Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीश्रीस्वामीकृपेचे महत्त्व

श्रीस्वामीकृपेचे महत्त्व

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

हात जोडून, डोळे मिटून, ध्यान लावून मनातल्या मनात उच्चारले तरी तुमच्या समोर साक्षात स्वामींची मूर्तीच प्रकट झाली आहे, असा भक्तांना भास होतो व ती स्वामींची तेजस्वी मूर्ती डोळ्यांपुढे येताच भक्ताला खात्री वाटते की, स्वामी त्याची जी काय इच्छा आहे ती लवकरच योग्य वेळी पूर्ण करतील. तसेच मनात जी काही संकटांची भीती असेल, ती अगदी लांब पळून गेलेली दिसेल.

विद्यार्थ्याला त्यांच्या आशीर्वादाने भरपूर अभ्यास करूनसुद्धा मनातली जी परीक्षेची भीती होती, ती समूळ नष्ट झालेली दिसते व तो आनंदी मनाने, उत्साहाने पेपर देऊन येतो व आईला मिठी मारून आनंदाने सांगतो, आई माझा पेपर छानच गं गेला व मी पैकीच्या पैकी मार्क मिळविणार व तो त्या विश्वासाच्या जोरावर ती परीक्षाही उत्तम देतो व चांगल्या मार्काने पासही होतो. तसेच अनेक आजारी पेशंटही औषधे व्यवस्थित घेऊनही गुण न आल्यामुळे स्वामींकडे साकडे घालतात, नाक घासतात, म्हणतात! स्वामी माझे काय चुकले असेल, तर कृपाकरून माफ करा, पण या सर्व क्लेषातून लवकर बरे करा व खारोखरंच काही दिवसात औषधपाणी, व्यायाम, चांगले जेवण, निर्व्यसनीपणा व स्वामींचा उदीरूपी कृपाप्रसादाने लवकरच तो बरा होतो व स्वामींचा नवस फेडायला व स्वामींचे आशीर्वाद घ्यावयास पुन्हा पुन्हा येतो व ताजातवाना होऊन मगच जातो.

महाराष्ट्रात अक्कलकोटच्या, स्वामी समर्थांच्या देऊळांसारखीच अनेक ठिकाणी देऊळे, मठ व मंदिरे छोट्या-मोठ्या भक्तांनी, उद्योगपतींनी एकत्र येऊन, वर्गणी काढून बांधली आहेत व त्या सर्व ठिकाणी भरपूर भक्तांची गर्दी उसळलेली दिसते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे करोडोंनी आर्त, जिज्ञासू, भक्तांचे, रंजल्या गांजलेल्या, स्त्री-पुरुष, मुले, गरीब, श्रीमंत, लुळे-पांगळे, अनाथ सर्वांचेच एक आश्रयस्थान आहेत. श्री स्वामींचा अवतार ही परमपूज्य ईश्वराचीच एक अवतारी अशी प्रेमळ लीला आहे आणि सदगुरू अक्कोलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रितपालक श्रीवल्लभ, विजयदत्त, गुरुदेव भक्त श्री स्वामी समर्थ महाराज की, जय असा जयघोष लाखो भक्त करीत असतात. परमात्मा, आत्मा, धर्माचे व मोक्षाचा मूल स्वरूपी संगम स्वामी समर्थाच्या ठाई झालेला दिसतो. श्री स्वामी समर्थ महाराज हेच सदगुरू रूपाने, परमात्म्याच्या आनंदी रूपाने आहेत. याची आपल्याला प्रचिती येत राहते. या भक्तीतूनच आयुष्य हळूहळू सर्व सेवाभावाकडे वळू लागते. निर्व्यसनीपणाकडे झुकू लागतो. प्रेमळता, बंधुभाव, सहचर्य, दानधर्म, समानता याकडे जास्त कल होऊ लागतो व जास्तीत जास्त सर्वगुणी बनण्याचा प्रयत्न करतो. हसून खेळून सर्वांना मदत करून बंधुभावाने राहू लागतो. श्री स्वामींप्रमाणेच परमश्रेष्ट दत्तावतार व श्रीकृष्णाच्या आशीर्वादाप्रमाणे अनन्य भक्ती भावाने जो कोणी सेवा करील त्याचा सर्व प्रकारचा योगक्षेम मी चालवीनच, तेव्हा वत्सा, भक्ता आता तू कळीकाळाला, संकटाला, जीवनातल्या बिकट प्रसंगांना बिलकूल भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी सर्वशक्तिमान ईश्वररूपच घेऊन उभा आहे, असे सांगून सर्व भक्तांना अभय देणारे थोर महान संत, विभुती, ईश्वरी अवतारच जो नुकताच शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेला तो अजूनही तुमच्या बरोबर आहे. हम गया नही, अभी भी तुम्हारे सामने जिंदा है असे ठामपणे सांगणारे अवतारी संत म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज.

श्री स्वामी समर्थ म्हणजेच साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश ज्याच्यात समावले आहेत, त्या गुरुदत्ताचाच पुढचा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज व त्यांच्याही पुढचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. सूर्याची किरणे जशी मोजता येत नाहीत. चंद्राची शीतलता जशी वर्णन करू शकत नाही, सागराच्या लाटांची जशी खोली व लांबी मोजता येत नाही. त्याचप्रमाणेच या अजात अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांची लीला व अगाध महिमा हजार वेळा सांगितला, लिहिला तरी मन भरूनच
येत नाही.

विश्व उद्धाराचे कार्य करणारे श्री स्वामी समर्थ हे एक तेजस्वी पैलूचे महान संतच होते. जगत्गुरू श्री स्वामी समर्थ हे जात-पात, उच्च-नीच, धर्म-अधर्म, गरीब-श्रीमत, स्त्री-पुरुष यांच्या पलीकडे जाऊन कार्य करणारे महान संतच होते. त्यांचे अस्तित्व आजही लोकांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी त्याचे अस्तित्व जाणवत असते. तरीही या अशा तेजस्वी स्वामींचा परिचय आधुनिक जनांना व्हावयास हवाच. तसेच हल्लीच्या इंटरनेटच्या व्यसनांच्या अति माहितींच्या मोहजालात फसलेल्या तरुण वृद्धांना अशा संत महात्म्यांची माहिती व्हावी म्हणून हा प्रपंच.

स्वामींचा संदेश :
साऱ्या जगात देव एकच आहे
स्वामी समर्थांची वचने: 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वत: वाहतो.
माणसाने आळशीपणा सोडून नेहमी उद्योगी राहावे आणि कोणाला दुखवू नये.
हसत – हसत श्रम करा, शेत पिकवा तुम्हाला चांगल्या कामाचे फळ मिळणारच आहे.
आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा, राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.
मी सर्वत्र आहे; परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.
हम गया नही जिंदा है.

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -