- हनुमान जयंती विशेष… : रसिका मेंगळे, मुलुंड – पूर्व
‘अंजनीच्या सुता’ तुला रामाचे वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…
अशा ज्याच्या मनात श्रीराम भक्त असणाऱ्या आणि ज्याच्या तनात असणाऱ्या हनुमान भक्ताला आजच्या हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व देवतांमध्ये हनुमान देखील एक शक्तिशाली व बुद्धिमत्ता देवता आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नाही तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केली हे आपल्याला महाभारतात कळते. प्रभू रामचंद्रांचा सेवक दास्य भक्तीसाठी सदैव तत्पर. रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्त्व म्हणजे रामभक्त हनुमान होय. हनुमान हा चिरंजीव असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे. जिथे जिथे प्रभू रामचंद्रांचे नाव घेतले जाते, त्या ठिकाणी सर्वात आधी येणारा हनुमंत असतो, असे मानले जाते. हनुमंताला अनेक नावाने संबोधले जाते. जसे मारुती, बजरंगबली, महावीर, पवनसुत, पवनपुत्र, केसरीनंदन, वायुपुत्र इत्यादी आहेत. त्याचे शस्त्र गदा हे आकर्षण आहे.
हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळते. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. राजा दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही खीर यज्ञातील अवशिष्ट्य प्रसाद मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. वाल्मिकी रामायणामध्ये अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यानंतर उगवणारे सूर्यबिंब हे देखील पक्वफळ असावे, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वनिशी असल्याने सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता.
सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहूच आहे. या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान असे नाव पडले. या दिवशी सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. हनुमानाच्या मूर्तीची पूजा तेल, शेंदूर, लावून तर रुईच्या पाना-फुलांनी हार चढवला जातो, त्यानंतर आरती करून नारळ फोडला जातो आणि सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. मारुतीचा नामजप जास्तीत जास्त करतात.
जन्मताच वायुपुत्र मारुती हा सूर्याला जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वात वाईट तत्त्व हे ते तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म म्हणजे जास्त शक्तिमान आहे. कठोर भगवान शंकराची उपासना करणारी अंजनी आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करीत असते. तेवढाच आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनीच्या ओंजळीत. ती ध्यानस्थ असते. शंकराचा वायू देवाचा हा प्रसाद ती अतिश्रद्धेने प्राशन करते आणि अंजनीला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमेला मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो. हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे.
कौरव, पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती. भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तीपासून रक्षण सगळ्या देवतांमध्ये फक्त मारुतीलाच मिळतील. मारुतीलाच फक्त वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाही. लंकेत लाखो राक्षस होते. तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. रामभक्त हनुमानाला आपण महारुद्र याही नावाने ओळखतो. सत्ता, संपत्ती यासाठी शपथ घेणारे अनेक भेटतील; परंतु आपल्या भक्तीमध्ये छाती फाडून दाखवणारा रामभक्त हनुमान अवघ्या विश्वात एकच आहे. असे म्हणतात की, खचलेल्या मनाला उभारी देते ती भक्ती, रामनामाची जाणली ज्याने शक्ती. बोले रामभक्त हनुमान की जय… असा नारा दिला जातो.
महाराष्ट्रातील विदर्भात नांदुरा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर १०५ फूट उंच हनुमानाची मूर्ती स्थापित केली आहे. या मूर्तीला पाहण्याकरिता दुरून भाविक येत असतात. समर्थ रामदास स्वामींनी अवघ्या महाराष्ट्रात मारुतीरायाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे. अशा या रामभक्त असणाऱ्या हनुमान भक्तांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. या जयंतीच्या दिवशी ठिकठिकाणी हनुमानाचा जन्म पहाटे सूर्य उगवताना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र थाटामाटात, विद्युत रोषणाईत, आनंदोत्सवात साजरा केला जातो.
प्रभू श्रीराम यांचा निस्सीम भक्त म्हणजे हनुमान. चैत्र महिन्यामध्ये नवमीच्या दिवशी रामनवमी साजरी करून आपण रामाचा जन्म साजरा करतो, तर त्यानंतर बरोबर सात दिवसांनी चैत्र पौर्णिमा रामभक्त हनुमान यांचा जन्म ‘हनुमान जयंती’ म्हणून मोठ्या आनंदाने उत्साहाने थाटामाटात साजरी करतो. या जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावाकडील भागात तर जत्रा भरत असते. संध्याकाळी हनुमानाची पालखी वाजत गाजत संपूर्ण गावांमध्ये मिरवत असते. फटाक्यांची आतिषबाजी, विद्युत रोषणाई असते. हे सर्व चित्र या हनुमान जयंतीला आपल्याला पाहायला मिळते.