Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणचहाच्या मळ्यात फिरायला आसाम कशाला? चला कोकणात, फुललाय 'चहाचा मळा'

चहाच्या मळ्यात फिरायला आसाम कशाला? चला कोकणात, फुललाय ‘चहाचा मळा’

दापोलीचे बागायतदार विनय जोशी यांचा चहा लागवडीचा अनोखा प्रयोग

  • रूपेश वाईकर

दापोली : कोकणातील परंपरागत असलेल्या नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागांच्या बागा कोकणात तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात क्षणार्धात होत्याच्या नव्हत्या झाल्या. अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या. त्यातच निसर्गाच्या लहरी हवामानामुळे आंबा पिकही दरवर्षी संकटात सापडत आहे. मात्र कोकणातील चिवट शेतकरी या संकटांपुढे शरणागती न पत्करता आता येथील शेतकरी बागायतदार शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. असाच एक अनोखा प्रयोग कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील मुर्डी गावातील बागायतदार विनय जोशी यांनी केला आहे. इतकंच नव्हे त्यांनी काही महिन्यापूर्वी चहाच्या रोपांची लागवड सुद्धा केली व त्या रोपांनी आता उत्तम प्रकारे तग धरला आहे. त्यामुळे आता हा नवीन अनोखा प्रयोग यशस्वी होण्याची खात्री बागायतदार विनय जोशी यांना आहे.

२०२०च्या भीषण निसर्ग वादळानंतर दापोली तालुक्याचा बराचसा बंदर पट्टा (समुद्र किनारी भाग) उध्वस्त झाला. नारळ, सुपारी, फणस, कोकम, आंबा बागा डोळ्यादेखत आडव्या झाल्या. एकेकाळच्या भरगच्च, हिरव्यागार बागा डोळ्यादेखत समूळ नष्ट झाल्या. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही पण होत्याचं नव्हतं होणं म्हणजे काय हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आणि तेव्हापासूनच बागेत काहीतरी नवीन करायचं डोक्यात होतं. यातूनच हा नवा प्रयोग सुचला, असे जोशी म्हणाले.

कोकणात अनेकांनी नारळ सुपारीच्या बागा परत उभ्या करायला घेतल्या पण आम्ही बागेला दोन वर्ष विश्रांती दिली आणि विचार करत होतो नवीन काय लावावं? तेवढ्यात आसामचा चहा डोळ्यासमोर आला. आसाममधील पीकपाणी, झाडं, फळं आणि लहान सहान तण सुद्धा कोकणात उगवतात. मग गेल्या वर्षीपासून “मुर्डी चहा लागवड प्रकल्प” सुरु केला आणि आता लागवड संपली आहे. वर्षभरातल्या रोपांच्या कामगिरीवरून चहा इथे चांगला तग धरुन एक पीक म्हणून पुढे येईल अशी आता खात्री वाटत आहे.

सलग काही वर्ष नियमितपणे वर्षभर पडणारा पाऊस आणि त्यामुळे कोकणचं सोनं हापूस आंबा याची दरवर्षी दैना होत आहे. त्याला पर्याय म्हणून आतापासूनच काही पर्यायांवर विचार आणि प्रयोग सुरु केल्यास एखादी नवी पीक पद्धती हाती लागेल. त्यादृष्टीने चहा हा एक प्रयोग आहे, अशी अभ्यासपूर्ण माहिती त्यांनी दिली.

विनय जोशी यांचे वडील विनाभाऊ जोशी हे २००२ मध्ये मी गारो हिल्स, मेघालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना (विनाभाऊ) व स्व. मुकुंदराव पणशीकर, जयंतराव यांच्या सोबत तिथे आले होते. ते चहा भक्त होते आणि चाय बागान बघायची त्यांना तीव्र इच्छा होती. पण गारो हिल्सचा चहा बेल्ट असलेला रोंग्राम- दादेंग रस्ता त्याकाळात अतिरेकी कारवाया, खंडणीसाठी अपहरण यासाठी कुप्रसिद्ध होता. त्यामुळे तिथे जाणं शक्य झालं नाही. आसाम, मेघालय परिसरात चहाच्या मळ्यांना ‘चाय बागान’ म्हणण्याची पद्धत आहे. यानिमित्ताने आता इथेच चाय बागान उभी राहत आहे हा एक मोठा योगायोग आहे, अशी ही एक आठवण बागायतदार विनय जोशी यांनी सांगितली.

आसाम परिसरातील अनेक वनस्पती कोकणात उगवतात त्यामुळे चहा लागवडीचा हा प्रयोग कोकणातही यशस्वी होईल, असा विश्वास विनय जोशी यांनी ‘प्रहार’ प्रतिनिधीजवळ बोलताना व्यक्त केला. विनय जोशी हे आपल्या अन्य सामाजिक कामाच्या माध्यमातून देशातील अनेक भाग फिरले आहेत. त्यामुळे आसाम व कोकण येथील अनेक गोष्टीत साधर्म्य असल्याचं ते सांगतात. अक्षरशः आसाम आणि कोकण यात कोकणस्थी खोचकपणा आणि बोचरी भाषा सोडून अन्य सर्व गोष्टी समान आहेत असं म्हणू शकतो अशी मिश्किल टिपणीही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे गेल्या वर्षभरातील रोपांची लागवड व रोपांची उत्तम असलेली सद्यस्थिती यावरून या आपल्या अनोख्या नव्या प्रयोगाला नक्कीच यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -