नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये तो झटपट बाद झाला. पृथ्वीच्या या निराशाजनक कामगिरीवीर भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग नाराज आहे. पृथ्वी शॉने आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे, असा सल्ला सेहवागने दिला.
क्रीडा वाहिनीवरील एका कार्यक्रमात सेहवाग म्हणाला की, पृथ्वी शॉनेही आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. शुबमन गिलकडे बघा, जो त्याच्यासोबत अंडर-१९ क्रिकेट खेळला आणि आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळत आहे. पण शॉ अजूनही आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. ऋतुराज गायकवाडनेही आयपीएलच्या एका मोसमात ६०० धावा केल्या आहेत.”
आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ सलग दोन सामने हरला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करत आहे. पृथ्वी शॉने पहिल्या दोन सामन्यांत वॉर्नरसोबत डावाची सुरुवात केली. शॉ पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शॉला मार्क वुडने १२ धावांवर बाद केले होते. त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने त्याला ७ धावांवर बाद केले. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग शॉ ज्या प्रकारे आउट होत आहे, त्यावरून तो अजिबात खूश नाही.