पुणे : पुण्यात एका नराधम पतीने पैशांसाठी आपल्या पत्नीला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम पतीने पैशांसाठी आपल्या पत्नीला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर त्याने पैशांसाठी तिचा ३ हजार रुपयात मित्रांशी सौदा केला. ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली असून या प्रकरणी एका २५ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या तक्रारीनंतर पती आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहीतेच्या पतीला पैशांची गरज होती. मात्र, त्याला कुणीच पैसे देत नव्हते. यामुळे त्याने आपल्या पत्नीला मारहाण करत तिला जबरदस्तीने उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. हा प्रकार तब्बल २०२० पासून सुरू होता. पतीचा त्रास सहन करत ती हा सर्व प्रकार सहन करत राहिली. यानंतर आरोपीने आपल्याच दोन मित्रांकडून तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्या सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले.
यानंतर पीडित महिला ही दोन दिवसांपूर्वी रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या त्या नराधम मित्रांनी तिला अडवत जातीवाचक शिवीगाळ करत तिला मारण्याची धमकी दिली. तसेच पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडित महिलेने त्यांना नकार दिल्याने त्यांनी तिला मारहाण केली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई करत आहेत.