नवी दिल्ली : दिल्लीत आज पहाटे पावसाने हजेरी लावली होती. यामुळे दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज (०४ एप्रिल) आयपीएल २०२३ मधील सातवा सामना खेळला जाणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दिल्लीत आज पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दिल्ली-गुजरात यांच्यातील सामना होऊ शकेल की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, दिल्लीत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी १० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु हवामान स्वच्छ राहील आणि ताशी १०-१५ किमी वेगाने वारे वाहतील. तसेच अनेक भागात धुके पडण्याची शक्यता आहे.