Saturday, July 13, 2024
Homeक्रीडाIPL 2024आरसीबीच्या विजयात विराट- डुप्लेसीस चमकले

आरसीबीच्या विजयात विराट- डुप्लेसीस चमकले

मुंबईच्या तिलक वर्माची एकाकी झुंज अपयशी

बंगळुरु (वृत्तसंस्था) : विराट कोहली (नाबाद ८२ धावा), फाफ डुप्लेसीस (७३ धावा) यांच्या धडाकेबाज सलामीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सचा ८ विकेट राखून धुव्वा उडवला. या विजयामुळे आरसीबीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करत संघाच्या विजयाचा पाया मजबूत केला. कर्णधार फाफ डुप्लेसीस आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा मनसोक्त समाचार घेतला. विराट-फाफ डुप्लेसीस या जोडगोळीने १४८ धावांची भागीदारी करत आरसीबीचा विजय जवळपास निश्चित केला होता. फाफ डुप्लेसीसच्या रुपाने अर्शद खानने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. या पहिल्या विकेटसाठी मुंबईला फारच वाट पहावी लागली. फाफ डुप्लेसीसने ४३ चेंडूंत ७३ धावा तडकावल्या.

वन डाऊन फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. ग्रीनच्या सापळ्यात तो अलगद अडकला. ग्लेन मॅक्सवेलने आपल्या आक्रमक अंदाजात दोन षटकार लगावत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आरसीतर्फे विराट कोहलीने नाबाद ८२ धावा केल्या. १६.२ षटकांत २ फलंदाजांच्या बदल्यात बंगळुरुने विजयी लक्ष्य गाठले.

आरसीबीने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव हे मुंबईचे भरवशाचे फलंदाज पहल्याच सामन्यात अपयशी ठरले. संघाच्या अवघ्या ४८ धावांवर हे चारही आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे मुंबईचा संघ १०० धावा तरी करेल का? अशी शंका होती. अशा संकटकाळात तिलक वर्मा मुंबईच्या मदतीला धावून आला. सुरुवातीला त्याला नेहल वधेराने चांगली साथ दिली. या जोडीने मुंबईला शतकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. १३ चेंडूंत २१ धावा जमवणाऱ्या नेहल वधेराने तिलक वर्माची साथ सोडली. तिलक वर्माने एकाकी झुंज देत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तिलकने ४६ चेंडूंत नाबाद ८४ धावा कुटल्या. त्यात ९ चौकार आणि ४ षटकार होते. तळात अर्शद खानच्या नाबाद १५ धावांची भर पडली. मुंबईने २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १७१ धावा जमवल्या. आरबीच्या कर्ण शर्माने सर्वाधिक २ विकेट मिळवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -