भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांचा अजितदादांना सवाल
मुंबई : सावरकरांना भारतरत्न देण्याची तुमच्यात हिंमत आहे का? हा प्रश्न अजित पवारांनी काकांना का विचारला नाही? स्वत:चे काका १५ वर्षे मंत्री आणि मुख्यमंत्री होते. काका नाहीतर ज्यांच्याबरोबर राहिले ते आका सुद्धा होते. काका आणि आकांना प्रश्न का विचारला नाही, याचे उत्तर आधी अजित पवारांनी द्यावे. मग आम्हाला प्रश्न विचारावा, असा पलटवार करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेकविध मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केल्याने देशभरात गदारोळ सुरु आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून शिंदे गट आणि भाजपने ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली. या यात्रेवरून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यातच तुमच्यात धमक आणि ताकद असेल, तर केंद्रात तुमच्या विचारांचे सरकार आहे. राज्यात तुम्ही लोक बसत आहात. सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान आहे. तुम्हालाही अभिमान असेल, तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न द्या, तुमच्यात हिंमत आहे का? अशी विचारणाही अजित पवार यांनी केली. अजित पवारांनी केलेल्या या टीकेला भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.