
तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची पदे भरणार
नवी दिल्ली : देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारी रिक्त जागा भरण्याचे आदेश सरकारने अनेक विभागांना दिले आहेत. त्यानुसार सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलच्या तब्बल १ लाख ३० हजार जागा भरण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण १ लाख २९ हजार ९२९ पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी १ लाख २५ हजार २६२ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि ४ हजार ४६७ पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी, १० टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत.
Ministry of Home Affairs has issued a notification regarding recruitment for around 1.30 lakh posts of constables in CRPF pic.twitter.com/XgyaOzj9GL
— ANI (@ANI) April 6, 2023
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माजी लष्करी कर्मचार्यांच्या बाबतीत समतुल्य आर्मी पात्रता असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड ही शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
प्रोबेशन कालावधी हा दोन वर्षांचा आहे. २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० अशी या पदाची वेतनश्रेणी आहे. अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत नोटीसमध्ये जाहीर करण्यात आली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.