नवी दिल्ली : एलॉन मस्क याने ट्विटरची चिमणी उडवून डॉजला दत्तक घेताच डॉजकॉईनचे मूल्य ३३. २४ टक्क्यांनी वाढले आहे. काल एलॉन याने अचानक वापरकर्त्यांना हा धक्का दिल्यावर याची सोशल मिडियावर चर्चा झाली. तसेच लोकांनी मोठ्या संख्येने डॉजकॉइन म्हणजे काय हे शोधले आणि डॉजकॉईनचे मूल्य वाढले.
२०१३ मध्ये लाँच झालेल्या या क्रिप्टोकरन्सीला २०२१ मध्ये लोकप्रियता मिळाली. त्याचे कारण देखील एलॉन मस्क आहे. त्याने डॉजच्या फोटोसह मीम्स शेअर करायला सुरुवात केली आणि नंतर लोकांची त्यात उत्सुकता वाढत गेली.
सोमवारी ट्विटरच्या लोगोवर डॉज दिसून येताच या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य पुन्हा एकदा वाढले आहे. काल संध्याकाळी ५.३० वाजता डॉजकॉइनचे मूल्य ६.३५ रुपये होते लोगोमध्ये बदल झाल्यानंतर त्याचे मूल्य ७ वाजता ८.४५ रुपये इतके झाले. आज १०.५१ वाजता त्याचे मुल्य ८.०६ रुपये इतके आहे.
काल एलॉन मस्कने हा बदल केल्यानंतर अवघ्या दीड तासात त्याचे मूल्य ३० टक्क्यांहून अधिक वाढले होते. ही क्रिप्टोकरन्सी २०१३ मध्ये बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी तयार केली होती. हे बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीची खिल्ली उडवण्यासाठी तयार करण्यात आले होते. त्याच्या लोगोवर शिबा इनु या जपानी श्वानाचे चित्र आहे.