Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगोष्ट एका अद्भुत वाड्याची...!

गोष्ट एका अद्भुत वाड्याची…!

  • विशेष: लता गुठे

अद्भुत वैशिष्ट्यपूर्ण वाड्यासमोर पोहोचताच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धकृती पुतळ्याचे दर्शन झाले. बाहेरून पाहिलं तेव्हा कल्पनाही नव्हती, आत इतका मोठा वाडा असेल. तीन मजली लाकडी जुन्या पद्धतीचा वाडा आजही दिमाखात उभा आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भगूर येथील वाडा पाहण्याचा योग नुकताच आला. यासाठी निमित्तही तसेच घडले. विलेपार्ले पूर्व येथून २५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता एका आलिशान एसी बसमधून भगूरला जाण्यासाठी निघालो. या सहलीचे आयोजन एसीपी अविनाश धर्माधिकारी यांच्या EduCult Sports Foundationच्या वतीने करण्यात आले होते. एम. ए. च्या अभ्यासक्रमाला सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे आत्मचरित्र असल्यामुळे ते अनेक वेळा वाचले. त्यामुळे सावरकरांविषयी नितांत श्रद्धा मनात आहे. अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वाचा वाडा पाहण्याचा योग यानिमित्ताने जुळून आला. मी लगेच हो म्हणाले. मीच नाही तर अनेक मित्र-मैत्रिणींना या सहलीशी जोडले आणि त्यांनाही भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी जाऊन सावरकरांचा वाडा पाहता आला.

या सहलीसाठी आम्ही सावरकरप्रेमी ५५ जण नाशिकच्या जवळच असलेल्या २० किलोमीटर अंतरावर भगूर या गावी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाड्याला भेट द्यायला गेलो. अतिशय सुरेख नाष्टा, भोजन, सर्वच आयोजन, नियोजन उत्तम होते. अनेक कलाकार मंडळींसमवेत प्रवास सुरू झाला. दुपारी १ वाजता त्या अद्भुत वैशिष्ट्यपूर्ण वाड्यासमोर पोहोचलो. वाड्याच्या समोरच युनिफॉर्ममध्ये एसीपी धर्माधिकारीसाहेब आमच्या स्वागतासाठी उभे होते. वाड्याच्या समोरून घोषणा देत एका हॉलमध्ये गेलो. दरम्यान वाड्याच्या प्रत्येक भिंतीला स्वातंत्र्यवीरांचे फोटो लावलेल्या एका छानशा हॉलमध्ये आमची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे उपस्थित असलेले खास औरंगाबादहून आलेले पार्थ बावस्कर यांची ओळख अविनाश सरांनी करून दिली. पार्थ यांच्या खणखणीत आवाजात सावरकरांवरील निरूपण सुरू झाले, ते अतिशय प्रेरणादायी होते. त्यांचा शब्द न शब्द मनात घर करत होता आणि विचार करायलाही प्रवृत्त करत होता. त्यांच्या मनात असलेली राष्ट्रभक्ती आणि सावरकरांविषयी श्रद्धा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याविषयी आदर जाणवत होता. त्यांनी वाड्यांची माहिती आणि महत्त्वाच्या अनेक घटनांच्या साखळ्या जोडत सावरकरांच्या आयुष्याचा एक छोटासा पट आमच्यासमोर शब्दांच्या माध्यमातून उभा केला. त्यांचे बोलणे ऐकून आम्ही भारावून गेलो आणि त्याच अवस्थेत सावरकरांचा वाडा पाहिला.

जबाहेरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धकृती पुतळ्याचे दर्शन झाले. संपूर्ण वाड्यावरून एक नजर फिरवून घेतली. बाहेरून पाहिलं तेव्हा कल्पनाही आली नाही की, आत इतका मोठा वाडा असेल. तीन मजली लाकडी जुन्या पद्धतीचा तो वाडा आजही दिमाखात उभा आहे. समोर आणि पाठीमागे प्रशस्त अंगण. दिवाणखाना, माजघर, घरामध्ये विशिष्ट प्रकारच्या देवळी, धान्याची कोठारं, भुयारी मार्ग, लाकडी जिने आणि अष्टभुजा देवीचं छोटसं देवघर. भिंतीवर लावलेले सावरकरांचे जुने कॉलेजपासूनचे फोटो तसेच फॅमिली फोटो पाहताना मन भरून आले. सावरकर केंद्राचे पदाधिकारी माहिती देत होते.
याच वाड्यामध्ये सावरकरांचे बालपण गेले. आई-वडिलांच्या थोर संस्कारातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घडले ते याच वाड्यात. चाफेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकरांनी देशकार्यासाठी स्वतःला समर्पित केले, त्याची सुरुवात याच वास्तूपासून झाली. अष्टभुजा देवीच्या प्रेरणेने आणि तिच्या आशीर्वादाने त्यांनी शपथ घेऊन क्रांती लढ्यात उडी घेण्याचा निश्चय केला तो याच पावन वास्तूमध्ये. त्या वेळेला सावरकर जेमतेम १४ वर्षांचे होते.

त्यांनी लिहिलेली आणि म्हटलेली कविता याच भिंतीने प्रथम ऐकली. असा हा प्रेरणादायी वाडा. त्या वास्तूत फिरताना सावरकरांच्या माझी जन्मठेपमधील वाचलेली वाक्य आठवत होती. म्हणून तो वाडा पाहताना वास्तू म्हणून न पाहता याच वास्तूने सावरकरांचे विचार घडवले. त्यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही वास्तू पाहताना स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या सावरकरांनी अतोनात कष्ट सहन केले, संसाराची होळी करून मातृभूमीची सेवा करण्यासाठी अतोनात यातना सहन केल्या. काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. हालअपेष्टा सहन करून जे काही शक्य आहे ते केले. अशा या वीर पुरुषाच्या वाड्यात फिरताना मंदिरात गेल्याचा अनुभव येत होता.

सावरकरांचा वाडा पुनरुज्जीवित करून पुरातत्त्व खात्याने तो सुस्थितीत जतन केला आहे. बालपणीच्या अनेक सुख-दुःखाच्या आठवणींची साक्ष देणारा हा वाडा सर्व सावरकर प्रेमींनी आवर्जून बघावा असा आहे. सावरकरांनी लहान वयातच लिखाणाला सुरुवात केली होती. छंदबद्ध कविता, पोवाडे, फटके याच वाड्यात लिहिले. त्यांच्या आई-वडिलांनी सावरकरांवर संस्कार याच वाड्यात केले, या सर्व आठवणींना या वाक्याने जपले आहे. त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा सावरकर जेमतेम दहा वर्षांचे होते. सावरकरांच्या सृजनशील मनामध्ये संसाराचे बीजारोपण आई-वडिलांनी याच वाड्यांमध्ये केले आणि ते कायम सावरकरांच्या मनात रुजले. अशा या वाड्याच्या आठवणी पार्थ बावस्कर यांनी सांगितल्या. ज्या कधीही कुठेही वाचायला मिळाल्या नव्हत्या त्यामुळे या गोष्टींचे मला जास्त अप्रूप वाटत होते.

वाड्याच्या भिंतीवर लावलेले सावरकरांचे जुने फोटो, सावरकरांचा पुतळा. सर्व काही नजरेत साठवून घेतलं आणि तृप्त मनाने तेथून निघालो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता उपेंद्र प्रभू, तसेच अविनाश धर्माधिकारीसाहेब आणि त्यांच्या अर्धांगिनी यांच्यासमवेत मित्र-मैत्रिणी यांच्याशी गप्पा-गोष्टी करत, विचारांची देवाण-घेवाण करत भारावलेल्या अवस्थेतच रात्री साडेअकराला घरी पोहोचलो. ज्यांच्यामुळे हा दिवस खूप आनंद देऊन गेला. त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. या सहलीमध्ये सोबत अनेक नाटककर्मी, लेखक, कवियित्री, कलाकार, गायक व गुणी बालकलाकार या सर्वांमुळे हा दिवस विशेष आनंदाची पर्वणीच ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -