अपघातातून सुदैवाने बचावले
अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबईहून स्पीडबोटीने अलिबागला कार्यक्रमासाठी निघालेले रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या बोटीला आज अपघात झाला. मात्र यातून हे दोघे सुदैवाने थोडक्यात बचावले. काही क्षणांसाठी स्पीडबोट चालकांचे नियंत्रण सुटले. परंतु नंतर लगेच त्याने बोटीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.
३५० व्या शिवराज्याभिषक सोहळ्याच्या तयारीची आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होती. या बैठकीसाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे आज मुंबई येथून सागरीमार्गाने स्पीडबोटने अलिबागला जात होते. सुरुवातीला बोटीचा वेग कमी होता. त्यानंतर बोट मांडवा जेट्टीजवळ आली तेव्हा बोटीचा वेग वाढला. त्यामुळे काही क्षणांसाठी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोट जेट्टीच्या दोन खांबांना घासली. तेव्हा काय घडतंय हे क्षणभर दोघांनाही समजले नाही. त्यांच्या स्वागतासाठी आमदार महेंद्र दळवी हेही मांडवा जेट्टीवर उपस्थित होते. समोरचा प्रसंग पाहून त्यांच्याही हृदयाचा ठोका चुकला. मात्र सुदैवाने चालकाने लगेच बोटीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकारांना हा प्रकार सांगितला. यापूर्वीही पालकमंत्री उदय सामंत यांची बोट भरसमुद्रात बंद पडली होती. त्यावेळी ते दुसऱ्या बोटीने किनाऱ्यावर आले होते.