मुंबई : ‘उद्धव ठाकरे हा महाफडतूस माणूस आहे. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या, कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यांनी बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
माझे सैनिक जर रस्त्यावर उतरले तर घरात घुसून मारतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव, हे तुमचे काम नाही. मातोश्रीला दरवाजे किती आहेत हे तरी माहित आहे का तुम्हाला? कोणत्या दरवाजाने कुठे गेलं आणि कुठून कुठे जाता येतं, हे तरी कळतं का? तेव्हा अशी भाषा करणे सोडून द्या. यापुढे कोणत्याही सभेत जर असे काही वाईट बोललात आणि काही घडले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिला.
राणे म्हणाले की, नेमके फडतूस कोण हे राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात पाहिले आहे. कार्यतत्पर, धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र याखेरीज दुसरी ओळखच नसलेल्या कर्तृत्वशून्य उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशोभनीय भाषेत टीका करू नये. अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
सत्ता गेल्याच्या नैराश्यातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल असूया असल्यानेच उद्धव ठाकरे खालच्या पातळीवर जाऊन असभ्य शब्दांत टीका करत आहेत. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. २०१९ मध्ये भाजपाच्या आधारावर ज्यांचे आमदार निवडून आले त्याच भाजपाला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादाला सोडचिट्ठी दिली.
मुख्यमंत्री असताना राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यासारख्या पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण दिले, देशद्रोही शक्तींशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांना पाठीशी घातले, असेही राणे म्हणाले.
गुंडगिरी मोडून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. उद्धव ठाकरेंनी त्याची चिंता करू नये. त्यांनी मातोश्री १ आणि मातोश्री २ ची चिंता करावी. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर बसून राज्याला अधोगतीकडं नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसवाले बोलावतात मिटिंगला. अजित पवार त्यांना बघून डोळे मारतात. उद्धव ठाकरे हे फक्त शिव्या द्यायचं काम करू शकतात, बाकी काही नाही, असे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा राणे यांनी आज आपल्या शैलीत जोरदार समाचार घेतला. ठाण्यात एक घटना घडली. त्याची ब्रेकिंग न्यूज करण्यात आली. काहीतरी भयानक घडलंय, असे वातावरण तयार करण्यात आले. ते निमित्त करून राज्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्याला गेले. जसे एखाद्या गरोदर महिलेला मार लागला आहे आणि आता तिची डिलिव्हरी करायची आहे, अशा थाटात हे तिथे पोहोचले. आता यांनी हे नवीन काम सुरू केले आहे. पदावरून उतरल्यानंतर… माझ्याकडे डॉ. उमेश घाडीगावकर यांचे प्रमाणपत्र आहे. ही महिला गरोदर नव्हती. तिला मारही लागलेला नाही. मात्र, ठाकरे यांनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जी भाषा वापरली ती अत्यंत भयानक अशी आहे. अत्यंत असभ्य, शिवराळ अशी भाषा आहे. एखाद्याला एखाद्याविषयी असुया असेल, मत्सर असेल, तेव्हा जशी भाषा वापरली जाईल तशी भाषा वापरली गेली. मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला अशी भाषा शोभत नाही, असे राणे म्हणाले.
आपल्या काळात काय घडले? कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा कसे वाजले होते? आपण अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, त्या अडीच वर्षांत अडीच तासही आपण मंत्रालयात गेलो नाही, हे सर्व ठाकरे विसरले आहेत. सुशांत सिंगला का मारले? ती आत्महत्त्या नव्हती. दिशा सालीयनवर अत्याचार करून तिला का मारले? तिची केस ओपन का झाली नाही? वाझे उद्धव ठाकरेंचे जावई होते का? नोकरीवर नसताना त्यांना नोकरीत घ्यायचे आणि गुन्हा विभागासारखा विभाग द्यायचा…
आता ते जेलमध्ये आहेत. गुन्हेगाराला मदत करणारा मुख्यमंत्री आपण होतो हे ते विसरलेत का? त्यांच्या काळात देशाबाहेरील शक्तींशी संबंध ठेवणारे नवाब मलिक मंत्रिमंडळात होते. दोन-तीन मंत्री तुरुंगात गेले. गृहमंत्री यांची जेलवारी झाली, हे ते विसरले का, असा सवाल त्यांनी केला. तुम्ही कोणावर बोलता? फडणवीसवर? पंतप्रधान नरेंद्र मोदींवर? अमित शाहांवर? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर? तुमची लायकी तरी आहे का? कोण आहात तुम्ही? बाळासाहेबांचे पुत्र सोडले तर तुमचे कर्तृत्व काय? तुम्हाला माहिती आहे का देशाच्या विकासामध्ये, राज्याच्या विकासात काय तुम्ही केलं? कोणत्या विषयाची तुम्हाला माहिती आहे? बजेट माहिती आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत? कामगारांचे प्रश्न माहिती आहेत? विद्यार्थ्यांचे प्रश्न माहिती आहेत? कसले ज्ञान आहे तुम्हाला? बाळासाहेबांचे नाव आणि शरद पवारांची मेहरबानी, त्यामुळे मुख्यमंत्री झालात. त्यासाठी हिंदुत्वाचा त्याग केला. बाळासाहेब असते तर ते शक्य नव्हते. हिंदुत्वाचा त्याग करून ते कोणतेही पद घ्यायला तयार झाले नसते. आयुष्यभर त्यांनी कोणतेही पद भूषवले नाही. त्यांच्याकडे एक निष्ठा होती. कडवटपणा होता. प्रामाणिकपणा होता… त्यांच्यातला एकही गुण तुमच्यात नाही. साहेबांच्या नखाची सर तरी आहे का, असा सवालही राणे यांनी विचारला.
