईने माझे हे प्रताप पाहिल्यानंतर चांगलाच दम दिला. आई म्हणाली, ‘हे काय गं आता नसते उद्योग सुरू केलेयस?’

मी म्हटलं, ‘अगं गुलमोहराचा परफ्यूम बनवणार आहोत आम्ही आणि तुला माहितीये का, बघ आता या पाण्याचा रंग कसा लालेलाल होईल.’ आई कपाळाला हात लावत म्हणाली, ‘अगं वेडे, असा कधी कोणी परफ्यूम बनवलाय का? एक तर त्या गुलमोहराला मुळात कसलाही वास नसतो, तर तुम्ही कसं काय त्याच्यापासून परफ्यूम बनवणार आहात? आणि गुलमोहराच्या फुलांमुळे पाण्याचा रंगही असा काही बदलत नसतो बरं…’ झालं! मग आईने मला ते पाणी फुलांसकट ताबडतोब फेकून देण्यास सांगितलं. मी ते नेऊन गुलमोहराच्याच बुंध्याशी ओतलं. माझा हिरमोड झाला खरा, पण दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्याच झाडाखाली भेटलो. प्रत्येकीने घरी हाच अनुभव आल्याचं सांगितलं.

गुलमोहराचा तसा काहीच उपयोग नसतो हे आम्हाला कळलं तरी त्या गुलमोहरावरचं आमचं प्रेम काही कमी झालं नाही. आमच्या भातुकलीत बाहुला-बाहुलीच्या लग्नात गुलमोहराच्या फुलांना पहिला मान असे. शिवाय सजावट, रांगोळी पण गुलमोहराचीच. आता हे सारं आठवलं की हसू येतं. पण गुलमोहराच्या झाडाचा, त्याच्या फुलांचा तसा काहीच उपयोग नसला तरी त्याची फुलं इतर फुलांपेक्षा वेगळी आणि नजरेत भरणारी अशी असतात. पाच पाकळ्यात एक पाकळी वेगळी व नक्षीदार असते, त्यामुळे त्या फुलाचं वेगळेपण मनाला भावतं. गुलमोहराच्या पानांची नक्षीदार रचना त्या झाडाला आणखीनच वेगळेपण देते. गुलमोहराचं झाड इतर झाडांपेक्षा उंच असतं. जरी त्याच्या फुलांचा उपयोग होत नसला तरी त्याची उंची, फुलांचा रंग, पानांची ठेवण यामुळे निसर्गानेच त्याचं वेगळं अस्तित्व निश्चित करून ठेवलंय, असं वाटतं.

गुलमोहोराचं नुसतं असणंदेखील खूप काही देऊन जातं. त्याला पाहूनच मन प्रसन्न होतं. त्याच्या याच वेगळेपणामुळे साताऱ्यामध्ये १ मे रोजी दर वर्षी गुलमोहर फेस्टिव्हल साजरा केला जातो. गुलमोहरावर कविता, चित्रं, लेखन केलं जातं. गुलमोहराबरोबरच इतर झाडांचीही जोपासना करावी, हा समाजोपयोगी संदेश देणारा गुलमोहर फेस्टिव्हल सर्वांमध्ये सकारात्मकता निर्माण करतो.

गुलमोहरचा वापर सजावटीत, पूजेत, केसात माळण्यासाठी असा कुठेच होत नसला तरी तो सर्वांना आवडतो, हवाहवासा वाटतो. त्याचं आकर्षण तसूभरही कमी होत नाही. वसंतातले त्याचे बहरणे सर्व प्राणीमात्रांना सुखद अनुभव देऊन जाते. आपल्या अस्तित्वाने असा निरामय आनंद देण्याचं महान कार्य हा गुलमोहर वर्षानुवर्षं करतोय.

चालता चालता मी गुलमोहोराशी मनोमन गप्पा मारल्या. गुलमोहराच्या झाडाकडे सहज गेले तेव्हा जाणवलं की, तो त्याच दिमाखात उभा होता, कसलीही खंत, खेद वा कटुता त्याच्यात नव्हती जणू सतत आनंदी राहण्याचा मला तो आशीर्वाद देत होता. रस्त्यावर पडलेल्या गुलमोहराच्या फुलांचा लाल सडा येणाऱ्या जाणाऱ्यांचं हसून स्वागत करत होता आणि माझ्या मनाप्रमाणे प्रत्येकाच्या मनात आनंदाचा गुलमोहर फुलवत होता.

Recent Posts

मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली; पण खरंच अतिक्रमण झालेल्या मुंबईतील ११ तलावांचे पुनरुज्जीवन होईल?

मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…

25 minutes ago

Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने धर्म बदलून केला ‘या’ धर्माचा स्वीकार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…

33 minutes ago

धक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार? आणि मृत्यूचे मोल कोण मोजणार?

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…

50 minutes ago

चर्चकडून पगार न घेणारे, पाच लक्झरी कारसह १३७ कोटींच्या संपत्तीचे मालक होते पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…

54 minutes ago

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

1 hour ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

2 hours ago