मुंबई/ठाणे: भाजप- शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला दादर, अंधेरी, वांद्रे आणि ठाण्यात सुरुवात झाली आहे. ठाण्यातील यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतीमेचं पूजन केलं अन् यात्रेला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी रथयात्रेतही सहभाग घेतला आहे. मुंबईमधील यात्रेचं नेतृत्व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार करत आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्या विरोधात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून राज्यभरातील विविध जिल्ह्यात ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला या यात्रेची सांगता होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कांदिवली पश्चिम येथे निघणाऱ्या सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी होऊन उपस्थित नागरिकांना संबोधित करणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. याच शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा देखील काढली जाणार आहे. या यात्रेला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज छत्रपती संभाजी नगरमध्ये सभा आणि यात्रा यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.