Tuesday, April 22, 2025
Homeमनोरंजनअभिनयासोबतच दैवी अनुभूती

अभिनयासोबतच दैवी अनुभूती

  • टर्निंग पॉईंट : युवराज अवसरमल

हिंदी, मराठी नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये अभिनयाची मुशाफिरी करणाऱ्या कलाकाराने उत्तुंग शिखरावर असताना अचानक अभिनयातून संन्यास घेतल्यास अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. असाच एक कलाकार आहे तो म्हणजे प्रसाद पंडित. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या टर्निंग पॉइंटविषयी सांगून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

माझे संपूर्ण नाव शिवराम प्रसाद त्र्यंबक पंडित. त्र्यंबक माझ्या वडिलांचे नाव, तर शिवराम प्रसाद माझे नाव. मला फिल्म इंडस्ट्रीत प्रसाद पंडित नावाने ओळखले जाते. काहीजण मला पी. पी. या नावाने देखील ओळखतात. मी या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये वयाच्या ३५व्या वर्षी आलो. तसेच कॉलेजमधील अनेक नाटक, एकांकिकेत, राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत बरीच बक्षिसे मिळविली आहेत. माझी काही स्वतः रंगभूमीवर, चित्रपटात जाण्याची इच्छा नव्हती. बेळगांवला आमची वरेरकर नाट्यसंस्था होती. त्यांच्यामध्ये मी काही नाटके केली. त्यानंतर ‘नाट्य प्रपंच’ या नाट्यसंस्थेमार्फत ‘गुड बाय डॉक्टर’ हे प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित नाटक केलं. याचे दिग्दर्शन मी केले व त्यात कुबड्याची भूमिका जी मधुकर तोरडमल यांनी केली होती, ती मी केली. या नाटकाचा पहिला प्रयोग गोव्यात कला अकादमी येथे मास्टर दत्ताराम नाट्य महोत्सवामध्ये शुभारंभाचा प्रयोग केला. त्याला उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध निर्माते मोहन वाघ आले होते. त्यांनी संपूर्ण नाटक पाहिले. नाटकाच्या दुसऱ्या अंकानंतर ते मला येऊन भेटले व मला कडकडून त्यांनी मिठी मारली व मला म्हणाले, ‘तू येथे काय करतोस? तुझी जागा मुंबईत आहे. तू मुंबईला चल.’ मी म्हटलं, ‘नाही हो मला ती आवड नाही, व्यावसायिक नाटकात काम करण्याची. मी कलेचा आनंद घेतो, बस झालं. मला व्यावसायिक रंगभूमीवर यायचं नाही.’

‘तुला जरी गरज नसली तरी आम्हाला तुझी गरज आहे. मी तुझ्या नाटकाचे पाच प्रयोग लावतो. चंद्रलेखा प्रकाशित, प्रसाद पंडित दिग्दर्शित, ‘गुड बाय डॉक्टर.’ तू ये मुंबईला.’ निर्माते मोहन वाघ म्हणाले. मी मुंबईला आलो व त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे खरोखर माझ्या नाटकाचे पाच प्रयोग पाच प्रमुख नाट्यगृहामध्ये लावले. काही निर्माते, दिग्दर्शक यांना त्यांनी या प्रयोग पाहायला आमंत्रित केले आणि म्हणाले की, ‘बघा मी एक कलाकार आणला आहे, कसा वाटतोय ते पाहा.’ सगळ्यांना माझं काम आवडलं. माझी बायको मला म्हणाली की तुम्हाला इतकं सहज मिळालं, इतर लोकांना संघर्ष करून मिळत नाही. तुम्ही जा आणि करा नाटकात, चित्रपटात काम मिळाले तर. मी शेती सांभाळते. मी अगोदर शेती करायचो.

मी मुंबईला आल्यानंतर ‘आभाळमाया’ ही पहिली मालिका मला मिळाली. या मलिकेपासून माझे नाव होत गेले. पुढे अनेक मालिका मला मिळाल्या. हे करत असताना मला प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्नासोबत ‘इत्तफाक’ नावाची झी वाहिनीवरील मालिका मिळाली. त्यात राजेश खन्ना नायक होते व मी मुख्य खलनायकाच्या भूमिकेत होतो. दिव्या दत्ता माझ्या मुलीच्या भूमिकेत होती. ही माझी खलनायकाची भूमिका हिंदी वर्तुळामध्ये खूप गाजली. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे निर्माते मोहन वाघ मला भेटले व मुंबईला घेऊन आले. प्रेक्षकांना माझं काम आवडलं. मला विविध भूमिका मिळत गेल्या. खलनायकाच्या भूमिका जरी मला मिळत होत्या, तरी प्रत्येक खलनायक हा वेगळा होता. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान’ मालिकेतील मोठे काका ही माझी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

माझ्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट आला तो असा आहे की, मी अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी माझ्या आयुष्यात काही दैवी गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यातून माझ्या हातून परमेश्वराने ‘स्वरूप मंदिर’ नावाचं मंदिर बेळगांवला बांधून घेतलं. ज्याला आज कर्नाटक सरकारने ‘टुरिझम सेंटर ऑफ कर्नाटका’ म्हणून घोषित केलं आहे. ते बघणं, त्याची वाढ करणं ही माझी नैतिक जबाबदारी होती. अभिनय क्षेत्रातून जे काही पैसे मिळाले, ते सारे मी हे स्वरूप मंदिर उभारण्यात खर्च केले. अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं म्हटलं, तर स्वरूप मंदिराच्या निर्मितीसाठीच मी मुंबईला अभिनय क्षेत्रात आलो, माझ्या आवडी-निवडीसाठी नाही. नंतर एके दिवशी मला आतून आवाज आला की, चला आता मागे वळा. त्याच क्षणी मी स्वाभिमान मालिकेच्या निर्मात्यांना, मेंनेजमेंटला सांगितले की, या पुढे मी या मालिकेत काम करणार नाही. अर्थात हे मी चार महिन्यांपूर्वी सांगितले होते. ३१ जानेवारी २०२३ पासून मी काम करणार नाही व मी माघारी वळतो. सगळे जण हळहळले, जाऊ नका, असे मला म्हणत होते. माझ्या आयुष्यातला हा ईश्वरी अनुभव फक्त मलाच माहीत होता. मला प्रांजळपणे वाटू लागले की, हा जो ईश्वरी अनुभवी मी घेतला होता, तो प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे. प्रत्येक माणसाला तो ईश्वरी अनुभव मिळण्यासाठी माझं स्वरूप मंदिराकडे वळण अतिशय गरजेचं होत. स्वरूप मंदिराची निर्मिती एका सामान्य मंदिराची नाही. या मंदिराला स्वरूप मंदिर म्हणतात. येथे गुजरात, गोवा, तामिळनाडू, बंगलोर, मंगळूर इ. बऱ्याच ठिकाणाहून लोक येत असतात. त्यांना माहिती देण्यासाठी मी येथे वळलो आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -