Monday, April 21, 2025
Homeक्रीडाIPL 2025हैदराबादचा सुपडा साफ; राजस्थान रॉयल्सचा पहिला विजय

हैदराबादचा सुपडा साफ; राजस्थान रॉयल्सचा पहिला विजय

हैदराबादचा सुपडा साफ करून रॉयल्सचा पहिला विजय

हैदराबाद (वृत्तसंस्था) : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन या तिकडीच्या झंजावाती फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने २०३ धावांचा डोंगर उभारून सनरायझर्स हैदराबादला अवघ्या १३१ धावांवर रोखत यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. रॉयल्सच्या या मोठ्या विजयात गोलंदाजीत युजवेंद्र चहलने ४ बळी मिळवत चमकदार कामगिरी केली.

राजस्थानने ५ गडी गमावून उभारलेले २०४ धावांचे आव्हान गाठताना प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या हैदराबादची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. पहिल्याच षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसले. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या आघाडीच्या फलंदाजांना ट्रेंट बोल्डने पहिल्याच षटकात माघारी पाठवल्याने हैदराबादचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलने चार मोहरे टिपत हैदराबादचा सुपडाच साफ केला. हैदराबादला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३१ धावाच करता आल्या. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्यानंतर मयांक अग्रवालने २७ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून चहलने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने २ आणि आर अश्विन व जेसन होल्डरने प्रत्येकी एक बळी घेतला.

तत्पूर्वी हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आला. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर या तडाखेबाज सलामीवीरांनी अपेक्षित अशी सुरुवात संघाला करून दिली. बटलरने २२ चेंडूंत ५४ धावांची तुफानी खेळी खेळली. त्यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. जयस्वालने ३७ चेंडूंत ५४ धावा कुटत यशस्वी खेळी खेळली. त्याच्या या अर्धशतकीय खेळीत ९ चौकारांची जोड होती. सलामीवीरांच्या दमदार कामगिरीनंतर संजू सॅमसननेही वादळी खेळी खेळली. त्याने ३२ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने संघातर्फे सर्वाधिक ५५ धावा जमवल्या. शिमरॉन हेटमायरने २२ धावांची झटपट खेळी खेळली. राजस्थानने २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात २०३ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादच्या टी नटराजन आणि फझलहक फारुकी यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. मात्र धावांचा वेग रोखण्यात एकाही गोलंदाजाला यश आले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -