Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीठरलं! पुण्यातल्या वज्रमूठ सभेची धुरा 'या' दिग्गज नेत्याकडे!

ठरलं! पुण्यातल्या वज्रमूठ सभेची धुरा ‘या’ दिग्गज नेत्याकडे!

पुणे : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या वज्रमूठ सभेच्या नियोजनातील ढिसाळ कारभारामुळे तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सभेनंतर सारवासारव करताना नाकी नऊ आले होते. उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या नियोजनात पार पडलेल्या या सभेवरून अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा असा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पुण्यातल्या वज्रमूठ सभेची धुरा स्वत: विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे सोपवली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने विविध भागात वज्रमुठ सभेचे आयोजन केले आहे.

पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर दुसरी सभा नागपूरला पार पडणार आहे. या सभेचे नियोजन काँग्रेस आणि मित्र पक्ष पाहणार आहेत.

तर तिसरी सभा मे महिन्यात पुण्यात होणार आहे. या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

या सभेच्या नियोजनासाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने पुणे शहरातील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सभेसंदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले.

पुण्यात होणाऱ्या वज्रमुठ सभेचे ठिकाण ठरले असून शहरातील नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. ही सभा रविवार, १४ मे रोजी होणार आहे. या सभेसाठी मविआमधील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सभेचे नियोजन उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे होते. या सभेत लावण्यात आलेले बॅनर आणि सभेच्या स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ठेवण्यात आलेली वेगळी खुर्ची, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गैरहजेरी, अशा नियोजनातील अनेक प्रकारच्या ढिसाळपणामुळे त्यावेळी चर्चांना उधाण आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -