- प्रासंगिक: उमेश कुलकर्णी
लोकप्रिय क्रिकेटपटू आणि पहिला षटकार किंग सलीम दुराणीचे रविवारी दुःखद निधन झाले. त्याबद्दल हा श्रद्धांजलीपर लेख!
वर्ष होते १९७२. इंग्लंडचा क्रिकेट संघ टोनी लुईसच्या नेतृत्वाखाली भारतात आला होता आणि मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना होता. पण भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला एक तारा त्या संघात नव्हता. ही बातमी जशी चाहत्यांना कळली, तसे ते ब्रेबॉर्न स्टेडियमवर गोळा झाले आणि घोषणा देऊ लागले, ‘नो दुराणी, नो मॅच’. भारतीय संघात सलीमला घेतले नाही तर आम्ही सामना होऊ देणार तर नाहीच, पण ब्रेबॉर्न पेटवून देऊ, अशा धमक्याही लोकांनी दिल्या.
दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांची तीच हेडलाइन होती. अखेर सलीमचा संघात समावेश करण्यात आला आणि त्याच सामन्यात ७३ धावा करून लोकांच्या अपेक्षा सलीम दुराणीने पूर्ण केल्या. नंतर असे भाग्य केवळ बिशनसिंग बेदीला लाभले. त्यालाही एकदा भारतीय संघात घेतले नाही, तेव्हा लोकांनी ‘नो बेदी, नो मॅच’ अशा घोषणा दिल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांशी सलीमचा जिव्हाळा इतका होता की, प्रेक्षक ज्या दिशेला मागणी करतील त्या दिशेला तो षटकार लगावायचा. हे आता सर्वांना वाचून माहीत झाले आहे. पण त्या काळात जे जगले त्यांनाच प्रत्यक्षात सलीमची क्रेझ काय होती, ते सांगता येईल. आमच्या अगदी लहानपणाच्या काळातील तो एक तारा होता आणि मोठी माणसे त्याच्याबद्दल घरी चर्चा करत, इतकेच आता आठवते.
सलीम दुराणी हा मूळचा अफगाणिस्तानचा. भारताकडून खेळलेला एकमेव अफगाण कसोटी क्रिकेटपटू. त्याने २९ कसोटीतून १२०२ धावा केल्या आणि आपल्या फिरकी गोलंदाजीवर त्याने ७५ बळीही घेतले. कोणत्याही उदयोन्मुख रणजीपटूचे सुरुवातीचे रेकॉर्डही यापेक्षा मोठे असते. पण तो काळ आणि त्या काळातील खेळाडूंची मानसिकता काय होती, याचा अंदाज आल्यावर सलीम दुराणी काय चीज होती, ते लक्षात येते. ‘षटकारांचा किंग’ असे त्याला म्हणत.
त्याने संपूर्ण कसोटी कारकीर्दीत १५ षटकार लगावले असतील. आज विराट कोहली किंवा शेन वॉटसनसारखा खेळाडू एका डावातच पंधरा षटकार सहज लगावतो. पण पुन्हा तोच मुद्दा येतो. एक षटकार लगावला, तर त्याच्या पुण्याईवर अख्खी कारकीर्द काढण्याचे ते दिवस होते. त्यात सलीम हा प्रेक्षकांचा लाडका षटकार किंग होता. सलीम दुणीच्या काळात तो अत्यंत देखणा तर होताच. पण त्याबरोबर मन्सूर अली खान पतौडी, एमएल जयसिंहा हेही देखणे होते. त्यांना पाहण्यासाठी केवळ तरुणी जीव टाकत. त्यातही सलीमची क्रेझ काही औरच होती. सलीमची फलंदाजीही पाहण्यासारखी होती. त्याने धावा केल्या त्या धडकी भरवणारे तेज गोलंदाज वेस्ली हॉल आणि चार्ली ग्रिफीथ यांना तोंड देऊन. चेतन शर्मा आणि संजीव शर्माला तोंड देऊन नव्हे. सलीम दुराणीचा खेळ लोकांना आवडायचा, हे त्या काळातील सत्य होते. म्हणून तर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आज सलीम तरुण असता तर आयपीएलमध्ये त्याला सर्वाधिक बोली लागली असती, असे रास्त उद्गार काढले आहेत. खरोखर सलीम दुराणी हा काळाच्या पुढे चालणारा फलंदाज होता. पण त्याने आपली कसोटी कारकीर्द गांभीर्याने घेतली नाही. अन्यथा अनेक विक्रम त्याने उद्ध्वस्त केले असते. कपिल देव आणि क्लाईव्ह राईस यांच्यासारखाच सलीम दुराणी होता. सलीम हा फलंदाज म्हणून महान नव्हता. पण कोणताही चेंडू षटकारांसाठी टोलवण्याची अजब क्षमता त्याच्यात होती. त्यामुळे प्रेक्षकांना त्याने कधीही निराश केले नाही. आपल्या खेळासाठी नव्हे तर आपले लुक्स आणि प्रेक्षकांमध्ये असलेल्या क्रेझमुळे तो संस्मरणीय म्हणून राहू शकेल.
सलीम दुराणी दिसायला अत्यंत देखणा होता. अफगाणिस्तानचे देखणे फीचर्स त्याच्यात होते. त्यामुळे तो तरुणींच्या गळ्यातील ताईत होता. परवीन बाबी हीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली होती, असे सांगतात. नंतर ती कबीर बेदीच्या प्रेमात पडली. पण तिचा पहिला प्रियकर सलीमच होता, अशी चर्चा सत्तरच्या दशकातील मासिकांत रंगवलेली असायची.
त्याला चित्रपट ‘चरित्र’ हा मिळाला आणि त्यात त्याची नायिका परवीन बाबीच होती. तिनेच त्याला तो चित्रपट मिळवून दिला, अशीही तेव्हा चर्चा होती. पण हे गॉसिप विशेष महत्त्वाचे नाही. पण महत्त्वाचे हे आहे की, क्रिकेटशिवाय त्याला चित्रपट जगतातही नाव होते. सलीम दुराणी भारतीय क्रिकेट संघाशिवाय गुजरात, सौराष्ट्र या संघांकडूनही रणजी सामने खेळला आणि तेही त्याने गाजवले. टुकुटुकु खेळत धावा कुटत बसायच्या, हे त्याच्या गावीही नव्हते.
त्यामुळे त्याची अल्प कारकीर्द असली तरीही त्याचे नाव मात्र भरपूर गाजले होते. तुम्ही किती आयुष्य जगलात याला महत्त्व नाही, तर ते कसे जगलात, याला महत्त्व आहे, असे एक इंग्रजी वचन आहे. सलीम त्या वचनाला पुरेपूर जागला. सलीम दुराणीला भावपूर्ण श्रद्धांजली!