नवी दिल्ली: हिंडेनबर्ग प्रकरणी काँग्रेसकडून वारंवार मागणी होत असलेल्या जीपीसी चौकशीची गरज नाही असे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेसवरच घणाघाती टीका करत अदानींना क्लीन चिट दिली आहे.
काँग्रेसवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवालातून अदानी समूहाला टार्गेट केले जात आहे. अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेसकडून अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानींबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थीत केला.
शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.