केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यांनी सर्व राज्यांना १० आणि ११ एप्रिल रोजी रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांचे मॉक ड्रिल करण्यास सांगितले. ८ आणि ९ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
मांडविया याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या आढावा बैठकी दरम्यान, कोविड चाचणी आणि जीनोम सिक्वेन्सिंगसह, कोविड नियमांचा प्रसार वाढविण्यावर चर्चा झाली. आपण सतर्क राहायला हवे आणि भीती पसरवू नये.
याआधी बुधवारी कोविड एम्पॉवरमेंट वर्किंग ग्रुपने नियमित आढावा बैठक घेतली. या बैठकीला डॉ. व्ही.के. पॉल, डॉ. राजीव बहल, महासंचालक, आयसीएमआर आणि इतर वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते.