- ओंजळ: पल्लवी अष्टेकर
निधीच्या कुटुंबातील वातावरण सध्या तणावाचे होते. माहेरून-सासरहून आर्थिकदृष्ट्या सुसंप्पन्न असलेली निधी आज एका वेगळ्याच पेचात सापडली होती. तिचा नवरा धीरजही त्यामुळे अस्वस्थ होता.
एका मोठ्या, एकत्र कुटुंबात निधीचे लग्न झाले होते. ती अतिशय साध्या स्वभावाची होती. फार कुणाच्या अध्या-मध्यात नसलेली. पण कुटुंबातल्या आजूबाजूच्या नात्यातील स्त्रियांची गोजिरवाणी मुले पाहिली की, निधीला वाटायचे आपल्यालाही मूलबाळ हवे. म्हणता म्हणता लग्नानंतर पाच – सात वर्षांचा काळ लोटला. अधे-मधे निधी व धीरज दोघेजण मानसिक चलबिचल अवस्थेत जायचे. त्यामुळे त्यांनी समुपदेशकाचा सल्ला घेण्याचे ठरविले. भविष्य काळात मूल न होण्याची शक्यता त्यांच्याबाबत असल्यामुळे समुपदेशकाने त्यांना मूल दत्तक घेण्याविषयी सुचविले. निधी यासाठी तयार होती; परंतु धीरज काहीसा हो-नाहीच्या फेऱ्यात अडकलेला होता. शेवटी बरीच चर्चा झाल्यावर धीरजही मूल दत्तक घेण्यास तयार झाला. त्यांनी अनाथ आश्रमात जाऊन एका चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून सावनी घरात आली, जणू लक्ष्मीच्या पावलांनी. तिला आई-वडिलांची माया, प्रेम भरभरून मिळू लागले.
नातेवाइकांपैकी कुणीतरी गमतीने निधीला विचारायचे, ‘निधी, तू परक्या मुलीवर आपल्या मुलीसारखे प्रेम कशी करू शकतेस?’ निधी हसून म्हणायची ‘कारण सावनी माझीच मुलगी आहे.’
देवकी मातेच्या पोटी जन्म घेऊनही बाळकृष्णाला माता यशोदाने प्रेमाने अति मायेने मोठे केले, तसेच दत्तक पालकत्वाबाबत घडले पाहिजे. खरोखर दत्तक पालकत्व ही नक्कीच गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. सुरुवातीला हौसेने दत्तक घेणाऱ्या पालकांनी नंतर पूर्ण आयुष्यभर नैसर्गिकरीत्या हे नाते जोपासले पाहिजे. नाहीतर कौटुंबिक नाती विस्कटल्याचीही उदाहरणे आपण सभोवताली पाहत असतो. काही वेळा नातलग, शेजारीपाजारी यांच्या अति चौकशीने, चुकीचे सल्ले देण्याने या नात्यात चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे समाजाने देखील दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात अनाठाई ढवळाढवळ न करण्याचे पथ्य पाळायला हवे. मूल होत नाही म्हणून दत्तक घेणारे पालक जसे असतात, तसे ही समस्या नसूनही दत्तक घेतलेले एक उत्तम उदाहरण माझ्या एका मैत्रिणीचे आहे. तिने आपल्या नवऱ्याला समजावून सांगून अनाथ आश्रमातून एक मुलगी व मुलगा दत्तक घेतले आहेत. आपल्या नवऱ्याला यासाठी तयार करणे हे तिच्याकरिता नक्कीच सोपे काम नव्हते. पण तीन-चार वर्षांनंतर तो यासाठी तयार झाला. या जोडप्याने सामाजिक परिवर्तनाचे एक पाऊल पुढे टाकल्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले. आई-वडील व मुले या नात्यात नैसर्गिक प्रेम राखण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत. तिची मुलगी यंदा अकरावीत व मुलगा नववीत आहेत. ‘लोक काय म्हणतील? नातलग हे विचार सहजी पचवतील का?’ अशा भरपूर शंका त्यांच्याही मनात उमटल्या होत्या. पण दत्तक घेण्याआधी या दोघांनी त्याची मानसिक तयारी केली होती. त्यामुळे ते हे पालकत्व पेलवू शकले व शकताहेत.
नशिबाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अनाथ बालकांना सुदृढ विचारांचे, त्यांना मनापासून सामावून घेणारे घर मिळाले तर त्यांच्या आयुष्याचे कल्याण होईल. मुलातील सुप्तगुणांना नाव दिल्यास भविष्यकाळात ते सुजाण नागरिक होतील. आम्ही समुपदेशक एका कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्रात काम करीत असताना एक नवरा-बायको यांची जोडी आम्हाला भेटण्यास आली. त्यांच्यातील बायकोच्या आपल्या दत्तक मुलीविषयी असंख्य तक्रारी होत्या. नवऱ्याचे म्हणणे होते की, सुरुवातीला हिने आवडीने मुलीला दत्तक घेण्यास होकार भरला. कारण, आम्हाला भविष्यकाळात मूल होणार नाही, हे डॉक्टरांकडून समजले होते; परंतु मुलीला नैसर्गिकरीत्या वाढू देण्यासाठी पालकांमध्ये जे गुण आवश्यक असतात, ते हिच्यामध्ये नाहीत. त्यामुळे मुलीची अगदी वेणी घालण्यापासून मायलेकींमध्ये वाद होतात. ही सतत मुलीला घालून पाडून बोलत राहते. आपण चुकीचे दत्तक पालकत्व स्वीकारले काय, या विचारांनी ही कायम त्रस्त असते. त्यामुळे आमची मुलगी सतत कावरी-बावरी झालेली असते. मला असे वाटते की, आपली पोटची पोर असती, तर आपण तिच्या कमतरतांसहित तिला स्वीकारले नसते का? परंतु माझी पत्नी सतत तिच्या उणिवा शोधत राहते. माझा प्रयत्न नेहमी तिला हेच सांगण्याचा असतो की, हे पालकत्व नैसर्गिकरीत्या आपण स्वीकारले पाहिजे, तरच आपले कौटुंबिक वातावरण समाधानी व आनंदी राहील. असे सर्व सांगून वडिलांनी त्यांची बाजू आम्हा समुपदेशकांपुढे मांडली.
मुलीच्या आईला या नाजूक वळणावर समजावून सांगायला आम्हाला त्यांच्या घरी भरपूर होम व्हिजिट्स कराव्या लागल्या. “किती पसारा करून ठेवते पाहा, अभ्यास वेळेवर करत नाही, आज कणिक पातळच मळून ठेवले आहे, मॅगी नीट शिजवली नाही” अशा साऱ्या मुलीबद्दलच्या तक्रारींचा पाढा आई वाचत होती; परंतु समुपदेशनाच्या माध्यमातून मुलीच्या आईला आम्हाला समजवावे लागले की, ‘तुमचे व मुलीचे नाते तुम्हाला सुरळीत हवे असल्यास तिच्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्हाला पुढे जायला हवे.’
आता मुलीचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हे नाते काहीसे स्थिरावण्याच्या टप्प्यावर आले आहे; परंतु आईचा साधा, सरळ भाव जर सुरुवातीपासून मुलीबाबत राहिला असता, तर कुटुंबाला त्याची एवढी मानसिक झळ सोसावी लागली नसती. भारतात मुले दत्तक घेण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने एक प्राधिकरण तयार केले आहे. त्याचे नाव केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण असे असून ते केंद्राच्या महिला व बालसंगोपन मंत्रालयाच्या देखरेखीखाली काम करते. कोरोनाच्या संकटानंतर भारतात हजारो मुले अनाथ झाली आहेत. दत्तक घेतल्याने मुलांना पालकांचे प्रेम मिळते व पालकांना मुलांचा आधार मिळतो.