- क्राइम: ॲड. रिया करंजकर
नीताचं ज्या अनिलशी लग्न झालेलं आहे. तो तिच्या आते भावाचा मुलगा असून नात्याने अनिल हा नीताचा पुतण्या लागतो. अनिलचे वडील हे नीताचे आतेभाऊ आणि अनिल हा आतेभावाचा मुलगा. त्यामुळे हे लग्न मोडीत काढण्यासाठी वकिलाने सपिंडा रिलेशनशिपमध्ये केस फाईल करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे न्यायालयात केस फाईल केली.
नीता ही दहावीपर्यंत शिक्षण झालेली अनाथ मुलगी. लहानवयातच आई-वडिलांची छत्रछाया हरपलेली अशी साधी सरळ मुलगी. काका आणि आत्याकडे राहून आपलं शिक्षण पूर्ण करत होती. काकाने कसंबसं करून आपल्या मुलांसोबत तिचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. अठरा वर्षांची झाल्यावर तिचं लग्न लावून द्यायचं, असं काकांनी ठरवलं. आपण आपल्या जबाबदाऱ्यांतून मोकळे होऊ हा विचार केला. तसंच नीतालाही तिचं हक्काचं घर मिळेल, हा त्यामागचा काकाचा हेतू होता. काकांनीही वर शोधायला सुरुवात केली, तर नीताची आत्या आपल्या भावाला म्हणाली की, माझ्याच मुलाचा मुलगा आहे. त्याच्याबरोबरच लग्न करूया. म्हणजे मलाही म्हातारपणी ती बघेल आणि आपली पोरगी आपल्याच घरात राहील.
नीताच्या काकाने कुठले आढेवेढे न घेता बहीण बोलते ते योग्य असं वाटून दोघांचंही लग्न ठरवलं. अनिल नीतापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. या गोष्टीचा नीता व तिच्या काकांनीही विचार केला नाही. काका जे करतोय ते योग्यच, असंच निताने ठरवलं. लग्न झाल्यानंतर नीता आपल्या नवऱ्याच्या घरी म्हणजे अनिलकडे राहावयास गेली. अनिल हा बारावी झालेला व तुटपुंज्या पगारावर नोकरीला होता. आपल्या अनिलला मुलगी मिळणार नाही, कमी पगारात कोण मुलगी देईल, हा आत्याने विचार करून आपल्या भावाची अनाथ मुलगी करून आणलेली होती आणि घरात भांडणं झाली, तर जाणार कुठे? कारण, हिला कोण आई-बाप नाही, हाच त्या मागचा मुख्य उद्देश होता. अनिल याला दारूचंही व्यसन होतं. तो सुरुवाती-सुरुवातीला नीताबरोबर व्यवस्थित वागत होता. नंतर आपले खरे रंग तो दाखवायला लागला. नीताला मारून झोडून, घाणेरडे शब्द बोलण्याचे प्रकार तो करू लागला. त्यामुळे नीतासारख्या साधा सरळ मुलीला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. नीताची आत्या आणि तिची सासू या दोघी नीताला त्रास देऊ लागल्या. तिने सर्व गोष्ट आपल्या काकाला सांगितल्या. काकाने आणि काकाच्या मुलाने तिला परत आपल्या घरी आणले व परत तू अनिलकडे जायचं नाही, असं ठणकावून तिला सांगितलं. तिनेही मान्य केलं.
अनिलला वाटलं की, नीताच्या काकाने नेलं, आता काहीतरी भयानक होणार म्हणून तो नीताशी संपर्क साधू लागला. आपलाच नवरा आहे ना, असं म्हणून ती नवऱ्याशी फोनवर बोलू लागली. हळूहळू अनिल नीताला व्हीडिओ कॉल करू लागला व मला असे फोटो पाठव, मला तसे फोटो पाठव, असा व्हीडिओ कॉल कर, असं तो नीताला सांगू लागला. आपलाच नवरा व्हीडिओ कॉल करतोय, आपल्याच नवऱ्याला फोटो पाठवतोय, हा विचार त्यावेळी फक्त नीताला होता. काही काळानंतर नीताच्या काकाने कौटुंबिक बैठक घेण्याची ठरवली आणि विषय होता नीता आणि अनिल यांचा. त्यावेळी बैठक बसली त्यावेळी अनिल याने अनेक आरोप नीतावर केले. ती किती घाणेरडी आहे, ती बाहेरख्याली आहे, असे आरोप तो नीतावर लावू लागला.
