ठाण्यातील एका गरोदर महिलेला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाली, असा कांगावा करत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ही घटना घडल्यामुळे त्याचे स्वरूप मोठे करण्याचा प्रयत्न होत आहे. ठाकरे गटाची रोशनी शिंदे नावाची कार्यकर्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले अनेक दिवस टीका करत होती. १ एप्रिलला टाकलेल्या एका फेसबुक प्रकरणानंतर तिला जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या महिलांनी तिचे ऑफिस गाठले; परंतु रोशनी शिंदे एका खासगी रुग्णालयात दाखल झाली आणि या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला. रोशनी शिंदे गरोदर असताना तिला मारहाण झाली, असा माध्यमातून प्रचार केला गेला. पोलीस दखल घेत नाहीत, अशी तक्रारही ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली. ज्या महिलेला मारहाण झालेली आहे ती महिला गरोदर असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र ही महिला गरोदर नसल्याचे वैद्यकीय चाचणीमधून स्पष्ट झाले. तसेच ज्या रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले आहे, त्याच रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मारहाण झाल्याचे तपासणीवरून दिसत नसल्याचेही दस्तुरखुद डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. आपला बुरखा फाडू शकतो यासाठी या महिलेला आता मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले का? अशी चर्चा आहे.
अबला महिलांवर हल्ला झाला, तर आपल्या समाजात सहानुभूती मिळते. तसा प्रकार ठाण्यात करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला; परंतु ज्यामुळे हा वाद झाला त्या फेसबुक पोस्टमध्ये नक्की काय आहे याबाबत कोणीच चर्चा करत नाही. या युवती सेनेच्या कार्यकर्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली. यामध्ये नरेंद्र मोदी म्हणजे एप्रिल फूल अशी पोस्ट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोण आहे ती तरुणी? तिची काय मिजास की थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकाटिप्पणी करण्याचे धाडस करण्याचे. याला खतपाणी कोण घालत आहे हे लपून राहिले नाही. म्हणूनच उबाठाचे नेते उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे जेव्हा तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात, याचा अर्थ मातोश्रीकडून पंतप्रधानांवर टीकाटिप्पणी करण्याचे काम करावे अशी मूक संमती त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल रोशनी शिंदे हिच्याविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपल्या कार्यकर्तीवर झालेला गुन्हा लपवून तिला मारहाण कशी झाली. ठाण्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांना कसा त्रास दिला जात आहे, हे कायद्याचे राज्य नाही, अशी टिमकी वाजविण्यात उद्धव ठाकरे मागे राहिले नाहीत. म्हणे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. ते फडतूस गृहमंत्री आहेत अशी पातळी सोडलेली भाषा उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन वापरली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत उद्धव ठाकरे यांच्या काळात पालघरमध्ये साधूंची हत्या झाली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर अनेक खोट्या केसेस टाकून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला तेव्हा कायद्याचे राज्य होते असे कधी वाटले नाही का? आता ठाकरे गट ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करतो तेव्हा आपल्या राजवटीत किती जणांवर अन्याय केले याची यादीच तयार होऊ शकते; परंतु मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर बसून कारभार केल्यामुळे स्वत:च्या पक्षाच्या ४० आमदारांना जो नेता सांभाळू शकला नाही, ५६ वर्षे शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष ज्या नेत्याला राखता आला नाही, तो नेता आता सहानुभूतीचे राजकारण करून स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु सहानुभूतीची लाट ही फार काळ टिकत नाही, हे कुणी सांगावे. ज्यांनी शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले, अशा किती जणांची काळजी उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे ते त्यांनी सांगावे. आता पब्लिसिटी स्टंटसाठी ठाण्यात जाऊन महिलेला भेटण्याचे नाटक करू नये, असे जुन्या-जाणत्या शिवसैनिकांची भावना आहे.
दुसरे म्हणजे ठाकरे गटाला कल्पना आहे की, ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली पकड मजबूत ठेवली आहे. त्यामुळे मोर्चा एकट्याच्या बळावर काढता येणार नाही म्हणून महाविकास आघाडीचे नाव या मोर्चाला देण्यात आले आहे. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्या ठाण्यात घराघरांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो दिसतात, त्या शिवसेनेचा वारसा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळावा आहे. तसेच ठाणेकर नागरिकांकडून एकनाथ शिंदे यांना प्रतिसाद मिळत असल्याने, उद्धव ठाकरेंच्या गटाला आपले अस्तित्व दाखवायचे आहे, त्यासाठी हा मोर्चा काढला का? असा प्रश्न पडतो. मोर्चातील प्रमुख मागणी काय तर पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावायचे आहे. अशी मागणी कोण करतो का? एकूण पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी हा मोर्चा बुधवारी काढला होता का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या मोर्चात सहभागी झालेली मंडळी ही मूळची ठाणेकर नव्हती, तर मुंबईसह अन्य भागांतील पक्षांतील कार्यकर्त्यांना टार्गेट देऊन गर्दी जमविण्यास सांगितले होते. तरी या मोर्चामुळे सामान्य ठाणेकर नागरिकांचे मतपरिवर्तन करण्याचा जो केविलवाणी प्रयत्न झाला तो फुसका बार ठरला आहे. एका महिलेला मारहाण झाली तरी पोलीस तिची तक्रार नोंदवत नाहीत, असा कांगावा करत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला टार्गेट करण्याची ठाकरे गटाची व्यूहरचना होती; परंतु त्याला जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने व्हिक्टिम कार्ड वापरण्याचा उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेचा प्रयत्न वाया गेला असेच म्हणावे लागेल.