- गोलमाल: महेश पांचाळ
पवईच्या साईबाबा नगरात राहणारा २९ वर्षीय कुमार सिंग हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. नोकरीबरोबर जोडधंदा असावा, अशी त्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून काही बिझनेस करता येईल का? याची माहिती घेत होता. ऑनलाइन सर्व सर्च करताना कुमारला एलपीजी गॅस वितरक या वेबसाइटचा संदर्भ मिळाला. भारत गॅस वितरण एजन्सी सुरू करता येईल, अशी माहिती या वेबसाइटवर होती. ही माहिती वाचल्यानंतर त्याने मनोमन ठरविले की, भारत गॅस वितरण एजन्सी विकत घेऊन नवीन व्यवसाय करायचा. त्याकरिता त्याने त्या वेबसाइटवर १० ऑक्टोबर २२ रोजी रजिस्ट्रेशन केले.
त्यानंतर त्यांना एलपीजी गॅसच्या नावे असलेल्या ई-मेल अॅड्रेसवरून मेल केले. गॅस वितरण एजन्सीकरिता आवश्यक वेगवेगळे कागदपत्रे त्याने पाठवली. ‘तुम्ही एजन्सीसाठी पात्र आहात’ असा ईमेल त्याला आला होता. तसेच ११ ऑक्टोबर ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान कुमार सिंगला वेगवेगळ्या मोबाइल नंबर आणि गॅस एजन्सीच्या ईमेल एड्रेसवरून भारत गॅस वितरण एजन्सी घेण्यासाठी आपण कसे पात्र झालात याची वेगवेगळी कारणे सांगण्यात आली आणि त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न झाला होता. एजन्सी मिळण्यासाठी आपल्याला आम्ही सांगतो, त्या अकाऊंटवर पैसे जमा करावे लागतील, असेही सांगण्यात आले. त्याला कुमार सिंगने होकार दिला होता. त्यानुसार विविध ऑनलाइन ट्रान्झॅक्शनद्वारे कुमार सिंगने एकूण एकूण सहा लाख ८८ हजार १६ रुपये एचडीएफसी बँकेत जमा केले. १५ जानेवारी शेवटचे ट्रान्झॅक्शन झाले. बँकेत पैसे जमा झाले असल्याने तो निश्चित होता. मात्र दोन दिवसांत आपली फसवणूक झाल्याचा संशय कुमार सिंगला आला आणि त्याने १७ जानेवारी रोजी पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य आणि तांत्रिक तपासातील गुंतागुंत पाहता पवई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. तपासासाठी एक टीम तयार केली. सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या एच.डी.एफ.सी बँक खात्यांच्या बँक स्टेटमेंटचा अभ्यास केला. त्यावेळी आयडीएफसी बँक खात्यातून पुन्हा एचडीएफसी बँकेच्या खात्यांवर पैसे वळते केल्याचे आढळून आले. त्यामुळे एचडीएफसी बँक खात्यासाठी वापरण्यात आलेल्या केवायसी documents चे परीक्षण केले. त्यावेळी सर्व बँक खात्यांचे केवायसी व्हेफिकेशन हे एचडीएफसी बँकच्या एका कर्मचाऱ्याने केल्याची बाब निदर्शनास आली.
याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता एचडीएफसी बँकेतील सेल्स ऑफिसर हा प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पुढे आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. सूरज (बदललेले नाव) याने बाहेरील टोळीच्या संगनमत करून या गुन्ह्यात सहभाग घेतल्याचे कबुल केले. त्यानंतर सेल्स ऑफिसर सूरजला पोलिसांनी अटक केली. सूरजने बँकेतील काही खातेदारांची आधारकार्ड व पॅन कार्डच्या झेराक्स प्रती बाहेरील टोळीला दिल्या. या झेरॉक्स प्रतीचा गैरवापर करून त्या खातेदारांच्या खोट्या करून कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंट उघडली गेली आणि त्या प्रत्येकाचे बँकेचे किट तयार करून या टोळीतील अन्य फरारी आरोपींना दिल्याची माहिती तपासात पुढे आली. सेल्स ऑफिसर सूरज याने या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंट ओपन करण्यासाठी इतर कंपन्यांचे कंपनी कोड वापरून कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंट उपडले, अशी धक्कादायक माहिती समोर आली. प्रत्यक्षात ज्या कंपनीच्या कंपनी कोडवर ही खाते उघडली आहेत, त्या कंपनीमध्ये तसा कोणताही कर्मचारी काम करीत नसल्याची बाब पुढे आली. मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान आरोपी सूरजने एकूण १६५१ कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंट उघडले. आता यातील किती अकाऊंट्स खरे आहेत आणि किती बोगस आहेत याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे अटक आरोपी सूरजने ओपन केलेले दोन अकाऊंट्स तामीळनाडू सायबर पोलिसांनी गोठवले आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या वेबसाइट व ईमेलचा वापर करून अशा प्रकारे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधार पिताणे, (सायबर सेल अधिकारी) आणि त्यांची टीम फरारी आरोपीच्या मागावर आहेत. बँकमध्ये काम करणारा एक कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात सापडला असला तरी, या गुन्ह्यातील खरे सूत्रधार अद्याप बाहेर आहेत. ते सापडतील त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीने किती लोकांना टोप्या घातल्या, हे पुढे येईल.
तात्पर्य : आपल्याला जोडधंदा करायचा असेल किंवा स्वतंत्र धंदा सुरू करायचा असेल, तर केवळ इंटरनेटवरील वेबसाइटवरील माहितीवर अवलंबून राहून पैशांची गुंतवणूक केली, तर ते पैसे पाण्यात जाऊ शकतात, हे वरील उदाहरणावरून लक्षात येईल.