- ज्ञानेश्वरी: प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
भगवद्गीता व ज्ञानेश्वरी हे ग्रंथ यात्रा घडवतात. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर कुठे पोहोचायचे तो मार्ग दाखवतात. तो रस्ता दाखवताना ‘ज्ञानेश्वरी’त माऊली आपल्याला समजेल, झेपेल अशा पद्धतीने आईप्रमाणे बोट पकडतात. त्यासाठी सहजसोपे दाखले देतात. ज्ञानप्राप्तीचा प्रवास सुरू करणारा साधक पुढे ब्रह्मज्ञान-प्राप्तीपर्यंत पोहोचतो. त्याचे वर्णन करताना ज्ञानदेव अठराव्या अध्यायात अगदी यथार्थ दाखला देतात.
या अंतिम टप्प्यात साधकाच्या अंगात विरागीपणा आलेला असतो. ब्रह्मप्राप्ती झाल्यावर या कठोर वैराग्याची गरज संपते. तेव्हा हे वैराग्याचं बळकट कवच साधक सैल करतो. माऊलींनी वैराग्याला ‘बळकट कवच’ असं म्हटलं आहे. त्याचं कारण कवच संरक्षण करतं. त्याप्रमाणे दुर्गुणांपासून / षड्रिपूंपासून बचाव करणारं बळकट कवच म्हणजे ‘वैराग्य’ अशी कल्पना माऊली करतात. ती मूळ
ओवी अशी –
वैराग्याचें गाढलें। अंगत्राण होतें भलें।
तेंही नावेक ढिलें। तेव्हां करी॥ ओवी
क्र. १०७७
‘गाढलें’ म्हणजे बळकट तर ‘अंगत्राण’ म्हणजे कवच/चिलखत होय. वैराग्याचे बळकट कवच साधकाने अंगात घातलेले असते. तेही तेव्हा साधक क्षणभर सैल करतो. अतिशय चित्रमय असा हा दाखला आहे.
यानंतरच्या दृष्टान्तात ज्ञानदेवांनी ध्यानाला ‘तलवार’ म्हटलं आहे. वैराग्य हे कवच तर ध्यान हे खड्ग किंवा तलवार होय. तलवार काय करते? तर शत्रूवर तुटून पडते. परंतु आता दुर्गुणरूपी शत्रूंनी पळ काढला आहे, म्हणून ही ध्यानरूपी तलवार उगारण्याची गरज संपते, म्हणून ध्यानरूपी तलवार हातात धारण करणारी वृत्ती हात खाली करते.
पुढील दाखलेही असेच चित्रमय आहेत. मुक्कामाचे ठिकाण पाहिल्याबरोबर धावणे थांबते, तसे ब्रह्मप्राप्ती झाल्याबरोबर अभ्यास आपोआप राहतात.
देखोनि ठाकिता ठावो। धांवता थिरावे पावो।
तैसा ब्रह्म सामीप्यें थावों। अभ्यासु सांडी॥ ओवी क्र. १०८०
ठाव म्हणजे ठावठिकाणा, मुक्कामाचे ठिकाण, थिरावे म्हणजे थांबतो तर सामीप्य म्हणजे जवळ येणं होय. ब्रह्मप्राप्ती होईपर्यंत खूप अभ्यासाची गरज असते. पण एकदा का ती प्राप्ती झाली की मग अभ्यासाची गरज संपते. इथे ब्रह्मप्राप्तीची तुलना मुक्कामाशी तर अभ्यासाची तुलना धावण्याशी केली आहे.
अशा दृष्यात्मक वर्णनातून ज्ञानदेवांमधील ‘चित्रकार’ दिसतो तर अभ्यासू सांडी, थिरावे पावो अशा आगळ्या शब्दयोजनेतून ‘कवी’ जाणवतो. समाजाला शिकवण देणं, त्यांना शहाणं करणं या तळमळीत त्यांच्यातील सच्चा समाजसुधारक उमगतो. ही शिकवण त्यांना कळेल अशा भाषेत देणं, त्यासाठी सोपे दाखले देणं यातून त्यांच्यातील ‘गुरू’ समजतो.
म्हणजे ज्ञानेश्वर एक प्रतिभावंत कवी, चित्रकार, गुरू व समाजसुधारक म्हणून आपल्याला ‘ज्ञानेश्वरी’तून भेटत राहतात. त्यांच्या या बहुरंगी, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!