माझे सैनिक मैदानात आले तर घरात घुसतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोण सैनिक? तुम्ही का नाही येत मैदानात? ५५ वर्षांत कोणाच्या कानफटात तरी मारली काय? शिवसेना वाढवण्यामध्ये तुमचे योगदान काय? सैनिकांना सांगता रस्त्यावर उतरा. अडीच वर्षे मुख्यमंत्री होता. जे काय कमावलं, त्यातलं काय दिलं या शिवसैनिकांना? कोणी आजारी पडला तर त्यांना पैशाची मदत केली? कोरोनामध्ये कोणी गेला, त्याच्या घरच्यांना काय दिलं? दानधर्म केला? औषधांच्या खरेदीमध्येसुद्धा आदित्य ठाकरेंनी १५% घेतले. ही पापी माणसं…
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून किती कामे करून घेतली गोड गोड बोलून… मी त्यांना सांगत होतो, ३९वर्ष मी यांच्याबरोबर राहिलो आहे. हे, आणखी एक नाव सांगितले, दगाबाज आहेत… नंबर एक खोटारडे आहेत. आता त्यांना मी जे सांगत होतो ते पटले आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय लिहिलंय? त्यांची औकात आहे काय? माझ्यासारखा नेता असता तर बोलवून विचारले असते. असे लिहू नये म्हणून दम दिला असता. ते न करता हे धावले त्यांच्या बाजूने… सपत्नीक… कुटुंबाला घेऊन… त्याचं कारण काय? हे एकटे चालू शकत नाहीत. सत्ता गेली… मुख्यमंत्रीपदही गेले… आयुष्यात कधीही मिळणार नाही आता… एकच खुर्ची इकडेतिकडे फिरवावी लागते. कारण, हा माणूस इतर खुर्च्यांवर बसू शकत नाही. त्यांच्या पाठीला सपोर्ट लागतो. मागून टेकू लावावा लागतो. लोकांना वाटते सिंहासन ठेवले आहे. सिंहासन चालले आहे. मग ब्रेकिंग न्यूज होतात. त्यांना आणि मला एका स्टेजवर बसवा. मग कोणामध्ये हुशारी आहे ते कळेल. साहेबांच्या मुलांमध्ये की त्यांच्या शिष्यामध्ये?
तुम्ही देवेंद्रना फडतूस बोलता… याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? ते पाच वर्षे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेते होते. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी युती केली नसती तर तुम्ही सध्या जितके आहात तितकेही आला नसता… रस्त्यावर येण्याची भाषा करता? तुम्ही सांगा तिथे मी येतो. तुम्ही सुपारी देऊनही मला मारू शकला नाहीत. एकही भाई तुम्ही सोडला नाही. सगळे फोन करून सांगायचे… दादा संभालके रहना. मेरे पास काम आया था. मै नही कर रहा हू, लेकिन दुसरा कोई करेगा. हे यांचे काम.
एखादा शिवसैनिक नावारूपाला आला की मागे लागतात… असा खोटारडा माणूस महाफडतूस आहे. कोणच्याच कामाचा नाही. ना देशाच्या कामाचा… ना राज्याच्या कामाचा… नाही शिवसेनेच्या कामाचा. हा मातोश्रीला किती कामाचा आहे हे त्यांनाच माहित… देवेंद्रजींची निष्ठा बघा. त्यांचे काम बघा. बौद्धिक पातळी बघा. तुमच्यात कोणते गुण आहेत? निर्मला सीतारामन बजेटवर बोलत होत्या तेव्हा म्हणाले की हा माझा विषय नाही. मग तुमचे काम काय? फक्त खुर्चीवर बसायचं? ते पण मातोश्रीच्या… अडीच वर्षं राज्य अधोगतीकडे नेलं. महाराष्ट्राचा कलंक आहात तुम्ही… अशा घणाघाती शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला.
