Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीमोबाइल सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित ऑनलाईन गेमवर बंदी

मोबाइल सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित ऑनलाईन गेमवर बंदी

नवी दिल्ली : देशात सध्या मोबाइलवरुन सट्टेबाजी आणि जुगारांशी संबंधित ऑनलाईन गेम्सचे फॅड वाढले आहे. लहान मुलांसह मोठा वर्ग या गेम्सच्या आहारी गेला आहे. या गेम्सवर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेकदा आवाहन करुनही त्यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर येत असतात. याची दखल घेत केंद्र सरकारने आता नवी नियमावली जाहीर केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सट्टेबाजी, ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या जाहिरातींविरुद्ध सूचना प्रसारित करण्यात आल्या असून ऑनलाईन गेमिंस संदर्भातील जाहिराती प्रसारित न करण्याचा सूचना सर्व प्रसार माध्यमांना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन गेम्स सट्टेबाजीचे नवे माध्यम बनले आहे. याच्या जाहिराती सर्रास पाहायला मिळतात. अनेक नागरिक मोबाइलच्या माध्यमातून सट्टा खेळतात. भारतात सट्टेबाजीवर बंदी आहे. असे असतांना या नव माध्यमामुळे कारवाई करता येत नव्हती. यासाठी नियमावली देखील नव्हती. यामुळे केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमानुसार कोणत्याही प्रकारच्या सट्टा आणि जुगाराला मनाई करण्यात आली आहे.

यावर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबतची माहिती दिली. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांची यापुढे केवायसी पडताळणी करणे बंधनकारक राहणार आहे. माध्यम संस्थांसाठी देखील काही मार्गदर्शक तत्व बनवण्यात आली असून या गेम्सच्या जाहिराती वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि अन्य काही प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर याबाबत म्हणाले, की आम्ही रचना तयार करत आहोत. या माध्यमातून एसआरओद्वारे कोणत्या ऑनलाईन गेमला परवानगी देणं योग्य असेल, हे ठरवले जाईल. ऑनलाईन गेमला मान्यता देण्याचा निर्णय या गेममध्ये कोणत्याही प्रकारे बेटिंग किंवा जुगाराचा समावेश नाही, हे लक्षात घेऊन घेण्यात येईल. ऑनलाईन गेमवर बेट लावली जात असल्याचे आढळल्यास, तो त्यास मान्यता देणार नाही.

गेमिंग फेडरेशनकडून स्वागत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने ऑनलाईन गेमिंगसाठी नव्या नियमांचे स्वागत केले आहे. फेडरेशनचे सीईओ रोलँड लँडर्स यांनी ऑनलाईन गेमिंगच्या नियमनासाठी केंद्र सरकारने उचललेले पाऊल निर्णायक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, गेमर्स आणि ऑनलाईन गेमिंग उद्योग बऱ्याच काळापासून याची मागणी करत होते. हे गेमिंग उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास प्रेरित करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -