- दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
एखाद्या स्त्रीला संधी मिळाली, तर ती काय करू शकते? याची अनेक उदाहरणे आपणांस ठाऊक आहेत. तिच्याकडे संधी आली नव्हती, तर अपरिहार्यता म्हणून ती आली. या अपरिहार्यतेवर तिने विजय मिळवत यशस्वी उद्योजिका म्हणून स्वत:ला सिद्ध केले. या यशस्वी उद्योजिका म्हणजे प्रसाद ट्रॅव्हल्सच्या संचालिका प्रज्ञा नीळकंठ सामंत.
सिंधुदुर्गातील सामंत दाम्पत्याच्या पोटी प्रज्ञाचा जन्म झाला. आई गीता नीळकंठ सामंत बृहन्मुंबई महानगरपालिकेत क्लार्क म्हणून नोकरीला होती आणि वडील नीळकंठ बाळकृष्ण सामंत बी.ई.एस.टी.मध्ये सुपरवायझर म्हणून लागले. प्रज्ञा पाच-सहा वर्षांची असताना तिच्या वडिलांनी नोकरी सोडून सक्रिय राजकारणात उडी घेतली. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी वडिलांनी एक काळी-पिवळी टॅक्सी घेतली. दिवसा ड्रायव्हर चालवायचा आणि रात्री ४-५ तास वडील चालवायचे. प्रज्ञाचे शालेय शिक्षण, जॉन विल्सन एजुकेशन सोसायटीच्या सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले आणि कॉलेज शिक्षण हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये झाले. प्रज्ञा आठवीत असताना तिचे बाबा मुंबईच्या अंधेरी (पूर्व) मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. ती दहावीत असताना विधानसभा बरखास्त करण्यात आली आणि वडिलांची आमदारकी गेली. पुन्हा पोटापाण्याकडे बघणे गरजेचे होते. वडिलांना टॅक्सीच्या व्यवसायाचा अनुभव होता. त्यांनी यावेळी काळी-पिवळी टॅक्सी न घेता बँकेचे कर्ज काढून दोन टुरिस्ट परमिटच्या टॅक्सीज घेतल्या. अनुभवाने आणि मेहनतीने धंद्याला बरकत आली. आठ वर्षांत दोनच्या ४० गाड्या झाल्या. व्याप वाढल्याने त्यांना मदतीची गरज होती. मग प्रज्ञा आणि तिचे भाऊ असे दोघेही कॉलेज सुटल्यावर ऑफिसला जाऊन वडिलांचा भार कमी करू लागले. व्यवसायाचे बाळकडू इथेच मिळाले.
प्रज्ञा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेत असतानाच तिच्या वडिलांना लिव्हरचा कॅन्सर निदान झालं आणि सहा महिन्यांतच त्यांचे निधन झाले. सगळं सुरळीत चालू असतानाच नियतीचा अचानक घाला पडला. आयुष्यासमोर यक्षप्रश्न उभा राहिला. प्रज्ञाच्या भावाला या व्यवसायात रस नव्हता. त्याला खेळ आणि शेअर मार्केटमध्ये रस निर्माण झाला होता. मुलगी तर सासरी जाणार ती व्यवसाय कशी करणार…? जवळपास ४० ड्रायव्हर, ३ मेकॅनिक आणि ४ कर्मचारी अशा सर्वांचे भविष्य पणाला लागले होते. आपल्याला जमते की नाही, हे तर बघायचे होते. क्लायंटकडून वसुली करायची होती. तेव्हा दुकान बंद करणे बिलकुल सोयीचे नव्हते. पूर्ण विचाराअंती तिने व्यवसाय चालवायचा निर्णय घेतला.
त्यावेळी प्रज्ञाचे वय अवघे २२ होते. पण वडिलांच्या हाताखाली ती अष्टावधानी बनलेली होती. काही वर्षांतच व्यवसायावर पकड बसली. कधी सौम्य तर कधी कठोर पावले उचलून धंद्यात शिस्त आणली. तिला १८व्या वर्षीच वडिलांनी गाडी चालवायला शिकवल्याने, गियर, क्लच, ऍक्सेल, डायनॅमो वगैरे समजत होते. शिक्षणाचा वापर करून तांत्रिक गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्या कॉर्पोरेट्ससोबत काम सुरू होतं. उत्तम शिक्षण मिळाल्याने त्यांच्याशी योग्य समन्वय साधता आला. पण ड्रायव्हरांकडून काम करून घेणे कठीण होते. आधी २२ वर्षीय मुलगी आपली बॉस हेच त्यांच्या पचनी पडत नव्हते. त्यामुळे तिला गृहीत धरणे चालू झाले. त्यांच्या पेट्रोल, टायर, बॅटरी चोरायच्या प्रकारांना तिने शिताफीने आळा घातला. छोटेसे काम मोठ्ठे करून सांगायचे आणि जास्त पैसे काढायचे ही मेकॅनिक्सची सवय होती. त्यावरही तिने लॉजिक्स वापरून आणि लॉगबूक बनवून त्यांना आळा घातला. हे सर्व करताना तिने स्वतःच्या वागण्यावर आणि भाषेवर पूर्ण नियंत्रण ठेवले. निर्णय कठोर घेतला तरी भाषा कठोर ठेवली नाही. त्यामुळे कामगारांचा पुरुषी इगो न दुखावता रिझल्ट मिळत गेले. मॅडम आपल्याला योग्य तो मान देतात, यातून त्यांनीही सहकार्य करायला सुरुवात केली. स्त्रीसुलभ आत्मियता असल्याने कामगारांच्या समस्या समजावून घेता आले. त्यांचे राहणीमान उंचावायला तिने इन्शुरन्स, प्रॉडक्टिव्हिटी बोनस अशा सुविधा देऊ केल्या.
अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांबरोबर प्रज्ञाचे काम चाले. रिलायन्सची जामनगर रिफायनरी बनवण्यासाठी एनरॉनची टीम मुंबईत दाखल झाली. त्या अख्या समूहाला प्रज्ञाच्या गाड्या जात. त्यासाठी प्रज्ञाने ड्रायव्हरना इंग्रजी बोली भाषेचे ट्रेनिंग दिले. एक दिवस एनरॉनच्या भारतातील अध्यक्षांचा मला फोन आला आणि मला त्यांनी भेटायला ताज महाल हॉटेलमध्ये बोलावले. तेव्हा माझे वय सव्वीस-सत्तावीस होते. माझ्या मनात भीती दाटली. का बोलावले असेल? काही चूक झाली का? काही दुसराच इरादा नाही ना? अशा एक न अनेक शंका. मी घाबरतच गेले. आम्ही कॉफी शॉपमध्ये बसलो आणि माझा अर्धा जीव भांड्यात पडला. मग त्याने मला सांगितले, “आम्ही जेव्हा गाडीत तुमच्या ड्रायव्हरशी संवाद साधतो, तेव्हा आम्हाला कळले की, त्यांची मालकीण एक तरुण मुलगी आहे. भारतासारख्या देशात एक मुलगी, कुठच्याही पुरुषाच्या मदतीशिवाय, एका पुरुष प्रधान व्यवसायात पाय रोवून उभी आहे हे ऐकून आश्चर्य वाटले आणि तुम्हाला भेटायची इच्छा झाली.” मी दाखवलेल्या धैर्याची आणि केलेल्या मेहनतीची ती सर्वोच्च पावती होती. लवकरच त्यांच्या निमंत्रणावर, त्यांच्याच हेलिकॉप्टरमधून, मला त्यांनी जामनगर रिफायनरीची सफर घडवून आणली.
२००४ पासून आईला अल्झायमरचा झाला आणि २०१०ला ती आम्हाला ओळखेनाशी झाली. त्याचे मला डिप्रेशन आले. दिवस-रात्र धंदा आणि आईची सुश्रूषा याने मी थकून गेले. त्यातून बाहेर येण्यासाठी मी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि वयाच्या ४५व्या वर्षी मी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन करून पहिल्या क्रमांकाची दोन सुवर्णपदके प्राप्त केली. पुढे इतिहास हा विषय घेऊन मी मुंबई विद्यापीठात तिसरी आले, प्रज्ञा सामंत सांगतात.
उदरनिर्वाह करताना सामाजिक भानही दिवसेंदिवस वाढत होते. त्यामुळे सेवाभावी संस्थांमध्ये प्रज्ञाने काम केले. मुंबई पोलीस परिमंडळ-२ च्या पोलीस कमिटीवर त्यांनी ५ वर्षे काम केले. त्याचबरोबर चांगल्या सुशिक्षित लोकांनी राजकारणात उतरले पाहिजे, या जाणिवेतून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली.
कोरोना काळात २ वर्षे ट्रॅव्हल्सचा बिझनेस बंद असताना, त्या कोकणात त्यांच्या गावी राहिल्या. त्यावेळी फक्त बांधकाम व्यवसायाला परवानगी होती. त्याचा फायदा घेऊन त्यांनी स्वत:च्या एका जागेवर बंगला बांधून घेतला आणि त्याची विक्री केली. करोनाने एक नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिली. आज ट्रॅव्हल्ससोबत बांधकाम व्यवसायातही त्या स्थिरावत आहेत. तसेच मिळालेल्या नफ्यातून त्यांनी बागायती खरेदी केली. काजू, नारळ, आंबा, सुपारी आणि काळी मिरी यांच्या उत्पादनाची त्यांना आवड निर्माण झाली.
“बॉस हा बॉस असतो. त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो. व्यवसायात जे निर्णय घ्यायचे असतात त्याला निर्णय क्षमता, दूरदर्शीपणा, चूक झाली तरी त्वरित दुरुस्ती करण्याची वृत्ती, आर्थिक धोके पत्करायची वृत्ती, आणि अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती या गुणांची जोड असली पाहिजे. महिला मुळातच मृदू असल्याने त्या विविध अंगाने विचार करू शकतात. तसेच गृह खाते आणि ऑफिस दोन्ही सांभाळण्याची तारेवरची कसरत करण्यात त्या वाकबगार असतात. त्यामुळे ‘लेडी बॉस’ ही पुरुषांच्या बरोबरीने नाही, तर मी म्हणेन एक पाऊल पुढेच असते.” प्रज्ञा सामंत स्वत: जगलेल्या ‘लेडी बॉस’ची व्याख्या स्पष्ट करतात. पुरुषांच्या क्षेत्रात स्वत:चा अमीट ठसा उमटवतात.