Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआमचं आम्ही पाहून घेऊ, आम्हाला कोणाची गरज नाही!

आमचं आम्ही पाहून घेऊ, आम्हाला कोणाची गरज नाही!

  • फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

अनेकदा अनेक ठिकाणी हे वाक्य आपण ऐकत असतो, आमचं आम्ही पाहून घेऊ, आम्हाला कोणाचीच गरज नाही, आम्ही खंबीर आहोत, आम्ही भक्कम आहोत तुमचा-आमचा संबंध नाही, तुमच्यावाचून आमचं काही अडणार नाही, आम्ही समर्थ आहोत आमचं बघायला, आम्हाला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. किती प्रचंड अहंकार, किती फाजील आत्मविश्वास, किती टोकाची नफरत, दुस्वास या वाक्यामध्ये ठासून भरला आहे हे बोलणाऱ्याला माहिती नसते का? किती तिरस्कार करू शकतात माणसं एकमेकांचा? का आणि कशासाठी? सगळं जग इतकं सुंदर आहे, सगळी माणसं चांगली आहेत, फक्त त्यांच्यातला चांगुलपणा ओळखण्याची आपली दानत नाही, पात्रता नाही. अनेकांना तरी हेही समजत नाही की, कोणाच्या आयुष्यात कधी काय घडेल, याचा भरवसा नाही. कोण कधी आपल्यातून कायमचा निघून जाईल, हे सांगता येत नाही. तरी देखील एकमेकांना तोडून, संबंध खराब करून लोकांना कसा आनंद मिळतोय? सतत तुम्ही तुमचं, आम्ही आमचं या कृतघ्न विचारसरणीवर कसं आयुष्य जगता येतं हे अशा लोकांनाच ठाऊक! सतत इतरांबद्दल मनात संशय, राग, चीड, दूषित दृष्टिकोन आणि द्वेष अशा माणसांमध्ये ठासून भरलेला असतो.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, माणसाला माणसच लागतात. सगळा समाज, गोतावळा, मित्र-मैत्रिणी, शेजारी, ओळखीचे, सहकारी, नात्यातले, घरातले, सख्खे-सावत्र, बाहेरचे… प्रत्येक जण आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. सगळ्यांसोबत राहणाऱ्या, सगळ्यांना आपलंस करणाऱ्या, कोणताही राग मनात न ठेवता सगळ्यांमध्ये मनमोकळे बोलणारा, हसणारा, वेळी-अवेळी मदतीला धावणारा कोणीतरी प्रत्येकाला हवा असतो, दोन जण असतील त्यात तिसरा आला, तर तो एखादी उणीव भरून काढतो. चार जण एकत्र असतील, तरी पाचवा जीवाला जीव देणारा असला की, अजून सुरक्षित वाटते.

प्रत्येकापासून मिळणारा आधार वेगळा, मदत वेगळी, मार्गदर्शन वेगळे, प्रत्येकाशी बोलल्यावर मिळणारा धीर, मायेची ऊब वेगळी. प्रत्येकाकडून शिकण्यासारखे खूप काही वेगळे, अनुभवण्यासारखे खूप वेगळे. प्रत्येकाचे आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे! आपल्याशी संबंधित प्रत्येकाला आपल्यासाठी आपल्या आयुष्यात दिलेली भूमिका वेगवेगळी, कर्तव्य वेगवेगळे, जबाबदाऱ्या वेगळ्या त्यामुळे आपल्याला माणसं लागतातच आणि ती हवीच.

आपण आपले, आपल्या भोवतालचे वर्तुळ जितके छोटे ठेवू, तितकं आपण संकुचित विचारसरणीचे राहणार. जितके आपण स्वतःला आकसून घेऊ, आपल्यापुरतं पाहू तितकं आपण बुरसटलेले, खुजे आणि तोकडेच राहणार. आपण जितकं इतरांचं ऐकायला, इतरांना समजावून घ्यायला, व्यापक दृष्टिकोन स्वीकारायला नकार देऊ तितकंच आपली प्रगती खुंटत राहणार.

