Monday, June 30, 2025

समाज निरोगी व्हावा म्हणून...

समाज निरोगी व्हावा म्हणून...

  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


आपल्या समाजात स्त्रियांची भाषा आणि पुरुषांची भाषा या दोहोंमध्ये नेहमीच अंतर राहिले आहे. स्त्रियांकडून ऋजू, विनम्र, मार्दवशील अशा भाषेची अपेक्षा ठेवली जाते, तर पुरुषांची भाषा रोखठोक, कठोर, असणारच किंबहुना ती काहीशी उर्मट वाटली तरी त्यात काहीच चुकीचे नाही, पुरुषांना अशीच भाषा शोभते, असे एकूण सार्वजनिक मत असते. एखादा मुलगा हळुवार भाषेत बोलला, तर त्याला ‘काय बायकी बोलतोयस’ म्हणून हिणवले जाते.


आपण पुरुष आहोत म्हणून आपण मार्दवाने बोलायचे नाही, असेच जणू त्याच्या मनावर बिंबवले जाते. खरे तर बोलण्यापासून वर्तनापर्यंत पुरुषाचा साचाच समाजात घडवला जातो. त्या साचातून बाहेर पडायला मग बहुतेक पुरुष तयारच नसतात. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने अनेक बाबतीत स्त्रियांना मूक राहण्यास भाग पाडले. त्यांना जणू काही बोलण्याचा, प्रतिउत्तर करण्याचा, प्रश्न विचारण्याचा हक्कच नाही, असे वातावरण घडवले. त्यामुळे अनेक घरांतून पुरुषांचे आवाजच ऐकू येत राहिले आणि स्त्रियांकडे केवळ श्रवणभक्तीची आणि पुरुषांच्या आज्ञापालन करण्याची भूमिका येत गेली.


स्त्री शिक्षण, त्यातून आलेला आत्मविश्वास, प्राप्त आर्थिक स्वावलंबन यातून स्त्रियांची भाषा बदलायला मदत झाली. ती तिच्या स्वरात बोलण्याचे धाडस दाखवू लागली, अर्थात प्रत्येकीमध्ये हे धाडस निर्माण होणे शक्य नव्हते. त्यामुळे स्त्रियांची भाषा सरसकट बदलली, असे म्हणता येत नाही.
स्त्रियांच्या भाषेतला बदल स्वीकारायला देखील समाज सहजासहजी तयार नसतो. उदाहरणच घ्यायचे, तर कितीतरी ठिकाणी स्त्रियांचे सर्वोच्च पदावर असणे पुरुष सहज स्वीकारत नाहीत. एखादी स्त्री आपली वरिष्ठ अधिकारी असणे आणि तिचे आदेश ऐकणे, पुरुषांना सहज जमत नाही. बरेचदा तिथे पुरुषी अहंकार आडवा येतो. इथे स्त्री व पुरुष यांच्या साचेबद्ध भूमिका बदलतात.


अधिकार पदावरील स्त्री आदेशकर्त्याच्या, तर कार्यालयातील निम्न स्तरावरील पुरुष आदेशपालनकर्त्याच्या भूमिकेत असतात. भूमिकांची ही अदलाबदल हे खरे तर समाजातील स्थित्यंतराचे लक्षण आहे आणि कोणताही समाज पुढे जायचा असेल, तर स्थित्यंतर व परिवर्तन अटळ आहे. मात्र स्त्री आणि पुरषांच्या पारंपरिक भूमिकांमधील बदल देखील समाजाला नीट स्वीकारता आलेले नाहीत.


आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नोंदवायचा आहे, तो असा की, अनेक पुरुष बोलताना स्त्रियांविषयीचा सन्मान ठेवत नाहीत. त्यांच्या बाबतीत सैलपणे, ढिसाळपणे, एकेरी शब्दांत बोलले जाते. भल्या भल्या पुरुषांमध्ये स्त्रीविषयक सौजन्याचे भान नसते. तिचे दिसणे, बोलणे, चालणे या सर्वांबाबत सैल, अवमानकारक भाषा वापरण्याचा पुरुषांना अधिकार आहे का? पण आपल्याला याबाबत जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखेच अनेक पुरुषांचे वर्तन दिसते.


माणूस म्हणून एकमेकांशी वागताना सन्मानाने बोलले पाहिजे. एकमेकांबद्दल आदर व्यक्त करणारी भाषा योजली गेली पाहिजे. स्त्री-पुरुषांतील संवाद अधिक परिपक्व होण्याकरिता सौजन्यपूर्ण भाषेची गरज आहे. आपण हे जितके अधिक स्वीकारू तितका आपला समाज अधिक निरोगी होईल.

Comments
Add Comment