आज भिडणार एकमेकांना
दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स आणि गतविजेते गुजरात टायटन्स हे दोन संघ मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. दिल्लीचा संघ आपल्या घरच्या मैदानावर आपले खाते उघडण्याच्या इराद्याने उतरेल. दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून ५० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, तर गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. दोन्ही संघांमध्ये मागील हंगामात फक्त एकच सामना झाला असून त्यात गुजरातने बाजी मारली होती.
पहिल्या सामन्यात दिल्लीची मधली फळी फ्लॉप झाली. मिचेल मार्श, सर्फराज खान आणि रोव्हमन पॉवेल स्वस्तात बाद झाले. त्यांच्या संघाला ९.५ च्या रन रेटने धावांची गरज असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक केले; परंतु ते विजयासाठी पुरेसे नव्हते. या सामन्यात गोलंदाजीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी संघाची सर्वाधिक निराशा केली. खलीलशिवाय इतर खेळाडू महागडे ठरले. चेतन साकारिया आणि मुकेश कुमार अचूक लाईन लेन्थ गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात; परंतु लखनऊविरुद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अडचणीत आणण्यासाठी आवश्यक वेग आणि विविधतेच्या दृष्टीने दोघेही कुचकामी ठरले. जर अशीच परिस्थिती राहिली, तर गुजरातच्या संघाला त्यांच्याविरुद्ध धावा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना करेल, तेव्हा त्यांना त्यांच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करून पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. सलामीवीर शुभमन गिलने झंझावाती अर्धशतक झळकावताना ३६ चेंडूंत ६३ धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय विजय शंकर, राशिद खान आणि राहुल तेवतिया यांनी छोटे पण महत्त्वाचे डाव खेळून गुजरातला विजय मिळवून दिला. गोलंदाजीत रशीद खान, मोहम्मद शमी आणि अल्झारी जोसेफ यांनी गुजरातकडून चांगली कामगिरी केली. त्यामुळे दिल्लीला गुजरातचे गोलंदाजी आक्रमण रोखण्यासाठी अलझारी जोसेफ, यश दयाल आणि राशिद खान तसेच मोहम्मद शमी आणि पंड्याविरुद्ध झटपट धावा काढण्याचा मार्ग शोधावा लागेल.
दिल्लीकडे इशांत शर्मासारखा अनुभवी गोलंदाज आहे. इशांतचा वापर ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून होऊ शकतो. तसेच साकारियाच्या जागी संघ मुस्तफिझूर रहमानला इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो, पण त्यासाठी रिले रोसोला बाहेर बसावे लागू शकते.
दुसरीकडे केन विल्यमसन गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी गुजरात टायटन्स कागदावर मजबूत दिसत आहेत. अशा स्थितीत दिल्लीला जिंकण्यासाठी गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा सर्व बाजूंनी पराकाष्ठा करावी लागेल.
ठिकाण : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
वेळ : सायं. ७.३०