अहमदाबाद: इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या हंगामाचा पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. पहिल्या सामन्यानंतर आता पुन्हा एकदा ९ एप्रिलला गुजरात टायटन्स या मैदानावर उतरेल. पण तुम्ही जर या सामान्याला हजेरी लावण्याच्या तयारीत असाल तर सावधान! तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.
आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियममधून चोरांनी तब्बल १५० मोबाईल चोरल्याचे गुजरात पोलिसांनी सांगितले आहे. या सर्वांनी पोलीस स्थानकात तक्रारी दिल्या आहेत. यामधील अनेक तक्रारदारांनी सांगितले की, त्यांनी आयफोन हफ्त्यावर घेतला होता. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसेच तक्रारदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, तब्बल १५० हून अधिक मोबाईल चोरी झाल्यामुळे अहमदाबाद पोलीस सतर्क झाले असून ९ तारखेच्या सामन्यापू्र्वी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी करण्यात एखाद्या टोळीचा हात असू शकतो अशी शंकाही पोलिसांनी व्यक्त केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चोरी करणारी टोळी मोबाईल चोरून डिव्हाइस बदलत असल्याचे समजले आहे.