एवढेच नाही, तर नीताने पाठवलेले फोटो कसे आहेत, ते बघा. व्हीडिओ कॉल तिचे बघा, असं स्क्रीनशॉट करून तो बैठकीत दाखवू लागला आणि एवढेच नाही तरी एक अश्लील वेबसाइटवर आपले फोटो अपलोड केलेले आहेत, असे त्यावेळी तिथे त्याने दाखवलं.
नीताला या सर्व गोष्टीची जराही कल्पना नव्हती. या सर्व गोष्टी पाहून ती रडकुंडीस आली आणि ती सांगू लागली, मी याला पाठवत होती. हा सांगत होता म्हणून. पण, या गोष्टी तो मान्यच करायला तयार नव्हता. त्यावेळी नीताच्या काकाच्या मुलाच्या लक्षात आलं की, नीता या गोष्टी करणे शक्य नाही, कारण लहानपणापासून ती दोघे एकत्र वाढली होती आणि नीताचा स्वभाव आणि तिचा साधा सरळपणा त्याला माहीत होता. अनिल यानेच हे सारे केलेले आहे. यावर त्याचा ठाम विश्वास होता. म्हणून नीताला घेऊन त्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि अनिलविरुद्ध तक्रार नोंदवली.
हे सगळं बघितल्यावर नीताच्या काकांनाही आता नीताला अनिलकडे ठेवायचं नव्हतं. पोलिसांनी सगळं ऐकून घेतल्यावर कौटुंबिक वाद आहेत, तुम्ही न्यायालयात जा, असा सल्ला दिला आणि परिचयाच्या वकिलांना गाठून काका, काकाचा मुलगा आणि नीताने सर्व झालेली गोष्ट सांगितली. त्यावेळी वकिलांच्या अशा लक्षात आलं की, हे जे लग्न आहे ते सपिंडा रिलेशनशिपमध्ये येतं. त्यावेळी नीता व काकांना ते समजलं नाही. त्यावेळी वकिलाने असं समजावलं. नीताचं ज्या अनिलशी लग्न झालेलं आहे. तो तिच्या आते भावाचा मुलगा असून नात्याने अनिल हा नीताचा पुतण्या लागतो. अनिलचे वडील हे नीताचे आतेभाऊ आणि अनिल हा आतेभावाचा मुलगा. त्यामुळे हे लग्न मोडीत काढण्यासाठी वकिलाने सपिंडा रिलेशनशिपमध्ये केस फाईल करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे न्यायालयात केस फाईल केली. नीताचं लग्न करताना काकांनी फक्त हाच विचार केला की, आपल्याच नात्यांमध्ये आपल्याच बहिणीच्या घरामध्ये मुलगी दिली जात आहे. त्यामुळे आपलं लक्ष तिच्यावर राहील, हा साधा सरळ विचार काकांनी केला होता. पण आपण केलेला विचार किती चुकीचा आहे आणि ते लग्न लग्नच नाही, हे काकाला आणि नीताला वकिलांकडे गेल्यावर समजलं. आणि नकळत आपल्याकडून आपल्या भावाच्या मुलीचं आयुष्य कसं बरबाद झालं, याचा मनस्ताप काकांना होऊ लागला. बहिणीच्या नादाला लागलो आणि मी माझ्या भावाच्या मुलीसोबत काय केलं, याचा सतत दोष काका स्वतःला देऊ लागले.
(सत्यघटनेवर आधारित)