गुवाहाटी : इंडियन प्रीमियर लीगचा आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात बुधवारी गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पंजाबने आपल्या पहिल्याच सामन्यात केकेआरला पराभूत केले, तर संजू सॅमसनच्या कर्णधारपदाखाली खेळत असलेल्या राजस्थानने हैदराबाद संघाला तब्बल ७२ धावांनी पराभूत केले आहे. राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी आणि गोलंदाजी विभाग पाहता त्यांच्यात कोणत्याही संघाला धूळ चारण्याची क्षमता आहे. त्यामुळे रॉयल्स विरुद्ध पंजाब या सामन्यात कोणता संघ ‘किंग्ज’ ठरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आयपीएल २०२३ वेळापत्रक आणि बातमी एका क्लिकवर…
पंजाब किंग्जसाठी भारताचा अव्वल फळीतील फलंदाज शिखर धवनचा अनुभव उपयोगी पडेल. तसेच पंजाबचा संघ सलामीवीर म्हणून इंग्लंडचा पॉवर हिटर लियाम लिव्हिंगस्टोनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू सॅम करन, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, रबाडा हे गोलंदाज पंजाबचे ट्रम्प कार्ड ठरू शकतात. पंजाब किंग्ज संघात कर्णधार शिखर धवन, भानुका राजपक्षे, सिकंदर रझा यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. गत सामन्यात केकेआरविरुद्ध अर्शदीपने चेंडूने, तर राजपक्षे आणि धवनने बॅटने कमाल दाखवली आहे. त्यामुळे पंजाबचा संघ तुलनेने अधिक संतुलित दिसत असलेल्या राजस्थान रॉयल्स समोर आव्हान उभे करू शकतो.
हे पण वाचा : क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा कोरोना पॉझिटीव्ह!
दुसरीकडे रॉयल्सची फलंदाजी खोलपर्यंत आहे. कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाला तोंड देण्याची क्षमता या संघात आहे. युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने गत सामन्यात ३७ चेंडूंत ५४ धावा तडकावत तो सलामीवीर म्हणून परिपक्व झाला आहे हे दाखवून दिले. बटलरने अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक झळकावताना गत सामन्यात २२ चेंडूंत ५४ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल, इंग्लंडचा एकदिवसीय कर्णधार धडाकेबाज फलंदाज जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी एसआरएच विरुद्ध अर्धशतके झळकावली, तर युझवेंद्र चहल (१७ /४) आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (२१/२) यांनी आपल्या धारदार गोलंदाजीने हैदराबादला हैराण केले. त्यामुळे गोलंदाजी विभागात गोलंदाज चहल आणि आर अश्विन या दोन भारतीय दिग्गजांसह जगातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट या बॉलिंग लाइनअपच्या साथीने रॉयल्स सर्वात तगडी फलंदाजी बाजू असलेल्या संघाला सुद्धा नामोहरम करू शकतात. मागील सामन्यांतून एकमेव कमकुवत दुवा, जर शोधायचा झालाच तर ती त्यांची मधली फळी, जे देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग दोघेही स्वस्तात बाद झाले. असे असले तरी राजस्थान सध्याचा सर्वात संतुलित संघ दिसत आहे.
गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर बाऊन्ससह चांगला येतो आणि फलंदाज जमिनीलगत भरपूर चौकार आणि षटकार मारताना दिसतात. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने २ सामने जिंकले आहेत. खेळपट्टीची सर्वोच्च धावसंख्या २३७ आणि सर्वात कमी धावसंख्या ११८ अशी आहे. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १४९ आणि दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १३८ आहे.
ठिकाण : बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी
वेळ : सायं. ७.३०