आपल्याला जन्मजात लाभलेली नाती, आपण जमावलेली नाती, नव्याने निर्माण होत जाणारी नाती, ओळख सगळ्यांची एकमेकांना गरज असते, काहीतरी एकमेकांप्रति कर्तव्य असते, काहीतरी घेणं-देणं असतं, ऋणानुबंध असतो म्हणून सगळे जोडलेले असतात. वास्तविक दैवाने, नशिबाने जोडलेले नातेसंबंध, एकत्र आणलेली माणसं आपल्या अहंकारामुळे तोडण्याचा आपल्याला हक्क नसतो. तसे केल्याने अनेक चुकीचे वाईट प्रसंग आपल्यावर ओढवू शकतात. गैरसमज ठेवून, चुकीच्या कल्पना डोक्यात घालून, चुकीच्या लोकांचं ऐकून आपण आपली माणसं स्वतः लांब करतो, तोडतो, एकमेकांना सोडतो, वेगळे होतो, अलिप्त होतो. फक्त आपलं पाहण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला कोणाचीच गरज नाही, आपण किती स्वावलंबी आहोत, कोणावर अवलंबून नाही, कोणाला बांधील नाही, कोणाची गरज नाही, कोणाचं ऐकून घ्यायचं नाही, कोणाशी पटवून घ्यायचं नाही, इतरांना झटकून टाकायचं, झिडकारून टाकायचं असं वागणं सुरू होतं.

आपण जर असं वागत असू, तर आपण माणूसच नाही हे पहिले लक्षण आपण लक्षात घ्यावं. जनावर सुद्धा कळप करून एकत्र राहतात पण माणसं मात्र वेगळी होण्यात धन्यता मानतात, भांडून मन दुखावून, सगळं विस्कळीत करून वेगळी होण्यासाठी प्रयत्न करतात. वेगळे होऊनच आम्ही कसं सुखी-समाधानी-आनंदी आहोत, हे दाखवण्यासाठी भरपूर प्रयत्नसुद्धा करतात.

वेगळं होणं, वेगळं राहणं, आपलं आपण बघणं, कोणाच्या अध्यात-मध्यात नसणं, घरातल्या घरात पण ग्रुप असणं, भेदभाव असणं, कुटुंबात, समाजात पण प्रत्येकाला स्वतःशीच, फक्त स्वतःच्या जवळच्या माणसांशी, फक्त आपल्या सोयीने वागणाऱ्या लोकांशी घेणं-देणं असणं, त्यांनाच जवळ करणं अत्यंत हिन दर्जाच्या मनोवृत्तीची ही लक्षण असतात.

आपल्याला चांगलं सांगणारी, आपल्याला मार्गदर्शन करणारी, काही महत्त्वपूर्ण मदत करणारी आपल्याला जवळ असलेली माणसं सुद्धा अशी हेकट, हेकेखोर आणि हटवादी लोकं दूर करतात आणि स्वतःचं प्रचंड नुकसान करून घेतात. आपण कितीही बुद्धिमान, हुशार, अनुभवी असलो तरी या माणसांना आपल्याशी काहीही घेणं-देणं नसतं. आपण कितीही मोठ्या आघाड्यांवर काम करणार असलो तरी ही माणसं आपल्याला त्यांच्या लायकीनुसारच वागवतात.

आपल्याला कोणाची मदत घ्यायला, सहकार्य घ्यायला, कोणाचं काही ऐकून ते समजावून घ्यायला, त्याप्रमाणे वागायला खूप कमीपणा वाटतो. इतरांशी काहीही घेणं नाही, त्यांनी त्यांचं पाहावं, ते जाणे, त्यांच्या समस्या जाणे, आपल्याला काय पडलंय, आपण भलं, आपलं आयुष्य भलं, इतकी संकुचित भावना लोकांमध्ये आढळते. अनेकजण असे आहेत, ज्यांना इतरांशी मग ते घरातले असोत, बाहेरील असोत त्यांच्या भावनांशी, सुख-दुःखाशी, त्रासाशी, त्यांच्या विचारांशी काहीच घेणं-देणं नसतं. स्वतःहून अशा लोकांना काहीही शिकवायला, समजवायला जाऊ नये. वेळप्रसंगी आपल्या डोळ्यासमोर जरी अशी लोकं चुकताना दिसली, त्यांचं नुकसान होताना दिसलं, तरी फुकटमध्ये पडून आपल्या सूचना देऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नये. अशा लोकांना परत परत त्यांना आपली गरज नाही, हे सांगण्याची वेळ येऊ देऊ नये. आपण विनाकारण त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करतोय, आपण आपल्या मर्यादेत राहावे, हे त्यांनी आपल्याला सुनवावे, अशी परिस्थिती आपल्यावर ओढवून घेऊ नये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -