मुख्यमंत्री शिंदेंकडून ट्रेनला हिरवा झेंडा
ठाणे : सुमारे दोन हजार शिवसैनिक एका विशेष ट्रेनने शुक्रवारी अयोध्येला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे स्टेशनला हजर झाले होते. यावेळी त्यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. जय श्री राम आणि शिवसेनेच्या घोषणा देत कार्यकर्ते या विशेष ट्रेनने अयोध्याला रवाना झाले.
यावेळी त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, बालाजी किणीकर आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. या विशेष ट्रेनने ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण येथील शिवसैनिक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवसेनेचे खासदार, मंत्री आणि आमदार अयोध्येला उपस्थितीत राहणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्या विभागात महाआरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा हा राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते अगोदरच अयोध्येत तळ ठोकून बसले आहेत.
दरम्यान, १६ डब्यांची विशेष एसी लोकल ठाणे स्थानकातून शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास रवाना झाली. यावेळी कार्यकर्तेंचा पेहराव देखील काही आगळावेगळा होता. अनेकांनी जय श्री रामाचे टी शर्ट परिधान केले होते. जय श्री रामाचा जयघोषही यावेळी करण्यात आला. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील हाती भगवा झेंडा घेतला होता. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिंदे यांनी आर्वजून भेट घेतली.