नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा सोळावा हंगाम सध्या उत्साहात सुरू आहे. मात्र देशभरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे या स्पर्धेवरही कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने बीसीसीआयने खेळाडूंना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांकडून समजते.
गेले काही महिने नियंत्रणात असलेला कोरोना आता पुन्हा डोके वर काढत आहे. दिवसभरात नोंद होणारी रुग्णसंख्या आता कमालीची वाढली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने खेळाडूंना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे काळजी घ्या, असा सल्ला बीसीसीआयने खेळाडूंना दिला आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य प्राथमिक जबाबदारी आहे. सरकारकडून जी नियमावली येईल, त्याचे पालन केले जाईल, असेही बीसीसीआयने म्हटल्याचे सूत्रांकडून समजते.