- स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
कायद्यापुढे सारे समान असतात, कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही, हे गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाच्या निकालाने आणि त्यानंतर निघालेल्या लोकसभा सचिवालयाच्या आदेशाने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षात सर्वेसर्वा असले तरी दुसऱ्याला चोर म्हणून वारंवार हिणवल्यानंतर काय होते, याची शिक्षा त्यांच्या वाट्याला आली आहे. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनाही खासदारकी व त्यांचे सरकारी निवासस्थान गमवावे लागले होते, आता चाळीस वर्षांनंतर तीच पाळी त्यांच्या नातवावर यावी, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
‘सभी चोरों का नाम मोदी क्यो होता हैं’, हे वक्तव्य राहुल यांना चांगलेच महागात पडले. यापूर्वी चौकीदार चौर हैं, या टीकेवरून त्यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली होती. सूरत न्यायालयाने दिलेल्या शिक्षेवर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे हा एकच त्यांच्यापुढे पर्याय आहे. अन्यथा दोन वर्षे तुरुंगात जावे लागेल व नंतर सहा वर्षे निवडणूक लढवायला बंदी आहेच. सार्वजनिक जीवनातील आठ वर्षे राहुल गांधी यांना संसदेपासून दूर राहावे लागेल. सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देताच दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केल्याचा आदेश जारी केला. लोकसभा सचिवालयाने राहुल यांना १२ तुघलग रोड, हा सरकारी आलिशान बंगलाही रिकामा करावा, असे आदेश दिले आहेत. सन २००४ मध्ये राहुल अमेठी मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आले व २००५ मध्ये त्यांना हा बंगला राहण्यासाठी सरकारने दिला होता. आता राहुल राहायला जाणार तरी कुठे? दिल्लीत मेहरौली येथे त्यांचे एक फार्म हाऊस आहे किंवा ते आपल्या आईच्या घरी जाऊ शकतील. अन्यथा त्यांना भाड्याने घर घ्यावे लागेल. सोनिया गांधी गेली तीन दशके १० जनपथ येथे राहात आहेत. १९९० मध्ये त्यांचे पती दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना हा बंगला देण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर सोनिया गांधींना तो देण्यात आला.
अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी देशावर लादलेल्या आणीबाणीनंतर १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा रायबरेलीतून पराभव झाला. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. तेव्हा इंदिरा गांधी यांना १ सफदरजंग रोड हे सरकारी निवासस्थान रिकामे करून द्यावे, अशी नोटीस जारी करण्यात आली होती. तेव्हा इंदिराजींकडे राहायला दुसरे घर नव्हते. त्यांचे निकटवर्तीय मोहम्मद युनूस यांच्या १२ विलिंग्टन क्रिसेंट या निवासस्थानी त्या राहायला गेल्या होत्या.
राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली आहे. उच्च न्यायालयात की सर्वोच्च न्यायालयात जायचे, हा त्यांचा निर्णय असणार आहे. सूरत न्यायालयाचे १६८ पानी निकालपत्र हे गुजरातीत असल्याने त्याचे भाषांतर पूर्ण झाल्यावर राहुल यांचे कायदेशीर सल्लागार त्यासंबंधी पुढे काय करायचे ते ठरवतील. भडकाऊ भाषण केल्याबद्दल सपाचे नेते आजम खान यांना उत्तर प्रदेशातील रामपूर येथील न्यायालयाने तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. विधानसभा सचिवालयाने त्यांची आमदारकी लगेच रद्द केली आणि निवडणूक आयोगाने रामपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर केली. आजम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली. मात्र सत्र न्यायालयाने आजम खान यांना कोणताही दिलासा दिला नाही. राहुल गांधी यांना सूरतच्या निकालावर वरच्या कोर्टात दिलासा मिळाला नाही, तर त्यांचे व काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असा धोका अनेकांना वाटतो.
लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना उच्च न्यायालयाच्या निकालानंतर लोकसभा सचिवालयाने पुन्हा खासदारकी बहाल केली, हे तर ताजे उदाहरण आहे. एका हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने जानेवारी २०२३ मध्ये मोहम्मद फैजल यांना १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तत्काळ त्यांची खासदारकी गेली व पोटनिवडणूक जाहीर झाली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही लोकसभा सचिवालयाने त्यांना त्वरित खासदारकी दिली नाही तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण तेथे सुनावणी सुरू होताच त्यांना खासदारकी बहाल करण्यात आली. तसाच लाभ राहुल गांधी यांना मिळू शकतो, असे कायदे तज्ज्ञांना वाटते.
राहुल यांना न्यायालयात खेचणारे पूर्णेश मोदी हे भाजपचे सूरतचे आमदार आहेत. राजकीय लाभ उठवण्यासाठीच देशातील मोदी आडनावाच्या कोट्यवधी लोकांना चोर म्हटले, असे ते सांगत आहेत. भाजपने तर राहुल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाचा अपमान केला, अशी जोरदार मोहीमच सुरू केली. देशपातळीवर काँग्रेसला भाजपच्या विरोधात लढायचे आहे, मोदी-शहा हे काँग्रेसचे सर्वोच्च राजकीय शत्रू आहेत. मोदी-शहा केंद्रात सत्तेवर आहेत, तोपर्यंत काँग्रेसला अस्तित्वासाठी हात-पाय मारावे लागणार आहेत. मग अशा वेळी देशातील अन्य घटकांना दुखविण्याचे काम राहुल गांधी कशासाठी करीत आहेत? देशात केवळ दोन-तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता उरली आहे. लोकसभेत साधे विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याइतपतही काँग्रेस खासदारांची संख्या नाही. मग स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा राहुल गांधी वारंवार का अपमान करीत आहेत? सावरकरांचा अपमान केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशपातळीवरही काँग्रेसला महागात पडतोय, हे राहुल यांना समजत नसावे.
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना यांचे, तर सावरकर हे एक दैवत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. पण माझे नाव सावरकर नव्हे गांधी आहे, असे कुत्सितपणे सांगून राहुल कोणाला अंगावर घेत आहेत? मी का माफी मागावी, माझे नाव सावरकर नाही, असे सांगून ते कोणता पुरुषार्थ गाजवत आहेत? त्यांच्या अशा वागण्याने भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांच्यावर हल्ला चढवायला आयते हत्यार मिळाले. त्यातूनच शिंदे-फडणवीस यांनी महाराष्ट्रभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढणार असल्याची घोषणा केली. लढाई मोदींशी असताना मध्येच सावरकरांना आणणे हे महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांनाही पसंत पडलेले नाही. भारत जोडो यात्रेच्या वेळी राहुल गांधी महाराष्ट्रात असेच पचकले होते. आता त्यांची खासदारकी रद्द झाल्यावरही ते सावरकर द्वेष विसरायला तयार नाहीत. मुंबईत दादर येथे समुद्राकाठी स्वातंत्र्यवीर सावकर स्मारक उभे करण्यात जयंतराव टिळक, बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान तर आहेच. पण शरद पवारांचीही त्यासाठी मोलाची मदत झाली आहे. हे राहुल गांधी यांना ठाऊक नसावे. त्यांच्या आजींनी इंदिरा गांधींनी स्वत:च्या बँक खात्यातून मुंबईतील सावरकर स्मारकासाठी तेव्हा अकरा हजारांचा चेक पाठवला होता, याचे तरी राहुल यांनी भान ठेवायला पाहिजे.
राहुल गांधींच्या सावरकर द्वेषाच्या भूमिकेने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची गोची झाली आहे. सावकरप्रेमी म्हणविणाऱ्या उबाठाबरोबर युती ठेवायची व राहुल यांनाही असहमती दाखवायची नाही, अशी त्यांना कसरत करावी लागते आहे. म्हणून महाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात सावरकर हा मुद्दाच नाही, असा युक्तिवाद काँग्रेस करीत आहे. राहुल यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकाने आपण मोदींना चोर संबोधून ओबीसींचा अपमान केला आहे, असा भाजपचा आरोप आहे, असे म्हणताच, राहुल संतापले. ते त्या पत्रकाराला म्हणाले, तुम्हाला भाजपचे काम करायचे, तर तुम्ही भाजपचा बिल्ला लावा, पत्रकार म्हणून प्रश्न विचारू नका…, राहुल यांच्या उत्तराने पत्रकारही चपापले. भाजपच्या आरोपावर राहुल यांची काय भूमिका आहे, हे कोणाला समजलेच नाही. उलट क्यू हवा निकल गयी… अशी त्या पत्रकाराचीच खिल्ली उडवली गेली.