ही व्यक्ती फक्त शिव्या द्यायचे काम करू शकते. बाकी काही नाही. आता राष्ट्रवादीसोबत आहे. डोळा मारायला मिळतोय ना… देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाच्या पाठीवर एक लोकप्रिय नेते आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत देशाला पाचव्या क्रमांकावर नेले आहे. २०२३ साली भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. कोरोना काळातल्या आजारी कारखान्यांना मदत करण्यासाठी त्यांनी माझ्या खात्याला पाच लाख कोटी दिले. तुम्ही त्यांना शिव्या घालता? कोणत्यातरी एका संस्थेला पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडून बेस्ट मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार घ्यायचा हे काम ते करत नाहीत. अडीअडचणीत याच मोदींना तुम्ही फोन करायचा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना फोन करायचा. आता त्यांना शिव्या घालता? त्यांनी पाठ फिरवली तर योग्य जागी जाल आणि अशी भाषा बोलत राहाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असे ते म्हणाले.
हे खेडला गेले. तिथे जे बोलले तेच औरंगाबादला बोलले. आणखी जिथे जिथे जातील तिथे तिथे तेच ते बोलतील. काही नवीन ऐकण्याची वेळ येणार नाही. जसे एखादा माणूस गेल्यानंतर रडायला माणसे बोलवतात तसे उद्धव ठाकरे गरोदर नसलेल्या महिलेलाही गरोदर म्हणून बायको मुलाला घेऊन रडायला जातात.
तुकारामाच्या अभंगातली एक ओळ आहे. यांच्या अश्रूत न माया आहे ना प्रेम… त्यांना त्याकाळी कळलं होतं की, असा कोणीतरी माणूस जन्माला येणार आहे की ज्याला आपलं वाक्य एकदम फिट बसणार आहे. तेव्हा पुन्हा सांगतो की या माणसाने आपले तोंड बंद करावे. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता करायला देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. तुम्ही मातोश्रीची चिंता करा. एक नंबर आणि दोन नंबर… हे शंभर टक्के अधिकृत आहे का ते बघा. काही कर्तव्यनिष्ठ अधिकारी ते बघतीलच. मुख्यमंत्री असताना हे पती-पत्नी रोज महापालिका आयुक्तांना वर्षावर बोलवायचे आणि नारायण राणेंचे घर कधी पाडता हे विचारायचे. माझ्या घराच्या टेरेसवर काही भाज्या लावल्या होत्या. पडवळ वेलीवरच येतात. त्याचे मांडव घालावे लागतात. तेसुद्धा एफएसआयमध्ये मोजले. काय झाले? यांचे मुख्यमंत्रीपद गेले. माझे घर तिथेच आहे. पण तरी मी मातोश्रीबद्दल तक्रार करणार नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांनी तुम्हाला सुरक्षित केले. पण तुम्ही तुमच्या मुलासाठी तेही केले नाही. आदित्य सुरक्षित नाही. इतकी दुश्मनी करून ठेवली आहे. ही महाविकास आघाडी नाही तर बिघाडी आहे. एक ना धड, भाराभार चिंद्या आहेत. आज भाजपाचे तीनशेतीन खासदार आहेत. येत्या निवडणुकीनंतर ते चारशे होतील. तुम्ही आता खालचा तळ गाठलाय.. हा तळ उद्ध्वस्त झाला तर काय होते याची कल्पना करा, असा इशाराही त्यांनी दिला.
संजय राऊत यांनी फडणवीस यांनी केलेल्या काडतुसांचा उल्लेख भिजलेली काडतुसे आहेत, असा केला. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, काडतूस गेल्यावरच कळते. काही वेळा कळतही नाही आणि माणूस मरतो.
नारायण राणे म्हणाले की, मी याला वृत्तपत्र म्हणणार नाही. पत्रकारांनी आजचा सामना वाचावा. त्यात जनतेच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताचे काय आहे हे सांगावे. तसेच सर्वसामान्य जनतेला ही भाषा आवडेल आणि रुचेल अशी भाषा आहे का हे पाहावे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असे वृत्तपत्र राज्यात चालू राहावे का, याचा विचार करून यासंबंधी योग्य कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.
तसेच प्रेस कौन्सिलकडे कोणी तक्रार केली नाही, तर मी तक्रार करणार, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला. तसेच वेळ पडली तर कोर्टात जाणार, असेही राणे म्हणाले. राणे पुढे म्हणाले की, ठाण्यात एक घटना घडली. त्यानंतर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. फार असे काही भयानक घडले, असे चित्र तयार करण्यात आले. पण पोलिसांना परिस्थिती समजली असून कांगावा करणा-या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावरच कासार वडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. कोरोनाच्या काळात अनेक टेंडर निघाली. त्यात आदित्य ठाकरे यांनी १५ टक्के घेतले.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…