मुंबई : अखेर ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त झाले, अशी घणाघाती टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
मालाड पश्चिम येथील मढमधील अनधिकृत स्टुडिओची पाडापाडी शुक्रवारी सकाळी सुरू करण्यात आली असून सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रतिकात्मक हातोडा घेऊन कारवाई स्थळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली.
माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने या अनधिकृत स्टुडिओची उभारणी झाली होती. या बांधकामावर कारवाई करावी म्हणून आम्हाला दोन वर्षांचा संघर्ष करावा लागला, अशी माहिती सोमय्या यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मढ येथील पाडापाडी सुरू असलेल्या स्टुडिओमध्ये रामसेतू, आदिपुरुष सारखा चित्रपटांचे शुटींग झाले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि अस्मम शेख यांनी २०२१ मध्ये हे भ्रष्टाचाराचे स्मारक बांधले. टेम्पररी स्टुडिओ म्हणून शंभर फूट उंचीचे बांधकाम केले. उद्धव ठाकरे सरकारचे माफियागिरी आणि भ्रष्टाचाराचे हे स्मारक आज उद्धवस्त करण्याची सुरुवात झाली आहे.
मढ मालाड येथील अनधिकृत स्टुडिओंवर आज सकाळी हतोडा !
असलम शेख, आदित्य ठाकरे, ठाकरे सरकारचा आशीर्वादाने 2021 मधे डझन भर अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात आले
आज पासून तोडण्याचे काम सुरू
मी देखील 11 वाजता visit करणार @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/bkfLmiC4Qv
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 7, 2023
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, माजी मंत्री अस्लम शेख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने डझनभर स्टुडिओ बांधण्यात आले. पाच लाख स्क्वेअर फूट बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये केले. त्याला उद्धव ठाकरे सरकारने मान्यता दिली. या स्टुडिओवर कारवाई करायला दोन वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला. पण आज एक हजार कोटींचे स्टुडिओ तोडायला सुरुवात झाली आहे.
सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मढ मालाड येथील १००० कोटीचे डझनभर अनधिकृत स्टुडीओ पाडण्याचे आदेश आज National Green Tribunal NGT ने दिला आहे, असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने २०२१ मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडीओ बांधण्यात आले. आम्ही न्यायालयात गेलो होतो.
किरीट सोमय्या यांनी मालाड, मढ येथील ४९ बेकायदेशीर स्टुडिओ आणि २२ बेकायदेशीर बंगले पाडण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. तत्कालीन सरकार, मंत्री आणि पालकमंत्र्यांनी या प्रकरणी कानाडोळा केला, असा आरोप सोमय्यांचा होता. स्टुडिओ, बंगले उभारताना महापालिका, सरकारी प्राधिकरणाची परवानगी घेतली नाही. सीआरझेडचेही उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
मालाड पश्चिम मढ येथे माजी मंत्री अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने ४९ बेकायदा स्टुडिओ असल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पी उत्तर विभागाने या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. या पाहणीत सीआरझेडचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यानंतर बेकायदा स्टुडिओना नोटीस बजावण्यात आली होती. पालिकेच्या नोटिसीनंतर मिलेनियम सिटी भाटिया बॉलिवूड व एक्सपेशन यांनी स्टुडिओ स्वतःहून जमीनदोस्त केला. मात्र काही स्टुडिओ मालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने दिलासा देत कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र हरित लवादाने कारवाई करण्याचे निर्देश गुरुवारी दिले.
त्यामुळे आज शुक्रवारी सकाळीच बेकायदा स्टुडिओ जमीनदोस्त करण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह महापालिकेचे निष्कासन पथक या अवैध बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.