Thursday, July 10, 2025

गुजरातने जिंकली दिल्ली

गुजरातने जिंकली दिल्ली

राशिद खान, मोहम्मद शमी, साई सुदर्शन चमकले


दिल्ली (वृत्तसंस्था) : राशिद खान, मोहम्मद शमी आणि अल्झेरी जोसेफ या गोलंदाजांच्या तिकडीने दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीची कंबरच मोडली. त्यानंतर माफक लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शनने नाबाद ६२ धावा तडकावत गुजरात टायटन्सला ६ विकेट राखून सोपा विजय मिळवून दिला. दुसरा सामनाही जिंकत गतविजेत्या गुजरातने यंदाच्या हंगामातील आपली विजयी लय कायम ठेवली.


दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सला विकेट वाचविण्यात यश आले नसले तरी त्यांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. ५४ धावांवर त्यांचे ३ फलंदाज बाद झाले असले तरी ते दहाच्या रनरेटने फलंदाजी करत होते. मात्र साई सुदरर्शनने आधी विजय शंकर आणि नंतर डेविड मिलरसोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. साईने नाबाद ६२ धावांची विजयी खेळी खेळली. विजय शंकरने २९, तर डेव्हिड मिलरने नाबाद ३१ धावा ठोकल्या. त्यामुळे गुजरातने १८.१ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात सामन्यात बाजी मारली.


मोहम्मद शमी आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. दिल्लीने निर्धारित २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात १६२ धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉला बाद करत मोहम्मद शमीने दिल्लीला पहिला धक्का दिला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिल्लीतर्फे सर्वाधिक ३७ धावा जमवल्या. त्याला सर्फराज खानने ३० धावांची साथ दिली. दिल्लीच्या अन्य प्रमुख फलंदाजांनी मात्र निराश केले. शेवटच्या षटकांत अष्टपैलू अक्षर पटेल (३६ धावा) आणि आणि यष्टीरक्षक अभिषेक पोरेल (२० धावा) यांनी फटकेबाजी करत दिल्लीला कसेबसे १६२ धावांपर्यंत पोहचवले. गुजरातच्या मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. तर अल्झेरी जोसेफने २ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment