Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाIPL 2025बंगळूरुचा धुव्वा उडवत कोलकाताचा पहिला विजय

बंगळूरुचा धुव्वा उडवत कोलकाताचा पहिला विजय

शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्ती विजयाचे शिल्पकार

घरच्या मैदानात कोलकाता शेर

कोलकाता (वृत्तसंस्था) : शार्दुल ठाकूरची वादळी खेळी, रहमानुल्ला गुरबाजचे अर्धशतक आणि वरूण चक्रवर्तीची भेदक गोलंदाजी गुरुवारी कोलकाता नाऊट रायडर्सला हंगामातील पहिलावहिला विजय मिळवून गेली. केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा ८१ धावांनी धुव्वा उडवत मोठा विजय मिळवला.

२०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला तशी बरी सुरुवात मिळाली. परंतु विराट कोहली, फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल हे तारांकीत फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने बंगळूरुचा संघ दबावाखाली आला. दहाच्या रनरेटने धावा जमवण्यात संघाला यश आले होते. परंतु हिच धावगती कायम ठेवण्याच्या नादात विराट कोहली हा सुनिल नरिनचा बळी ठरला. २१ धावा करणाऱ्या विराटला नरिनने त्रिफळाचीत करत बंगळूरुची धावसंख्या ४४ असताना कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच वरुण चक्रवर्तीने फाफ डु प्लेसीसचा अडथळा दूर करत बंगळूरुवर दबाव टाकला. हा दबावातून संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी आपसुकच ग्लेन मॅक्सवेलवर आली. मात्र यावेळी त्याने आपल्यावरचा विश्वास सार्थ करून दाखवला नाही. वरुणने ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेल यांना एकाच षटकात बाद केले. पटेलला तर भोपळाही फोडू दिला नाही. उरलीसुरली कसर सुयश शर्माने भरून काढली. वरुणने ४, तर सुयशने ३ बळी मिळवले. सुनिल नरिनने २ दोन फलंदाजांना माघारी धाडले. शार्दुलला एक बळी मिळवण्यात यश आले. बंगळूरुचा संघ १७.४ षटकांत १२३ धावांवर सर्वबाद झाला.

खराब सुरुवात करूनही कोलकाता नाईट रायडर्सला मराठमोळ्या शार्दुल ठाकूरच्या २९ चेंडूंतील ६८ धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे ७ फलंदाजांच्या बदल्यात २०४ धावांचा डोंगर उभारता आला. शार्दुलच्या या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तत्पूर्वी सलामीवीर रहमानुल्ला गुरबाजला दुसऱ्या बाजूने साथ न मिळूनही त्याने ५७ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. मधल्या फळीत रिंकू सिंगच्या ४६ धावांची जोड होती. व्यंकटेश अय्यर, मनदीप सिंग, कर्णधार नितीश राणा आणि विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल या फलंदाजांनी गुरुवारी निराशा केली. मात्र तरीही शार्दुल ठाकूरने हाणामारीच्या षटकांत बंगळूरुच्या गोलंदाजांना चोप चोप चोपले. त्यामुळे कोलकाताला २० षटकांत २०४ धावा तडकावल्या. बंगळूरुच्या डेविड विल्लेने विलक्षण गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या १६ धावा देत २ विकेट मिळवल्या. त्यात त्याने एक निर्धाव षटक फेकले. कर्ण शर्माने २ विकेट मिळवले. मोहम्मद सिराज, मायकल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -