
महाविकास आघाडीची कथित वज्रमूठ सभा रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. महाविकास आघाडीची वज्रमूठ नाही, हे त्या सभेतच दिसले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तिकडे फिरकलेही नाहीत. यावरून मविआची वज्रमूठ सभा ही झाकली मूठ आहे, हे लक्षात आलेच. पटोले यांच्या काँग्रेसला महाविकास आघाडीत कवडीचीही किमत नाही. मध्यंतरी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाची बातमी पेरण्यात आली होती. ती कोणत्या गोटातून आली, ते सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात काहीही गमावण्यासारखे शिल्लक नसलेल्या ठाकरे गटाला सर्वाधिक जागा दिल्या होत्या आणि भारतभर अस्तित्व असलेल्या काँग्रेसला केवळ ८ जागा दिल्या होत्या. वैचारित दिवाळखोरीचे ते जागावाटप होते. त्यामुळे पटोले यांनी वज्रमूठ सभेला दांडी मारली. ते असो. पण रविवारच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले ते रटाळ भाषणांमधील प्रथम क्रमांकाचे भाषण म्हणावे लागेल. त्याच त्या गोष्टींचे भरताड त्यात भरले होते.
नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका, अमित शहांना शिव्या घालण्याचे उद्योग आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बेताल टीका याशिवाय भाषणात काहीही नव्हते. वास्तविक शिंदे यांनी भाजपच्या बरोबर जाऊन आता दहा महिने होत आले आहेत. पण लालसेपोटी हिसकावलेली सत्ता गमावण्याचे दुःख अजूनही ठाकरे विसरायला तयार नाहीत. ठाकरे आणि त्यांच्या साथीला असलेले मूठभर मावळे यांना शिंदे यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरा उद्योगच उरलेला नाही. निदान यामुळे तरी राहिलेले कार्यकर्ते आपल्याबरोबर राहतील, इतकीच धडपड असल्या भाषणांतून दिसते. ठाकरे यांच्या सभेला गर्दी झाली, हे केवळ मराठी माध्यमेच दाखवतात. प्रत्यक्षात स्थिती वेगळीच असते. भावनिक आवाहने करण्यापलीकडे ठाकरे गटाने आजपर्यंत काहीही केले नाही. सत्ता होती तेव्हाही केवळ मोदी-शहांना शिव्या घातल्या आणि घरात बसून कोमट पाणी पित मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव वगैरे खोट्या कंड्या पिकवायच्या. पण यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला.
ठाकरे यांनी सत्तालालसा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्रीपद बळकावले, तर निदान लोकांसाठी काही चांगले करायचे तरी. ती उत्तम संधी होती. पण त्यातही केवळ सूडबुद्धीने वागून कुठे अर्णब गोस्वामीला धरून आणण्यासाठी सचिन वाझेसारख्या आपल्याच मर्जीतील पोलीस अधिकाऱ्याला पाठवायचे, कुठे कंगना रणावतचे घर तोडायचे, असलेच उद्योग केले. वाचाळवीर संजय राऊत यांनी त्यावरही उखाड दिया असले रस्त्यावरच्या गुंडाला शोभणारे ट्वीट केले. त्यावरही ठाकरे यांनी मौनच पाळले. त्याहीपेक्षा कळस म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे सत्य होते तेच सांगितले म्हणून राज्यभरातील पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाडला पाठवले. केवळ सूडचक्र म्हणूनच तो कारवाईचा डोलारा उभा करण्यात आला. पण परिणाम काय झाला तर महाड न्यायालयाने राणेंना तत्काळ जामीन दिला आणि अलिबाग न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटलाच निकाली काढला. त्यात राणे दोषमुक्त झाले. ही ठाकरे सरकारला न्यायपालिकेने दिलेली सणसणीत चपराक होती.
बेकायदेशीर मार्गाने बळकावलेल्या सत्तेचा वापर विरोधकांवर सूड उगवण्याशिवाय कशासाठीही केला नाही. मग ही सत्ता राहणारच नव्हती आणि ती गेलीच. आता सभा घेऊन नुसते शिंदे, भाजप, फडणवीस आणि मोदी-शहा यांच्या नावाने रोजच्या रोज बोटे मोडण्यापलीकडे ठाकरे यांच्या हातात काहीही उरलेले नाही. त्याचेच प्रदर्शन सुरू आहे. ठाकरे यांच्याकडे सांगण्यासारखे आता काहीही उरलेले नाही. कार्यकर्ते त्यांच्याकडे नाहीत आणि जे काही आहेत, त्यांना आपला साहेब कुणाबद्दल काय बोलतो आहे, हेही कळण्याची कुवत नाही. भावनिक आवाहन करून मते मिळत नाहीत, हे आता ठाकरे यांनी समजून घेतले पाहिजे. आमचे हिंदुत्व कशाचे नाही, हे सांगता सांगता ठाकरे नेमके कशाचे आहे, तेच सांगत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भाषा ते बोलतात. केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी तीन रंगांचा झेंडा लावत होते. हे भगव्या रंगाचा झेंडा मिरवतात. पण भाषा तीच अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनाची आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे कधीही सहन झाले नसते. दुसरे महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनीही तेच तेच मुद्दे सभेत रंगवले. मुळात काँग्रेसचे पटोले नसल्याने महाविकास आघाडीची सभा मुळातच कोलमडली होती. एकीची वज्रमूठ दाखवता आली नाही. त्यामुळे पवार यांच्या भाषणातही दम नव्हता.
प्रसारमाध्यमे भाषणे आणि सभा दाखवतात म्हणून ते लोकांच्या समोर तरी येतात आणि भाजपला विरोध करणारे हे तिन्ही पक्ष असल्याने भाजपविरोधी प्रसारमाध्यमे या तीन पक्षांना उचलून धरतात. महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी अंटार्क्टिका बेटावर मविआने सभा घेतल्या तरीही त्यांचे मुद्दे केवळ भाजप, मोदी-शहा आणि मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना शिव्याशाप देण्यापलीकडे काहीही असणार नाहीत. मविआकडे बोलण्यासारखे नवीन काहीही नाही. शिंदे-फडणवीस सरकार उत्तम काम करत आहे. रोजच्या रोज वेगवान निर्णय घेतले जात आहेत. मग टीका करण्यास फटही सापडत नाही. मग बोलायचे तरी काय, हा प्रश्न मविआ नेत्यांसमोर आहे. जे काही मूठभर कार्यकर्ते उरले आहेत, त्यांना चांगला कार्यक्रम द्यायचा, हे मविआच्या गावीही नाही. कारण त्यांनी असले काही कधी केलेच नाही. त्यामुळे संभाजीनगरची मविआची सभा माध्यमे कितीही रंगवून सांगोत, पण फ्लॉप शो होता.